Buddha Stories

कष्टाला पर्याय नाही | Buddha Story in Marathi

In this blog post we’ll read the story of Buddha about There is no substitute for hard work (कष्टाला पर्याय नाही). If you like this story in do not hesitate to share it with your friends and family members.

Buddha Story in Marathi

एकदा तथागत बुद्ध भिक्खूंसोबत वाराणसी जवळच्या मिगदाय येथे गेलेले होते. तेव्हाची ही गोष्ट. तेथे सगळे भिक्खू दररोज ठरलेल्या वेळी एकत्र जमायचे. बुद्धांसमोर बसून त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे. एके दिवशी सर्व भिक्खू समोर बसलेले असताना बुद्ध त्यांना म्हणाले, “भिक्खूंनो, जर तुमच्या मनात काही प्रश्न, शंका असतील तर न घाबरता विचारा.

मनात कुठलाही संकोच न ठेवता तुमचे प्रश्न विचारा.” बुद्धांचे म्हणणे ऐकून जमलेल्या भिक्खूंपैकी एक जण आपल्या जागेवर उभा राहिला. बुद्धांना वंदन करून तो नम्रतेने म्हणाला, “तथागत, तुम्ही नेहमी म्हणता, की माणसाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याने दीर्घकाळ आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.

असे का बरे? समाजातील अनेक लोक तर थोड्याश्या प्रयत्नांनी सुद्धा यशस्वी झालेले दिसतात. मग आपण म्हणता तसे सतत आणि जाणीवपूर्वक प्रयत्न का करावेत? थोडे प्रयत्न करून जर यश मिळणार असेल तर मग दीर्घकाळ प्रयत्नांची आवश्यकता का? जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज काय ?

भिक्खूने विचारलेला प्रश्न बुद्धांनी शांतपणे ऐकला आणि म्हणाले, “छान, तू तुझ्या मनातील प्रश्न विचारला हे योग्य केलंस. तुझं म्हणणं खरं आहे. माणसाने यशस्वी होण्यासाठी दीर्घकाळ आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मी नेहमी म्हणतो. मी तसं का म्हणतो ते तुम्हाला ही गोष्ट ऐकून कळेल.” तेव्हा बुद्धांनी भिक्खूंना सचेतन नावाच्या राजाची गोष्ट सांगितली.



सचेतन नावाचा एक राजा होता. एके दिवशी तो आपल्या सेवकास म्हणाला, “आपल्या राज्यात उत्कृष्ट रथ तयार करणारा कुणी अनुभवी रथकार असेल तर त्याला दरबारात घेऊन ये.” सेवकाने राजाच्या आदेशानुसार राज्यातील एका अनुभवी आणि प्रसिद्ध रथकाराला दरबारात हजर राहण्यास सांगितले.

There is no substitute for hard work | Buddha Story in Marathi
There is no substitute for hard work | Buddha Story in Marathi

सेवकाने सांगितलेला निरोप ऐकून रथकार थोडा घाबरला. पण राजाची आज्ञा, नाही कसे म्हणणार? ठरलेल्या दिवशी तो दरबारात हजर झाला. रथकाराने वाकून राजाला नमस्कार केला. रथकाराला बघून राजा त्याला म्हणाला, “हे रथकारा, आजपासून सहा महिन्यांनी माझ्या शत्रू सैन्यासोबत माझे युद्ध होणार आहे. त्यामुळे माझ्या रथासाठी मला चाकांची एक उत्कृष्ट जोडी हवी आहे.

या सहा महिन्यांच्या काळात तू माझ्या रथासाठी चाकांची एक नवी जोडी तयार करू शकशील काय?” राजाचं बोलणं ऐकून रथकाराचा जीव भांड्यात पडला. तो लगेच उत्तरला, “होय महाराज का नाही? मी नक्कीच तुमच्या रथासाठी चाकांची एक उत्तम जोडी तयार करून आणेल.” त्याचे हे उत्तर ऐकून राजा सुखावला.

सहा महिन्यांत चाकांची जोडी तयार करण्याचे आश्वासन राजाला देऊन तो रथकार आपल्या घरी परतला. त्याने चाके तयार करण्याच्या कामाला लगेच सुरुवात केली. दुसरीकडे राजा देखील युद्धाच्या तयारीला लागला.

दिवसामागून दिवस निघून गेले. सहा महिने पूर्ण व्हायला आले. सहा महिने पूर्ण होण्यासाठी केवळ सहाच दिवस शिल्लक असताना रथकार एक चाक घेऊन दरबारात राजापुढे हजर झाला. रथकाराने सोबत आणलेले केवळ एकच चाक बघून दरबारातील सर्वांना आश्चर्य वाटले. एकच चाक पाहून राजासुद्धा विचारात पडला.

राजा रथकाराला म्हणाला, “रथकारा, अरे हे काय? केवळ एकच चाक? अरे, मी तर तुला चाकांची जोडी म्हणजे दोन चाके तयार करायला सांगितले होते. पण तू तर एकच चाक आणलेलं दिसतंय. जोडीतले दुसरे चाक कुठे आहे?” त्यावर रथकार म्हणाला, “माफ करा महाराज. मी आजपर्यंत दोन चाकांपैकी फक्त एकच चाक तयार करू शकलो.

जोडीतले दुसरे चाक अजून तयार व्हायचे आहे.” रथकाराचं हे उत्तर ऐकून राजा थोडा निराश झाला आणि म्हणाला, “अरे, युद्धाला आता केवळ सहाच दिवस शिल्लक आहेत. येत्या सहा दिवसांत तू माझ्या रथासाठी जोडीतले दुसरे चाक तयार करू शकशील का?” रथकार म्हणाला, “होय महाराज. युद्धाच्या आधी मी चाकांची जोडी घेऊन तुमच्यापुढे हजर होईल. विश्वास ठेवा.” राजाला त्याचं उत्तर ऐकून समाधान वाटले. रथकार लगेच घरी परत आला आणि जोडीतील दुसरे चाक तयार करायला त्याने सुरुवात केली.

त्यानंतर सहा दिवसांनी रथकार चाकाची जोडी घेऊन दरबारात राजापुढे हजर झाला. रथकाराने आणलेली दोनही चाके तंतोतंत सारखी दिसत होती. त्यात कोणताही फरक दिसत नव्हता. चाकांची जोडी बघून राजाला आनंद झाला. राजा रथकाराला म्हणाला, “अरे तू केवळ सहाच दिवसांमध्ये दुसरे चाक तयार केले, मग पहिले चाक तयार करायला इतका वेळ का खर्च केलास?” त्यावर रथकार म्हणाला, “महाराज, ही दोन्ही चाके सारखी नाहीत.”

रथकाराचे उत्तर ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले. राजा म्हणाला, “अरे, ही दोन्ही चाके तर सारखीच दिसत आहेत. तू म्हणतोय तसा कोणताही फरक मला या दोघांत दिसत नाही सहा महिन्यांना सहा दिवस कमी असताना तयार केलेलं चाक आणि सहा दिवसात तयार केलेलं चाक यात काही फरक आहे का, रथकार म्हणाला, “होय महाराज, या दोन्ही चाकांत फरक आहे. बघा मी स्पट करतो.”

मग त्याने सहा दिवसांत, घाईघाईने तयार केलेल्या चाकाला उभे करून गती दिली. गती संपल्यावर ते चाक वेडेवाकडे होऊन जमिनीवर खाली पडले. त्यानंतर अधिक वेळ खर्च करून तयार केलेल्या चाकाला उभे करून त्यालासुद्धा पहिल्या चाकाप्रमाणे गती दिली. गती संपल्यावर ते चाक मात्र पहिल्या चाकासारखे खाली पडले नाही.

गती संपूनही ते चाक आसाचा आधार असल्यासारखे उभे राहिले. कमी वेळात तयार केलेले चाक खाली पडले तर दीर्घकाळ, प्रयत्नपूर्वक तयार केलेले चाक उभे राहिले. राजा आणि दरबारातील सर्व लोक हा प्रसंग बघून आश्चर्यचकित झाले. तेव्हा तो रथकार म्हणाला, “महाराज, जे चाक मी फक्त सहा दिवसांत, घाईघाईने तयार केले, त्या चाकात काही दोष, उणिवा राहिलेल्या आहेत.

वेळेच्या कमतरतेमुळे मला ते दोष दूर करता आलेले नाहीत. त्यामुळे गती संपल्यावर ते चाक खाली पडले. याउलट, अधिक कालावधी खर्च करून तयार केलेल्या चाकात कुठलाही दोष शिल्लक नाही. त्या चाकातील दोष, कमतरता मी प्रयत्नपूर्वक दूर केलेल्या आहेत. त्यामुळे गती संपूनही ते चाक खाली न पडता उभेच राहिले.” रथकाराचे हे प्रामाणिक उत्तर ऐकून राजा खूश झाला.

ही गोष्ट सांगून झाल्यावर बुद्ध भिक्खूंना म्हणाले, “बघितलं? रथकाराने घाईघाईत तयार केलेल्या चाकात काही दोष शिल्लक राहिले होते. त्यात काही उणिवा होत्या. याउलट, दीर्घकाळ आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करून तयार केलेलं चाक दोषरहित झालं.

कष्टाला पर्याय नाही

हीच गोष्ट आपल्या जीवनाला सुद्धा लागू पडते. स्वतःला परिपूर्ण, निर्दोष बनविण्यासाठी माणसाने दीर्घकाळ आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. एखादे वेळी थोड्याशा प्रयत्नांनी यश मिळेलही, पण ते तात्पुरते असेल, टिकाऊ असणार नाही. चाकातील दोषांप्रमाणे स्वतःमधील दोष, उणिवा आपल्याला दूर करता आल्या तर कठीण परिस्थितीत सुद्धा आपण न घाबरता उभे राहू शकू.

सतत, जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपण स्वतःमधील दोष, कमतरता दूर केल्या तरच आपण कुठल्याही संकटाला न घाबरता सामना करू शकू. म्हणून भिक्खूंनो, माणसाने स्वतःला अधिकाधिक चांगलं बनविण्यासाठी सतत प्रयत्न करणे, कष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत कष्टाला पर्याय नाही.”

बुद्धांनी सांगितलेली गोष्ट ऐकून भिक्खूच्या मनातील शंका दूर झाल्या. शेवटी सर्व भिक्खूंनी बुद्धांना वंदन केले.

Conclusion (तात्पर्य / बोध )

यशस्वी होण्यासाठी, स्वतःला अधिकाधिक परिपूर्ण बनविण्यासाठी माणसाने जाणीवपूर्वक आणि दीर्घकाळ प्रयत्न करावेत. कष्टाला पर्याय नाही.


Copyright @ Buddha Dhamma in Marathi YouTube Channel

Follow our podcast: Buddha Dhamma in Marathi

You may like to read this story as well: सात आंधळे आणि हत्ती | 7 Blind Man And The Elephant Buddha Story

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *