Buddha Stories

12. गौतमची कथा | Story of Gautama in Marathi

Delve into the captivating story of Gautama Buddha, from his princely upbringing to his spiritual awakening. Follow his journey of enlightenment, learn about his teachings, and discover the timeless wisdom that continues to inspire millions around the world.

Story of Gautama in Marathi

शुद्धोधन राजाने सिद्धार्थच्या संगोपनासाठी त्याच्या सभोवताली केलेल्या व्यवस्थेत सिद्धार्थने प्रदीर्घ काळ व्यतीत केला. त्यानंतर जेव्हा सिद्धार्थला वास्तवाचे दर्शन झाले, तेव्हा जग कसे आहे, हे त्याला समजले. सिद्धार्थच्या पित्याने त्याच्यासाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेचा व्यवहारी जीवनासाठी खरे तर काहीच उपयोग नव्हता.

कारण बाह्य दुःख रोखण्यासाठी एक वेळ आपण यशस्वी होतो; पण या दुःखाचा विचार आणणारा आपल्या अंतर्यामीच असतो. त्यामुळे कधी ना कधी दुःखद विचार आपल्या मनात येतोच. अखेर सिद्धार्थला या वास्तवाचे दर्शन झाले आणि त्याच्या बालपणीच्या भविष्यवाणीनुसार त्याला संकेत मिळालेच.

गौतमची कथा | Story of Gautama in Marathi Photo
गौतमची कथा | Story of Gautama in Marathi Photo

पहिला प्रसंग: वृद्धत्वाचे दर्शन

एके दिवशी राजपुत्र सिद्धार्थ आपला सारथी छन्न याच्यासह रथातून बाहेर निघाले. रस्त्यात त्यांनी एका वृद्धाला पाहिले. त्याला पाहून त्यांनी सारथ्यास विचारले, ‘हा माणूस असा का दिसतोय? त्याचे दात कुठे गेलेत? हा काठीच्या आधारानं का चालतोय ? हा कंबरेत असा का झुकलाय? याच्या शरीरातील हाडं अशी का दिसताहेत? त्याचे डोळे असे खोलवर का गेलेत?’

त्या सारथ्याला सिद्धार्थांच्या बाबतीत ज्योतिष्याने सांगितलेले भविष्य आठवले अन् त्याने सावरत उत्तर दिले, ‘वाईट सवयींमुळे खूप जण लवकर वृद्ध होतात.’ मग सिद्धार्थांनी विचारले, ‘पण सर्व जण कधी ना कधी वृद्ध होतातच ना?’

तेव्हा त्या सारथ्याला वास्तव सांगावेच लागले. तो म्हणाला, ‘होय, सर्वच वृद्ध होतात.’ हे उत्तर ऐकून सिद्धार्थ अस्वस्थ झाला. त्यांनी विचारले, ‘मग माझे आईवडील, यशोधरा, तुम्ही आणि मी, आपण सर्व जण कधी pi कधी वृद्ध होणार आहोत का?’ सारथी छत्रने मानेनेच होकार दर्शवला.

सिद्धार्थांचा विवाह यशोधरेशी झाला होता. ते नेहमी सुख-सुविधा आणि भोगविलासात राहतील याची काळजी घेतली गेली होती. दुःख काय असते, याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यामुळे हे दृश्य त्यांच्या काळजावर कोरले गेले. ते दुःखी होऊनच आपल्या महालात परतले. शुद्धोधनांना जेव्हा याविषयी समजले, तेव्हा त्यांनी सिद्धार्थांसाठी मोठ्या उत्सवाचे आयोजन केले.

त्यांच्या मनोरंजनासाठी नृत्यांगनांना आमंत्रित केले गेले. पण सिद्धार्थ गौतमांचे व्याकूळ मन काही केल्या शांत होत नव्हते. काही काळानंतर दुसऱ्या प्रसंगातील संकेतानुसार त्यांना त्या संकेताचाही साक्षात्कार झाला.

दुसरा प्रसंग: आजारपण

सिद्धार्थ जेव्हा दुसऱ्यांदा सारथ्यासह फिरायला बाहेर पडले, तेव्हा त्यांना रस्त्यात एक रुग्ण दिसला. त्याच्या तोंडातून फेस येत होता. उलट्या करून तो बेजार झाला होता. त्याला पाहून सिद्धार्थांनी विचारले, ‘हा माणूस असा का थरथरतोय?’ त्यावर सारथ्याने सांगितले, ‘तो खूप आजारी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांतच तो बरा होईल.’

सारथ्याचे हे उत्तर ऐकून सिद्धार्थांनी विचारले, ‘हा आजारी का आहे? या आजाराचं कारण काय? हे शरीर काय आहे? त्याच्या आत काय असतं?’ सारथी छन्नने त्यांना समजावले, ‘आपलं शरीर हवामानाच्या बदलानं, खाण्या-पिण्यात काही चुकीचे पदार्थ आल्यानं किंवा वाढत्या वयामुळे आजारी पडतं. नैसर्गिकरीत्या असं चालूच राहतं. त्यामुळेच आपण निरोगी राहण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो.’

त्यावर सिद्धार्थ गौतमांनी विचारले, ‘मग माझे माता-पिता, तुम्ही आणि मी, आपण सर्व आजारी पडण्याची शक्यता असते का? या रुग्णाप्रमाणे आपलीही स्थिती होऊ शकते का?’ यावर सारथी छन्नने नाइलाजास्तव होकारार्थी मान डोलवली. त्यामुळे सिद्धार्थ पुन्हा अस्वस्थ झाले.

तिसरा प्रसंग: मृत्यू

तिसऱ्या वेळी सिद्धार्थांनी मृत्यूचे दृश्य पाहिले. त्या वेळी त्यांनी एक अंत्ययात्रा पाहिली. पुन्हा सारथी छन्नला सिद्धार्थांनी त्याविषयी विचारले आणि त्यांना मृत्यूची माहिती प्रथमच मिळाली. हा मृत्यू काय प्रकार आहे, याविषयी त्यांची जिज्ञासा वाढली. त्यांनी विचारले, ‘सर्वांचाच मृत्यू होतो का? माझाही मृत्यू होईल का?’ सारथी छन्नला नाइलाजाने वास्तव सांगावेच लागले. तेव्हाही सिद्धार्थ अत्यंत दुःखी होऊन महालात परतले. महालाच्या द्वारापाशीच ते चौथ्या दृश्याला सामोरे गेले.

चौथा प्रसंग: संन्यासी

सिद्धार्थांनी या प्रसंगी एका संन्याशाला पाहिले. त्या वेळी त्यांना महालाच्या दरवाजासमोरच एका तेजःपुंज साधूचे दर्शन घडले. साधू भिक्षा मागण्यासाठी आले होते. या संन्याशाला पाहून सिद्धार्थांनी सारथ्याला विचारले, ‘हे कोण आहेत? त्यांनी अशी वस्त्रं का परिधान केलीत ? ते इतके शांत आणि समाधानी कसे दिसताहेत?’

त्यावर सारथी म्हणाला, ‘हा संन्यासी सत्यशोधक आहे, त्यांचा सत्याचा शोध सुरू आहे. सत्य काय आहे, ते प्राप्त करता येतं का? जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त कसं व्हायचं? मनुष्यजन्म आपल्याला का लाभला आहे? याचा बोध झाल्यामुळे ते जगापासून मुक्त होऊन एका कमळाप्रमाणे अलिप्त जीवन जगत आहेत.’ हे ऐकल्यावर सिद्धार्थांच्या मनात विचार डोकावला, ‘या सत्याचा शोध मीही घेतला पाहिजे.’

या चार अवस्थांचे दर्शन झाल्यानंतर सिद्धार्थांचा अंत होऊन गौतमाचा म्हणजे सत्यशोधकाचा जन्म झाला. कारण त्यांच्या अंतःकरणातून तशी प्रार्थना प्रकट झाली होती. शिवाय ही भावना उथळ वैचारिक संभ्रमाची नव्हती. माणूस जेव्हा भौतिक समस्यांमुळे दुःखीकष्टी असतो, तेव्हा तो या उद्वेगातून, या जीवनातून मला मुक्त व्हायचे आहे, असा विचार करतो.

