बुद्ध कथा -३: अंगुलीमाल कसा बदलला | Buddha Story in Marathi

Dive into the enchanting world of Buddha story in Marathi – a collection of timeless stories that transcend the ages, imparting profound wisdom and moral lessons.

बुद्ध कथा

श्रावस्ती नावाचं एक प्रसिद्ध नगर होतं. तेथे पसेनदी नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या राज्यात एक अतिशय क्रूर आणि कुख्यात दरोडेखोर होता. तो दरोडेखोर श्रावस्ती जवळच्या घनदाट जंगलात रहायचा. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना लुटायचा आणि क्रूरपणे मारून टाकायचा.

एका माणसाला मारलं, की त्याच्या हाताचं एक बोट तोडून ते आपल्या गळ्यातील माळेत गुंफायचा. त्यामुळे सर्व लोक त्याला ‘अंगुलिमाल’ म्हणून ओळखायचे. अंगुलिमाल ज्या जंगलात रहायचा, त्या जंगलातून प्रवास करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. एकटा-दुकटा माणूसच काय, तर ५०-५० लोकांचे समूहसुद्धा त्या जंगलातून प्रवास करण्याचे धाडस करीत नसत. अंगुलिमाल म्हणजे जणू मृत्यूचा जबडाच !

एकदा तथागत बुद्ध लोकांना उपदेश करण्यासाठी श्रावस्तीला गेले. काही दिवस तेथे थांबून ते पुढील प्रवासाकरिता निघाले. अंगुलिमाल राहत असलेल्या जंगलाच्या दिशेने ते एकटेच निघाले. ते रस्त्यातील गुराख्यांना, शेतकऱ्यांना दिसले. त्यांनी अंगुलिमालची सर्व हकिकत बुद्धांना सांगितली आणि त्या रस्त्याने जाऊ नका, अशी विनंती केली. बुद्धांनी सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि न घाबरता एकटेच त्या रस्त्याने प्रवास करत राहिले.

जंगलातील एका मोठ्या झाडावर अंगुलिमाल लपून बसलेला होता. आपल्या दिशेने कुणी तरी एकटेच चालत येत असल्याचे त्याला दिसले. ते बघून त्यालाही आश्चर्य वाटले. तो स्वतःला म्हणाला, “अरेच्चा, ५०-५० लोक सुद्धा मला घाबरतात आणि या जंगलात फिरकत नाहीत, मग हा एकटा श्रमण इथे काय करतोय? याला माझी भीती नसेल का वाटत?”



जंगलात एकटा चालत येणारा हा श्रमण जणूकाही आपल्याला चिडवण्यासाठी इथे येत आहे, असे त्याला वाटले. आपण याला धडा शिकवलाच पाहिजे, असा विचार करून चटकन त्याने झाडावरून खाली उडी मारली. बुद्धांना मारण्यासाठी त्याने हातात तलवार घेतली आणि त्यांच्या मागे धावला. धापा टाकत तो त्यांच्याजवळ पोहोचला.

Buddha Story in Marathi

त्यांच्यापाठीमागे जाऊन थोड्या अंतरावर तो थांबला आणि म्हणाला, “अरे श्रमणा, थांब. स्थिर रहा. स्थिर रहा.” त्याचं बोलणं ऐकूनही बुद्ध काही थांबले नाहीत. ते चालतच राहिले आणि त्याला म्हणाले, “मी स्थिर आहे. अंगुलिमाला, तूही स्थिर हो.” बुद्धांचं हे म्हणणं ऐकून त्याला आश्चर्य वाटले. तो बुद्धांना म्हणाला, “श्रमणा, तू खोटं का बोलतोस? तू स्वतः चालत असूनही ‘मी स्थिर आहे’ असं म्हणतोस आणि मी थांबलेलो असताना मला अस्थिर म्हणतोस. तू स्थिर आणि मी अस्थिर कसा?”

बुद्ध थांबले आणि अंगुलिमालाकडे वळत म्हणाले, “अरे, मी सर्व प्राणिमात्रांच्या हत्येपासून परावृत्त आहे. मी कुणाचीही हत्या करत नाही, कुणालाही लुटत नाही. मी हिंसा करत नाही, कुणाचेही नुकसान करत नाही. हिंसा, द्वेष यांसारख्या दुर्गुणांपासून मी मुक्त आहे, अलिप्त आहे. म्हणून मी स्थिर आहे. तुझं मात्र तसं नाही. आजवर तू अनेकांचे प्राण घेतलेस, अनेकांना लुटलंस. हिंसा, द्वेष, अज्ञान यांसारखे दोष तुझ्यात आहेत. त्यामुळे तू अस्थिर आहेस.”

बुद्धांचं हे बोलणं ऐकून अंगुलिमाल खजील झाला. त्याला आपली चूक कळली. बुद्धांना मारण्यासाठी त्याने घेतलेली तलवार त्याच्या हातातून गळून पडली. तो खाली वाकला. गुडघ्यावर बसून बुद्धांना नमस्कार करत म्हणाला, “हे श्रमणा, मी चुकलो. मला क्षमा कर. मला माझी चूक कळली आहे. तूच सांग, आता मी काय करू? स्थिर कसा होऊ?”

बुद्ध त्याला म्हणाले, “अरे, तुला तुझी चूक कळली ना? मग आता हा हिंसेचा मार्ग सोडून दे. हिंसेमुळे कुणाचंही भलं होत नाही. जो माणूस हिंसा, द्वेष, अज्ञान या दुर्गुणांपासून अलिप्त होतो, त्यांचा त्याग करतो, तो स्थिर होतो. जे लोक या दुर्गुणांना चिकटून राहतात, ते कायम अस्थिर राहतात. म्हणून ज्या चुका झाल्या, त्या विसरून तू नव्याने सुरुवात कर. संयमी हो, तुझं कल्याण होवो.”

अंगुलिमालाने बुद्धांना वंदन केले आणि पब्बज्जा (दीक्षा) मागितली. बुद्धांनी ‘ये भिक्खू’ असं म्हणत त्याला दीक्षा दिली आणि जगण्याची एक नवी वाट त्याला मोकळी करून दिली. अशाप्रकारे रक्ताने माखलेल्या एका क्रूर व्यक्तीचं बुद्धांनी हिंसेविना परिवर्तन करून त्याला एक उत्तम माणूस बनवले.

तात्पर्य / बोध- दृढनिश्चय असेल, प्रामाणिक प्रयत्न केले तर परिवर्तन शक्य आहे. चुका करणारा, वाईट मार्गाला लागलेला असा कुणीही त्या अवस्थेतून बाहेर पडून स्वतःमध्ये बदल घडवू शकतो. हिंसा, द्वेष यासारख्या दुर्गुणांचा व्यक्तीने त्याग केला पाहिजे.

Conclusion 

As we conclude this exploration into the rich tapestry of Buddha Story in Marathi, may the essence of these timeless narratives linger in your heart and mind. Each story, a beacon of wisdom from the enlightened one, Siddhartha Gautama, serves as a guidepost on the path of virtue and self-discovery.

You may like this: बुद्ध कथा -२: एकता हि शक्ती आहे | Buddha Story in Marathi

Follow our podcast: Buddha Dhamma in Marathi

1 thought on “बुद्ध कथा -३: अंगुलीमाल कसा बदलला | Buddha Story in Marathi”

  1. Pingback: बुद्ध कथा -४: मौल्यवान काय? | Buddha Tales in Marathi

Leave a Comment

Scroll to Top
Buddhist Temple Atlanta – A Peaceful Sanctuary in Georgia Gautam Buddha’s First Sermon – Sarnath Parallels Between Buddha and Jesus