Discover the captivating tale of Prince Siddharth, who became the enlightened one, Gautam Buddha. Follow his journey from a luxurious palace to the path of enlightenment. Learn about his teachings and philosophy that continue to inspire millions worldwide.
The story of Prince Siddharth
२५०० वर्षांपूर्वी, इसवीसन पूर्व ५६३मध्ये सिद्धार्थ गौतमचा जन्म झाला. सिद्धार्थ म्हणजे सिद्ध झालेला अर्थ; म्हणजेच ईप्सित कार्य पूर्ण झाले. सिद्धार्थ गौतम त्या देहाचे नाव ठेवले गेले, ज्या देहात पुढे जाऊन ‘बुद्धावस्था’ प्रकट झाली.
स्वबोध (संबोधी) मिळाल्यानंतर बुद्धावस्था प्राप्त होते. त्यालाच बुद्धत्व, आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन, कैवल्यावस्था असेही म्हटले जाते. याचाच अर्थ, २५०० वर्षांपूर्वी ज्या शरीरात बुद्धावस्था प्रकट झाली, त्या शरीराचा जन्म झाला, बुद्धांचा नव्हे. बुद्ध हे पूर्वीपासून होते, आहेत आणि राहतील.
नेपाळ आणि भारताच्या सीमाप्रदेशात शाक्य वंशाचे लोक राहत असत. हे राज्य राजा शुद्धोधनांचे होते. त्यांच्या राज्याची कपिलवस्तू ही राजधानी होती. तिच्या दक्षिणेला कौशल आणि दक्षिण-पूर्व दिशेला मगध राज्य होते. सध्याच्या बिहार राज्याच्या परिसरात हा प्रदेश होता.
शुद्धोधनांच्या पत्नीचे नाव महामाया होते, ज्या सिद्धार्थच्या मातोश्री होत्या. शाक्य वंशातील प्रथेनुसार स्त्रीची प्रसूती तिच्या माहेरी होत असे. त्यामुळे शुद्धोधनांच्या परवानगीने देवी महामाया यांनी पालखीतून आपल्या माहेरी प्रस्थान केले. प्रवासात एका सुंदर वनामध्ये त्या विश्रांतीसाठी थांबल्या असतानाच त्यांना प्रसववेदना सुरू झाल्या.
वैशाख पौर्णिमेला, निसर्गसुंदर परिसरात, त्या वनातील एका पिंपळवृक्षाखाली त्यांनी पुत्राला जन्म दिला. राजा शुद्धोधनांना हे समजताच त्यांनी बाळासह देवी महामायांना तातडीने घरी नेले. महामायांचा माहेरी जाण्याचा हेतू सार्थ ठरल्याने शुद्धोधनांनी आपल्या पुत्राचे नाव सिद्धार्थ असे ठेवले. मात्र सिद्धार्थच्या जन्मानंतर अनेक चमत्कारांची मालिका सुरू झाली.
त्यानंतर राजा शुद्धोधनांनी राज्यातील ज्योतिषांना निमंत्रित केले. यापूर्वी महामाया यांना पडलेल्या स्वप्नांचा अर्थ ज्योतिषांनी सांगितला होता. महामायांनी स्वप्नांत एक हत्ती आपल्या गर्भात विलीन होताना पाहिले होते. ज्योतिषांनी याचा अर्थ विशद करताना सांगितले होते, की हे पुत्रप्राप्तीचे संकेत आहेत.
हा पुत्र एक तर चक्रवर्ती राजा बनेल अथवा संबोधी मिळवेल. या वेळीही ज्योतिषांनी बाळाची लक्षणे पाहून सांगितले, की हा मुलगा सम्राट होईल अन्यथा संबुद्ध होईल. संबुद्ध म्हणजे भाग्य आणि बंधनापासून मुक्त झालेली व्यक्ती.
सिद्धार्थच्या जन्मानंतर एक वयोवृद्ध ऋषी राजवाड्यात आले. असित ऋषी असे त्यांचे नाव होते. राजवाड्यात प्रवेश करताच त्यांनी बाळाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा बाळ झोपले आहे, असे त्या ऋषींना सांगितले गेले. ते म्हणाले, ‘बाळ झोपलंय म्हणून काय झालं, त्याला तसंच माझ्याकडे घेऊन या. तसंही बुद्ध झोपत नाहीच.’
असित ऋषींनी त्या बाळाचे बारकाईने निरीक्षण केले. त्या बालकात महापुरुष होण्याची ३२ लक्षणे होती. त्याची तेजोप्रभा असित ऋषीपेक्षा लाख पटीने तेजःपुंज होती, हे त्यांना जाणवले. त्या बाळाला पाहून ते उत्स्फूर्तपणे उद्गारले, ‘हा अद्वितीय पुरुष आहे.’ ते आपल्या आसनावरून उठले आणि त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी त्या बाळाच्या पायाला स्पर्श करत नमस्कार केला.
मग त्याला प्रदक्षिणा घालून, बाळाला आपल्या हातात घेऊन ते विचारमग्न झाले. त्यानंतर काही वेळाने ते या बाळाकडे पाहून जोरात हसले आणि नंतर स्फुंदून स्फुंदून रडू लागले. सिद्धार्थच्या जन्मानंतर झालेला हा पहिला चमत्कार !
असित ऋषींच्या अशा वागण्याने राजा शुद्धोधनांना फारच आश्चर्य वाटले. त्यांनी असित ऋषींना विचारले, ‘सिद्धार्थला पाहून तुम्ही सर्वप्रथम हसलात आणि नंतर रडलात. याचा अर्थ काय?’ त्याचे स्पष्टीकरण देताना असित ऋषी म्हणाले, ‘हे बालक भविष्यात बुद्धत्व मिळवेल, जी अत्युच्च अवस्था आहे. या अवस्थेत सत्याचा साक्षात्कार होतो. त्यामुळे मी आनंदित झालो.
मात्र, हे बालक जेव्हा या सत्याचा प्रचार करू लागेल, तेव्हा माझं शरीर अस्तित्वात नसेल. मी त्याच्या या बुद्धावस्थेचं दर्शन करू शकणार नाही. या विचारानंच मी दुःखी झालो आहे.’
यात दुःखी होण्यासारखे काय आहे, असे कदाचित तुम्हांला वाटू शकेल. पण असित ऋषी हे स्वतः ज्ञानी पुरुष असल्याने त्यांना परमज्ञानाच्या अवस्थेविषयी ठाऊक होते, हे विसरता कामा नये. त्यामुळेच हे बालक भविष्यात बुद्ध होणार असल्याचे भाकित त्यांनी वर्तवले. आपल्या नालक नावाच्या भाच्याला त्यांनी सांगितले होते, ‘तू आतापासूनच तयारी सुरू कर. जेव्हा बुद्धांना ज्ञानप्राप्ती होईल, तेव्हा तू अस्तित्वात असशील. त्यांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर लगेच तू त्यांचं शिष्यत्व पत्कर.’
सत्यप्राप्तीसाठी तुम्ही स्वतःमध्ये पात्रता निर्माण केली, तर तुम्हांलाही निश्चितपणे लवकरच ज्ञानप्राप्ती होईल. त्यामुळे या जीवनरूपी संधीचा लाभ उठवा. वेळ वाया घालवू नका. असित ऋषी किती ठाम आणि स्पष्टवक्ते होते, हे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येते.
त्यांना पात्रतेचे महत्त्व ठाऊक होते. म्हणून त्यांनी देहान्तापूर्वी आपल्या भाच्याला तयारी सुरू करण्याविषयी सांगितले. कारण पात्र असलेली व्यक्तीच सत्य श्रवण करू शकते. जेणेकरून त्याच्या वृत्ती एकापाठोपाठ एक अशा विलीन होऊ लागतात.
मग हळूहळू तो स्वानुभवात स्थापित होऊ लागतो. पण बहुसंख्य लोकांची पात्रता नसल्याने, प्रथम ती वाढवून मगच त्यांना खरे ज्ञान दिले जाते. त्यात बराच वेळ जात असल्याने ज्ञानप्राप्ती होण्यास वेळ लागतो. पात्रता वाढत असताना ज्ञानही मिळत असते आणि भक्तिभावातही वाढ होत असते. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू असतात.
सिद्धार्थच्या जीवनात त्यांच्या निकटवर्तीयापैकीच काही जण त्याच्या विरोधात कट-कारस्थाने करत असत. सिद्धार्थचा चुलत भाऊ देवदत्तला अशी भीती वाटत असे, की मोठेपणी राजा झाल्यावर सिद्धार्थ आपल्यापुढे अडचणी निर्माण करेल. त्यामुळे तो सिद्धार्थच्या विरुद्ध विविध जीवघेणी कारस्थाने रचत असे.
बुद्धांमुळे कुणालाही धोका नसतो, कोणाच्याही मार्गात ते अडथळे किंवा अडचणी निर्माण करत नाहीत, याची जाणीव देवदत्तला नव्हती. त्याला ही गोष्ट आधीच समजली असती, तर त्याने निराधार भीतीपोटी निर्माण केलेल्या दुःखांपासून तो केव्हाच मुक्त झाला असता. जाणिवेच्या अभावातून माणूस अशी दुःखे भोगत राहतो.
दुसरीकडे असित ऋषर्षीना या गोष्टीची पुरेपूर जाणीव असल्याने ते आनंदित होते. शिवाय सर्वांना ज्ञान मिळावे, या दृष्टीने तयारी सुरू करा, असे ते लोकांना सांगत होते.
राजा शुद्धोधन यांनी सिद्धार्थचे भविष्य जाणून घेण्यासाठी जे आठ ज्योतिषी बोलावले होते, त्यापैकी कौंडण्य नावाच्या ज्योतिषाने सिद्धार्थचे भविष्य पाहून आपल्या घरादाराचा त्याग केला. यामागचे कारण विचारल्यावर तो म्हणाला, ‘इतर सात ज्योतिषांनी सिद्धार्थ एकतर चक्रवर्ती राजा बनतील किंवा बुद्धत्व मिळवतील अशा दोन शक्यता वर्तवल्या. मला मात्र ते बुद्ध होतील, याचीच खातरी आहे.
योग्य वेळी ते बुद्धीचा सदुपयोग करतील. जेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती होईल, तेव्हा ते ज्ञान ग्रहण करण्याची पात्रता माझ्यात यावी, यासाठी मी घर सोडून चाललोय.’ खरोखरच कौंडण्य आपल्या चार मित्रांसह घर सोडून गेला. सिद्धार्थच्या जन्मानंतर झालेला हा दुसरा चमत्कार होय.
आता राजा शुद्धोधनांना थोडी शंका आली. त्यांनी त्या सात ज्योतिषांना पुन्हा बोलावून घेतले आणि विचारले, ‘माझ्या पुत्राला बुद्धत्व प्राप्त होईल, असं आपण का सांगत आहात? तो चक्रवर्ती कसा होऊ शकेल?’ तेव्हा ते ज्योतिषी म्हणाले, ‘चार दृश्यं या मुलाच्या दृष्टीस पडणार नाहीत, याची काळजी घ्या. तसं झाल्यास तुमचा पुत्र चक्रवर्ती राजा बनेल.’
ती चार दृश्ये कोणती, हे आता आपण जाणून घेऊ.
१. वृद्धत्व : वृद्धावस्थेतील कमजोर व्यक्ती
२. आजारपण : असहाय अवस्थेतील आजारी व्यक्ती
३. मृत्यू : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू
४. संन्यास : एखादा मुक्त संन्यासी
‘सिद्धार्थनं जर या गोष्टी पाहिल्या तर त्या दृश्यांमुळे तो विचारांत गढून जाईल आणि या चिंतनातून तो मुक्तीचा मार्ग शोधून काढेल. पण ही चार दृश्यं त्याच्या नजरेस पडलीच नाही, तर तो नक्कीच चक्रवर्ती राजा बनेल.’
असा विचार करून सिद्धार्थ मोठा झाल्यावर तो ही चार दृश्ये कधीच पाहू शकणार नाही, अशी व्यवस्था राजा शुद्धोधनांनी केली. भविष्यात मात्र शुद्धोधनांचे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.
You may like this: ओळख बुद्धांची
Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi
Conclusion
In conclusion, the story of Prince Siddharth’s transformation into Gautam Buddha is a profound narrative of self-discovery, enlightenment, and compassion.
His journey from a life of luxury to one of spiritual awakening teaches us valuable lessons about the impermanence of material wealth and the importance of inner peace.
The teachings of Gautam Buddha continue to resonate with people of all backgrounds, inspiring us to seek wisdom, kindness, and understanding in our own lives.
One Comment