पण काही दिवसांनी संबंधित समस्येचा प्रभाव कमी होताच मुक्तीच्या विचारांचे त्याला विस्मरण घडते. कारण, मुक्तीची प्रार्थना त्याच्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून निघायला हवी, वैचारिक उद्वेगातून नव्हे. मात्र, एखाद्याच्या मनात आज जरी अशी प्रार्थना निर्माण झाली नाही, तरी ती भविष्यात होऊ शकते.

माणूस जर निरंतर सत्य श्रवण करत असेल, तर कधी ना कधी त्याच्या अंतःकरणातून मलाही सत्य मिळावे अशी प्रार्थना नक्कीच उमटेल. त्यानंतरच जीवनाचा खरा टप्पा गाठला जातो, अन्यथा सुतराम शक्यता नसते. कारण मोहमायेची क्षणिक सुखे देणारी इतकी साधने आहेत, ज्यामुळे यापलीकडे जीवनात काही आहे, याची त्याला जाणीवच होत नाही.

जसे, एखाद्या डॉक्टरच्या उपचारामुळे रोग बरा न झाल्यास आपण डॉक्टर बदलतो, तसेच जीवनातही एका इच्छेतून मनुष्य मुक्त होत नाही, तोवर दुसऱ्या समस्येत अडकण्याचा मोह त्याला होऊ लागतो. या व्यापातून ईप्सित साध्य करण्यासाठी माणूस तिसरीकडेच वळतो.

अशा त-हेने तो आयुष्यभर धावपळ करत राहतो. त्याचे अवघे आयुष्य या धावपळीतच संपून जाते. पण सत्यशोधक झाल्यानंतर मला मुक्त करू शकेल असे सत्य हवे आहे, याची जाणीव माणसाला नक्की होते. गौतमांच्या बाबतीत नेमके हेच घडले.

चार संकेत मिळाल्यानंतर गौतम सखोल मनन करू लागले. महालात राहूनही त्यांचे चित्त तिथे नसायचेच. मनोरंजन, उत्सव, कला, भोजन आदींमधील त्यांची रुची लुप्त झाली. या सर्व गोष्टी त्यांना नीरस वाटू लागल्या. ज्या दिवशी गौतमांची पत्नी यशोधराने मुलाला (राहुलला) जन्म दिला, त्याच दिवशी अंतिम सत्याच्या शोधासाठी राजमहाल सोडण्याचा निश्चय गौतमाने केला.

त्यापूर्वी यशोधरा आणि राहुलला अखेरचे पाहायला, ते महालात गेले तेव्हा हे दोघे माय-लेक निद्रिस्त होते. ज्याच्या जन्माच्या दिवशी त्यांनी सत्यशोधाचा मार्ग पकडला, त्या आपल्या पुत्राचे मुख पाहण्याची गौतमांचीही इच्छा होती. पण यशोधरेचा हात बाजूला घेताना तिला जाग येण्याची शक्यता होती. खरे तर यशोधरेचा हात हटवून गौतमांना आपल्या पुत्राचे मुखदर्शन करता आले असते.

पण त्यानंतर तिने गौतमांना संसारत्यागापासून परावृत्त केले असते. त्यामुळे सिद्धार्थ गौतम यांनी आपल्या मुलाचे मुखदर्शन न घेताच महाल सोडला. सारथी छन्नसह रथात बसून ते महालापासून दूरवर गेले.

आपल्या राज्याच्या हद्दीबाहेर आल्यानंतर अनोमा नदीकिनारी त्यांनी आपल्या राजवस्त्रांचा त्याग केला आणि सारथी छन्नला परत महालात पाठवले. छन्न मोठ्या दुःखी अंतःकरणाने महालात परतला. त्यानंतर सिद्धार्थ गौतम सत्यशोधार्थ पुढील प्रवासास निघाले, त्या वेळी त्यांचे वय अवघे २९ वर्षांचे होते.

You may like this: सिद्धार्थचे प्रारंभिक जीवन | Siddhartha’s Early Life

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion

In conclusion, the story of Gautama Buddha is one of profound transformation and enlightenment. From his privileged upbringing as a prince to his renunciation of worldly comforts in search of spiritual truth, Gautama’s journey resonates with seekers of wisdom across generations.

His teachings on compassion, mindfulness, and the nature of suffering offer valuable insights into the human condition and the path to inner peace. The story of Gautama’s life serves as a timeless reminder of the power of perseverance, introspection, and the quest for spiritual awakening.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *