Buddha Dhamma in Marathi

बौद्ध धम्म जिज्ञासा | Curiosity About Buddhism In Marathi

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – ११

प्रश्न ५१ : सिद्धार्थाने ‘मार विजय’ कशा प्रकारे प्राप्त केला?

उत्तर : सिद्धार्थ नेरंजरा नदीच्या काठी निर्वाण प्राप्तीसाठी मोठ्या उत्साहाने ध्यान करीत असताना ‘मार’ येथे आला व त्याला परावृत्त करावयास आटोकाट प्रयत्न करू लागला, ‘ मार म्हणजे मारणारा, मनाच्या दुष्ट किंवा अकुशल प्रवृत्तींचा समूह त्यास बोधिसत्त्व सिद्धार्थाने असे उत्तर दिले. :-

कामा ते पठमा सेना दुतिया अरति वुचति ।

ततिया खुप्पिपासा ते चतुत्थी तण्हा पवुच्चति ।।१।।

पंचमी थीनमिद्धं ते छठ्ठा भीरूप वुच्चति ।



सप्तमी विचिकिच्छा ते मक्खो थभो ते अठुमो ।।२।।

लाभो सिलोको सक्कारो मिच्छा लद्धो च थोयसो ।

यो चत्तानं समुक्कंसे परेच अवजानति ।।३।।

एसा नमुचि ते सेना कण्हस्सभिप्पहारणी ।

न तं असूरो जिनाति जेत्व च लभते सुखं ।।४।।

अर्थ : (१ – २) हे मार इंद्रियांना सुखविणारे चैनीचे पदार्थ ही तुझी पहिली सेना होय. अरती (कंटाळा) ही तुझी दुसरी सेना. तिसरी भूक आणि तहान, चवथी विषय वासना. पांचवी आळस, सहावी भीती, सातवी कुशंका आणि आठवी गर्व ही तुझी सेना होय. याशिवाय लाभ सत्कार, पूजा ही तुझी नववी सेना आहे आणि खोट्या मार्गाने मिळाले कीर्ती ही दहावी. या कीर्तीच्या योगाने मनुष्य आत्म स्तुती आणि परनिंदा करीत असतो. हे काळ्याकुड़ नमूची (मार) साधु संतांवर प्रहार करणारी ही तुझी सेना आहे. तिला भ्याड मनुष्य जिंकू शकत नाही. परंतु जो शूर मनुष्य तिला जिंकतो, तोच सुखाचा लाभ घेतो.

येणे प्रमाणे सिद्धार्थाने माराला जिंकले. मार विजय म्हणजे ‘आत्म विजय’ होय. हा जय बाह्य शत्रूपेक्षा किती तरी पटीने श्रेष्ठ आहे.

प्रश्न ५२ : बोधिवृक्षाखाली भगवान बुद्ध किती दिवस राहिले?

उत्तर : ते एकोणपन्नास दिवस राहिले. त्यावेळी भगवंतानी बुद्ध धम्माविषयीच्या ज्या गोष्टी बौद्ध वाङमयात वाचावयास मिळतात. त्यांचे व बौद्ध धम्माच्या संपूर्ण तत्त्व प्रणालीचे मनन व चिंतन केले. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल इतके अन्न त्यांनी गोळा केले होते.

प्रश्न ५३ : भगवान युद्धांना प्राप्त झालेल्या संबोधी मध्ये प्रामुख्याने कोण कोणते ज्ञान समाविष्ट होते?

उत्तर : ज्ञेय आणि अज्ञेयाचे स्वरूप, आर्य अष्टांगिक मार्ग, शक्याशक्य, गुणावगुणाचे मूळ कारण, प्राणिमात्रांचे विचार जाणणे, सृष्टीचे नियम, संवेदनांचे मोहजाल, इच्छांचा विमोड करण्याची साधने, कुणा ही व्यक्तीचा तसेच वस्तूचा जन्म आणि पुनर्जन्म ह्यांतील फरक ह्या गोष्टी ज्ञान प्राप्ती मध्ये प्रमुख होत्या. चार आर्यसत्ये व प्रतित्य समुत्पाद इत्यादीचे यथार्थ ज्ञान यांनाच लोकोत्तर प्रज्ञा म्हटलेले आहे.

प्रश्न ५३ : सम्यक संबुद्धाला कोण कोणत्या गोष्टींचे ज्ञान किंवा बळ प्राप्त झालेले असते?

उत्तर : सम्यक संबुद्धाला दहा गोष्टींचे ज्ञान किंवा बळ प्राप्त झालेले असते.

◆ बुद्ध स्थानाला स्थान समजून, अस्थानाला अस्थान असे यथार्थपणे जाणतात.

◆ बुद्ध सर्वागामिनी प्रतिपदेला (मार्ग, ज्ञान) यथार्थ जाणतात.

◆ बुद्ध भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळांत केलेल्या कर्माचे परिणाम ह्यांना स्थान आणि हेतूपूर्वक अचूकपणे जाणतात. (कोणीही केलेल्या कर्माचे भविष्यांत त्याला काय फळ मिळेल? हे जाणतात.)

◆ बुद्ध अनेक धातु (ब्रह्माण्ड) नाना धातू असलेल्या लोकांना (देव लोक वगैरे) यथार्थ आणतात. (सर्वच ज्ञान एकवेळी सदा सर्वदा उपलब्ध नसते, परंतु आवश्यकता भासल्यास त्यांचे ज्ञान त्यांना त्वरितच होते.)

◆ बुद्ध विविध प्रकारचे स्वभाव किंवा गुणधर्म असलेल्या प्राण्यांना जाणतात.

◆ बुद्ध इतर प्राण्यांच्या इंद्रियांचे परत्व – अपरत्व (प्रबलता – दर्बलता) ह्यांना यथार्थत विमोक्ष, समाधी, समापत्तीचे मळ आणि व्यवदान (निर्मळ कारण) आणि त्यांचे उत्थान यांना समग्रपणे जाणतात.

◆ बुद्ध आपल्या पूर्वजन्मीच्या घटनांचे स्मरण करू शकतात. (पूर्वजन्म म्हणजे ह्याचा शरीराचे पूर्वक्षण:)

◆ बुद्ध अमानवीय विशुद्ध दिव्य चक्षू द्वारे प्राण्यांचे उत्पन्न होणे, मरणे, स्वर्ग लोकास प्राप्त होणे, यांचे दर्शन करू शकतात. (स्वर्ग लोक या पृथ्वी वरील आनंदमय अवस्थेला म्हणतात.)

◆ बुद्ध आश्रवांच्या क्षयामुळे आश्रवरहित (बंधनरहित) झाल्यामुळे चित्ताची मुक्ती आणि प्रज्ञेची मुक्ती ह्यांचा साक्षात्कार त्यांना घडतो. भगवान प्रत्येक क्षणी संसारातील सर्वच गोष्टींचे ज्ञान स्वतः जवळ साठवून ठेवीत नसत. परंतु त्यांची सर्वज्ञता यातच होती की, ज्या क्षणी त्यांना कसलेही ज्ञान जाणावेसे वाटले, तर त्या विषयावर ध्यान केल्याबरोबर त्यांना त्याचे ज्ञान होत असे. ह्यालाच ‘आवर्जन – प्रतिबद्ध सर्वज्ञता” म्हणतात.

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – १२

प्रश्न ५४ : सम्बोधी प्राप्त केल्यावर सद्धम्माचा प्रचार – प्रसार करावा. असे भगवंताना सुरुवातीस वाटले काय?

उत्तर : नाही. सम्बोधी प्राप्त केल्यावर भगवंताच्या मनात असा विचार आला की, दसऱ्यांना आपल्या धम्माचा उपदेश द्यावा की, आत्म कल्याणामध्येच मग्न राहावे. यालाच त्यांचा विषाद योग असे म्हणतात. त्यांना असे वाटले की, मला सद्धम्माचे ज्ञान मिळाले हे खरे, परंतु प्रत्येक सामान्य व्यक्तीला ते समजणे व त्याचे अनुकरण करणे कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते अतिसूक्ष्म आहे.

माणसाला आत्मा आणि परमात्मा यांच्या मोह जाल मधून निघणे कठीण आहे. त्याला रितीरिवाज, रूढी आणि धार्मिक संस्कार यांच्या बंधनातून निघणे कठीण आहे. ब्राम्हणी कर्मवादापासून मुक्त होणे कठीण आहे. लोकांना ‘आत्मा नित्य आहे.’ या आज पर्यत त्यांनी स्वीकारलेल्या सिद्धान्तापासून मुक्त होणे कठीण आहे.

जर मी माझ्या सिद्धान्ताचा उपदेश दिला व लोकांना तो समजला नाही किंवा समजून देखील त्यांनी जर त्याचा स्वीकार केला नाही किंवा स्वीकार केल्यावर देखील त्यानुसार ते आचरण करू शकले नाही. तर लोकांना ही व्यर्थ श्रम होतील व मला देखील उगीचच त्रास होईल. मी संन्यासी राहून आपले स्वतःचे कल्याण निश्चितच करू शकतो. या प्रकारे भगवंताचे मन सद्धम्माच्या प्रचाराकडे न झुकता निष्क्रियतेकडे झुकले.

किच्छेन मे अधिगतं हलं दानि पकासितुं ।

रागदोसपरेतेहि नायं धम्मो सुसम्बुद्धो ।।१।।

परिसोतगामि निपुणं गंभीरं दुद्दसं अणुं ।

रागरत्ता न दक्खन्ति तमोखन्धेन आवुटा ति ।।२।।

अर्थ :

मोठ्या प्रयत्नाने या मार्गाचे ज्ञान मला झाले आहे. आता ते लोकांना सांगण्यात अर्थ दिसत नाही. कारण लोभाने आणि द्वेषाने भरलेले लोक ते जाणू शकणार नाहीत. हा मार्ग लोक प्रवाहाच्या उलट जाणारा आहे. हा ज्ञानयुक्त आहे, हा गंभीर आहे, हा दुरधिगम आहे आणि हा सूक्ष्म आहे (म्हणून) अज्ञानावरणाने आच्छादित व कामासक्त मनुष्यांना याचे ज्ञान होणार नाही.

प्रश्न ५५ : भगवंतानी आपल्या नवीन ज्ञानाचा प्रचार करावयाचे का ठरविले?

उत्तर : प्राचीन कथा अशी आहे की, ब्रह्माहसम्पतीला भगवताच्या मनात आलेला धम्म प्रसार न करण्याचा विचार समजला व त्यामुळे जगाचे फार नुकसान होईल. असे वाटून तो भगवंताजवळ प्रकट झाला व त्याने हात जोडून विनंती केली. तुम्ही आता सिद्धार्थ नसून सम्यक संबुद्ध झालेले आहात आणि जगाला अंधकारातून मुक्त करावयाचे प्रयत्न तुम्ही केलेच पाहिजेत. पुष्कळसे लोक असे देखील आहेत की, जे सद्धम्म श्रवण करावयास आतुर आहेत. त्या लोकांसाठी अमृताचे द्वार उघडणे आवश्यक आहे. म्हणून दया करून देवता व मनुष्य यांना सद्धम्माचा उपदेश तुम्ही द्यावा. त्यानंतर भगवंताने धम्माचा उपदेश करावयाचा संकल्प केला.

खरे म्हणजे त्यांनी स्वगतच पूर्ण विचार केला की, जगात एवढे दुःख आहे. त्यामुळे इतर संन्याशांप्रमाणे जगात काय घडत आहे? ते केवळ निमूटपणे पाहत न बसता त्याच्या कल्याणाकरिता धर्मोपदेश करावा. त्यांना जाणीव झाली की, त्यांनी गृहत्याग या करिताच केला होता की, दुःखाचे व संघर्षाचे मूळ शोधून काढावे आणि जगातील दुःख व कष्ट दूर करावेत. धम्माचे स्वरूप गहन असले तरी, शक्य तितक्या स्पष्टपणे व सोप्या रीतीने लोकांना शिकविणे आवश्यक होते. प्रत्येकाच्या वैयक्तिक कुवतीप्रमाणे त्यास सत्याचे दर्शन घडेलच, असे त्यांना वाटते. मुक्तीचा केवळ हाच एक मार्ग असून प्रत्येक मानवास तो समजावून घेण्याचा समान अधिकार आहे, असा त्यांनी स्वगतच विचार केला.

प्रश्न ५६ : भगवंताला विषाद योग नष्ट करून धम्म प्रसार करा. अशी विनंती करणारा तो ब्रह्मासहम्पती कोण होता?

उत्तर : मैत्री, करुणा, मुदिता (आनंदी वृत्ती) आणि उपेक्षा या चार भावनांना ब्रह्म विहार असे म्हणतात.

तिचर निसिन्नो वा सयानो वा यावतस्स विगतमिद्धो ।

एतं सर्ति अधिट्टेय्य ब्रम्हमेतं विहारं इधमाह ।।

उभे असता, चालत असता, बसले असता किंवा अंथरुणावर पडल्यावर जोपर्यंत झोप येत नाही. तोपर्यंत ही मैत्रीची भावना जागृत ठेवावी. कारण तिलाच ब्रह्म विहार असे म्हणतात.

ब्रम्ह देव म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता किंवा उपेक्षा यांपैकी एखादी मनोवृत्ती होय. ज्या ब्रह्म देवाला लोक पितामह म्हणतात. तो दूसरा कोणी नसून या चार मनोवृत्तीची साक्षात मूर्ती होय. तेव्हा आता बुद्धांजवळ ब्रह्म देव आला म्हणजे काय? तर या चार मनोवृत्ती त्यांच्या मनात विकास पावल्या. ब्रह्मदेवाची प्रार्थना त्यांनी ऐकली म्हणजे काय? तर त्यांच्या अंत:करणात वास करणाऱ्या अमर्याद प्रेमाने, अगाध करुणेने, सजनांविषयी मुदितेने आणि जे कोणी त्यांचे ऐकणार नाहीत व अकारण शत्रू होतील. अशांच्या उपेक्षेने त्यांना सद्धम्माचा प्रसार करावयास प्रवृत्त केले.

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – १३

प्रश्न ५७ : भगवंतांनी प्रथम उपदेश कोठे केला?

उत्तर : ऋषिपतनाच्या मृगदाय वनामध्ये केला. धर्मोपदेश करावयाचा निश्चय केल्यावर भगवंताने प्रथम उपदेश कोणास द्यावयाचा यावर विचार केला. सर्व प्रथम त्यांना आलार कालामाची आठवण झाली. कारण तो विद्धान, बुद्धिमान, समजदार आणि निर्मळ होता. परतु त्याचे निधन झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर उदक रामपुत्तास उपदेश द्यावयाचा विचार केला. पण त्याचेही निधन झाले होते. त्यानंतर वाराणसी जवळच्या ऋषिपतनाच्या मृगदाय वनामध्ये त्यांचे पूर्वीचे पाच सोबती (पंच वर्गीय भिक्खुं) त्यांना आठवले.

भगवंतानी विचार केला की, त्यांनी बरीच सेवा केलेली होती. म्हणून त्यांनाच प्रथम धर्मोपदेश द्यावा, त्या स्थळाची ओळख म्हणून अजून ही पडझड झालेल्या स्तूपांचे अवशेष व शिलालेख त्या जागी शिल्लक आहेत. सुरुवातीस भिक्खुंनी त्यांचे म्हणणे न ऐकण्याचे ठरविले. कारण त्यांना सिद्धार्थ गौतमाने तपश्चर्या सोडून दिल्याचे माहीत होते. परंतु त्यांच्या मुद्रेवरील अलौकिक तेज पाहून व त्यांची मधुर वाणी ऐकून त्यांची मने वळली. त्यांच्या पैकी सर्वात प्रौढ असलेल्या कौडिण्याला सर्वात प्रथम धम्म ज्ञान समजले. सर्व प्रथम कौडिण्यानेच आपली दुमते सोडून दिलीत.

भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचा स्वीकार केला आणि त्यांचा शिष्य बनून अर्हत पदाकडे नेणाऱ्या मार्गावर प्रवेश केला. इतर चौघांनी लवकरच त्याचे अनुसरण केले. हा उपदेश आषाढी पोर्णिमेस देण्यात आला. त्यांनी विशद केलेल्या जीवन क्रमाला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात व पाली भाषेत त्याला ‘अरियो अट्ठङ्गिको’ असे म्हणतात.

प्रश्न ५८ : भगवंतांनी प्रथम धर्मोपदेशात काय सांगितले?

उत्तर : प्रथम धर्मोपदेशाला ‘धर्मचक्र प्रवर्तनाचा’ उपदेश असे म्हणतात. यात दोन प्रवचनांचा समावेश होतो. धर्मचक्र प्रवर्तन सूत्र (धम्मचक्र पवत्तन सुत्त) आणि अनात्म लक्षण सूत्र (अनत्त लक्षण सुत्त). पहिले प्रवचन चार आर्यसत्यांविषयी (अरियसच्च) असून त्यालाच बुद्ध धम्माचा आधार समजतात. दुसरे प्रवचन अनात्म लक्षण सूत्र, तीन अत्यावश्यक गोष्टी विषयी आहे. ‘अनित्य’ (अनिच्च म्हणजे कोणतीही गोष्ट सनातन नसल्याचे तत्व : Doctrine of Impermanence), दुक्ख (दुखाचे अस्तित्व : Doctrine of Suffering) आणि अनात्म (अनत्ता म्हणजे आत्म्याचे अस्तित्व नसणे : Doctrine of Non – Self) त्यांनी पंचवर्गीय भिक्खूना जे त्यावेळी वाराणसी जवळ इसिपतन मृगदायेत राहत होते. त्यांना चार आर्यसत्यांचा उपदेश दिला. तो असा :- चार आर्यसत्ये (Four Noble Truths) येणेप्रमाणे…

◆ दुःख म्हणजे या जगांत दुःखाचे अस्तित्व आहे. (The Noble Truth of Suffering. The Raison Detre of Buddhism)

◆ दुःख समुदय म्हणजे या दुःखाला कारण आहे. (The Noble Truth of The Cause of Suffering)

◆ दुःख निरोध म्हणजे या दुःखाचा निरोध होऊ शकतो. (The Noble Truth of The Ceasation of Suffering) आणि निब्बान (निर्वाण) मिळू शकते. (Nibbana ; The Summum Bonum of Buddhism)

◆ दुःख निरोध गामिनी प्रतिपदा (दुक्ख निरोध गामिनि पटिपदा) म्हणजे दुःख निरोधाचा जो मार्ग तो हाच आहे. मध्यम मार्ग (मज्झिमा पटिपदा) (The Noble Truth of The Path Leading to The Ceasation of Suffering)

या सदोदित सत्य असणाऱ्या गोष्टी (Universal Truths) असल्यामुळे यांना आर्यसत्ये असे म्हणतात. प्रथम तीन आर्यसत्यावर बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान (Philosophy) आधारलेली आहे आणि चौथे आर्यसत्य बुद्ध धम्माचे नीतिशास्त्र (Ethics of Buddhism) होय.

प्रश्न ५९ : भगवंतांनी मध्यम मार्ग कशा प्रकारे समजावून सांगितला?

उत्तर : ह्या दोन विरुद्ध टोकांवरील गोष्टी आहेत. एक तर काम भोगाचे जीवन व दुसरे काया क्लेशाचे जीवन. एकाचे म्हणणे खावे, प्यावे आणि मौज करावी, कारण उद्या तर मरायचेच आहे. दुसऱ्याचे म्हणणे असे की, संपूर्ण नैसर्गिक वासनांचा समूळ नाश केला पाहिजे. कारण त्यांच्यामुळे पुनर्जन्म होतो, म्हणून सदोदित देहदंडन करीत तपश्चर्या करावी. भगवंताने मध्यम मार्गाचा उपदेश केला न पूर्णतः काम भोगाचा मार्ग न पूर्णतः काय, क्लेशाचा मार्ग. (The Middle Path)

जोपर्यंत पार्थिव किंवा स्वर्गीय सुखाची कामना मनात राहील. तोपर्यंत काय क्लेश व्यर्थच आहे. काया, क्लेशाने जर तृष्णेला शांत करू शकलो नाही. तर स्वतःवर विजय मिळविणे शक्यच नाही. स्वतःवर विजय मिळविला म्हणजे काम – तृष्णेपासून आपोआपच मुक्ती मिळेल व काम भोगाची कामना राहणार नाही आणि मग प्राकृतिक गरजेची पूर्ती केल्यामुळे विकार निर्माण होणार नाहीत. आपल्या शारीरिक आवश्यकतेनुसार खाणे, पिणे सुरू ठेवले पाहिजे.

सर्व तऱ्हेची काम वासना उत्तेजक असते आणि कामुक आपल्या काम वासनेचा गलाम असतो. तथापि शरीराच्या स्वाभाविक आवश्यकतेची पूर्ती करण्यात काहीच वाईट नाही. शरीर स्वस्थ ठेवले नाही तर प्रज्ञारूपी प्रदीप प्रज्वलित राहू शकणार नाही. दोन्ही विरुद्ध टोकाच्या मार्गापासून (Two Extremities) दूर राहिले पाहिजे व मध्यम मार्गास अवलंबिले पाहिजे. त्यांचा धम्म म्हणजे मध्यम मार्ग हा मुक्तिचा सत्य मार्ग होय.

प्रश्न ६० : दुःख किंवा दुःखाबद्दलचे आर्यसत्य कोणते?

उत्तर : जन्म हा दुःखमय आहे. वृद्धत्व दुःखमय आहे. व्याधी दुःखमय आहे. मृत्यू दुखमय आहे. आनंद न देणाऱ्या गोष्टीशी गाठ पडणे दुखमय आहे. आनंद देणाऱ्या गोष्टीचा वियोग होणे दुःखमय आहे. ज्याची लालसा असते ते न मिळाल्यास दुःख होते. थोडक्यात पाच आकर्षणे (उपादान स्कंध) दुःखमय आहेत. (Five Aggregates of Attachment Are Suffering) ह्यालाच ‘दुःख आर्यसत्य’ म्हणतात. (टीप १३ बघावी.)

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – १४

प्रश्न ६१ : दुःख समुदय किंवा दुःखाच्या कारणाबद्दलचे आर्यसत्य कोणते?

उत्तर : तृष्णेमुळेच दुःख निर्माण होते. हे दुःख समुदय आर्यसत्य होय. मोहामुळे जन्मो जन्माची साखळी ही तृष्णा उत्पन्न करते. इंद्रिय सुखाची लालसा म्हणजे काम तृष्णा (काम तण्हा) जगण्याची लालसा म्हणजे भव तृष्णा (भव तण्हा म्हणजे अनंत काळपर्यंत जगावयाची लालसा : Craving Associated With Etermalism) नष्ट होऊन पुन्हा जन्म घ्यायची लालसा म्हणजे विभव तृष्णा (विभव तृष्णा : Craving Associated With Nihilism)

प्रश्न ६२ : दुःख निरोध किंवा दुःखाचा नाश होण्या बद्दलचे आर्यसत्य कोणते?

उत्तर : तृष्णेचा निरोध होऊ शकतो. म्हणजेच तृष्णेचा पूर्णतः नाश होऊन निर्वाणाची प्राप्ती होऊ शकते. हेच दुःख निरोधाचे आर्यसत्य होय.

प्रश्न ६३ : दुःख निरोध गामिनी प्रतिपदा किंवा दुःखाच्या नाशाचा मार्ग सांगणारे आर्यसत्य कोणते?

उत्तर : आर्य अष्टांगिक मार्ग (अरियो अट्ठङ्गिको माग्गो : Noble Eightfold Path) हे दुःख नाशाच्या मार्गाचे आर्यसत्य होय. यांत आठ गोष्टींचा समावेश होतो. सम्यक दृष्टी (सम्मा दिट्ठी : Right Understanding), सम्यक संकल्प (सम्मा संकल्प : Right Thoughts), सम्यक वाणी (सम्मा वाचा : Right Speech), सम्यक कर्मान्त (सम्मा कम्मन्तो : Right Action), सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्ल (सम्मा बायामो : Right Endeavour), सम्यक स्मृति (सम्मा सति : Right Mindfulness), सम्यक समाधी (सम्मा समाधी : Right Concentration)

प्रश्न ६४ : पंचवर्गीय भिक्खूंना दुःखाचा नाश करावयास भगवंतांनी पंचशीलांचा कोणता मार्ग सांगितला?

उत्तर : भगवंतांनी त्यांना पंचशीलाचा व मध्यम मार्गाचा उपदेश करून असे सांगितले की, त्यांच्या सद्धम्माचा, आत्मा, परमात्मा याच्याशी काहीही संबंध नाही. माणूस मेल्यावर आत्म्याचे काय होते? याच्याशी संबंध नाही किंवा कर्मकांड आणि यज्ञयागाशी संबंध नाही व त्यांच्या धम्माचा केंद्रबिंदू मानव असून या पृथ्वीवर निवास करीत असताना एका गाणसाने दुसऱ्यांच्या प्रती बाप कर्तव्य आहे. हा त्यांच्या सम्मानाचा प्रथम विषय होय. माणूस दुखी आहे. कष्टी आहे, दारिद्रयात आहे. त्यांच्या दुखाचा नाश करणे. हा त्याच्या धर्माचा द्वितीय विषय होय.

दुःखाच्या अस्तित्वाचा स्वाकृता व दुःखाच्या नाशाचे उपाय तीच त्यांच्या धम्माची आधारशिला होय. प्रत्येक माणसाने पवित्रतेच्या याच्या आणि शील मार्गाच्या रस्त्यावर चालल्यास दुखाचा निरोप होऊ शकतो. पवित्रतेच्या मार्गानुसार उत्तम जीवनाचे पाच माप दंड आहेत. यांनाच पंचशिल म्हणतात.

१. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे.

२. चोरी न करणे.

३. व्यभिचार न करणे.

४. असत्य न बोलणे.

५. मादक वस्तूंचे सेवन न करणे.

उत्तम जीवनाचे पाच ही मापदंड प्रत्येक व्यक्ती करिता कल्याणकारी आहेत आणि समाजासाठी देखील कल्याणकारी आहेत. म्हणून त्यांना जीवनाचे खरे मापदंड मानायलाच पाहिजे. प्रत्येक मनुष्याकरिता जीवनाचे माप दंड असणे आवश्यक आहे. जेणेकरून तो आपल्या चांगल्या, वाईटाचे मोजमाप करू शकेल. ज्याच्या जीवनाचा मापदण्ड नसतो. तो पतित असून ही त्याला त्याची जाणीव नसते. ज्याच्या जीवनाचा मापदंड असतो. तो नेहमी या गोष्टीचा प्रयास करतो की जेणेकरून तो पतितावस्थेतून बाहेर येईल.

प्रश्न ६५ : भगवंतांनी पंचवर्गीय भिक्खूना आर्य अष्टांगिक मार्ग कसा शिकविला?

उत्तर : भगवंताने त्यांना सम्यक मार्गाचा म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला.

◆ सम्यक् दृष्टी :

ही सर्वात प्रथम आणि प्रधान आहे. सम्यक दृष्टीचा अंतीम उद्देश अविद्येचा नाश करणे हा होय. अविद्या म्हणजे माणसाने दाखास न ओळखणे. दुःख निरोधाच्या उपायास न जाणणे. सत्य वस्तुस्थितीला न ओळखणे. सत्यास सत्य व असत्यास असत्य न जाणणे.

◆ सम्यक् संकल्प :

आपल्या आशा आकांक्षा, ठराव, संकल्प, विचार, उच्च स्तराचे असावेत. निम्न स्तराचे नसावेत. योग्य असावेत. अयोग्य नसावेत.

◆ सम्यक् वाणी :

सम्यक् वाणी म्हणजे सदा सत्य बोलावे. असत्य बोलू नये. दुसऱ्याची निंदा – नालस्ती करू नये. शिवीगाळ व कठोर वचनाचा व्यवहार करू नये. विनम्र वाणीचा व्यवहार करावा. व्यर्थ आणि मूर्खतापूर्ण बकबक न करणे. बुद्धि संगत आणि तर्क संगत उद्देशपूर्ण गोष्टीच कराव्यात.

◆ सम्यक् कर्मान्त :

योग्य व्यवहाराची शिकवण आपल्या व्यवहाराने दसऱ्याचे नुकसान व्हावयास नको. त्यांच्या भावना व त्यांचे अधिकार सुरक्षित राहावेत. आपले कार्य जीवनाच्या मुख्य नियमांशी शक्यतोवर समन्वित असावे.

◆ सम्यक आजीविका :

सम्यक आजीविका म्हणजे जीविका अशा प्रकारची की, ज्यामुळे कुणाची हानी किंवा कुणावर अन्याय व्हायला नको.

◆ सम्यक व्यायाम :

सम्यक व्यायाम म्हणजे चांगल्या गोष्टी करावयाचा प्रयास, अष्टांगिक मार्ग विरोधी चित्त प्रवृत्तीना थांबविणे. ज्या वाईट चित्त प्रवृत्ती उत्पन्न झाल्या असतील. त्यांना नष्ट करणे व उत्तम चित्त प्रवृत्तींना चालना देणे व त्यांचा विकास करणे.

◆ सम्यक् स्मृती :

सम्यक् स्मृती म्हणजे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे. मनाची सतत जागरूकता, अकुशल विचार मनांत उठले की त्यांच्यावर नजर ठेवणे.

◆ सम्यक् समाधी :

या सात गोष्टींना प्राप्त करावयाच्या मार्गात पाच विघ्ने येतात. ती अशी – लोभ, द्वेष, आळस, विचिकित्सा आणि अनिश्चय. त्यापासून मुक्त व्हावयाचा उपाय समाधी आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता त्यामुळे पाचही संयोजने (बंधने) स्थगित राहतात. परंतु त्यांच्यात परिवर्तन करावयास सम्यक समाधीची आवश्यकता असते. सम्यक् समाधी मनास कुशल कर्माचे एकाग्रतेने चिंतन करावयाचा अभ्यास करविते व येणेप्रमाणे अकुशल कर्माकडे आकर्षित व्हावयाच्या प्रवृत्तीस समाप्त करते. सम्यक समाधी मनास सदा सर्वदा कुशल विचार करण्याची सवय लावते.

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – १५

प्रश्न ६६ : भगवंतांनी पंचवर्षीय भिक्खूना शील आणि सदगुणाचा पारमितेचा मार्ग कशा प्रकारे शिकविला?

उत्तर : शील मार्गावर जाताना “१. शील, २. दान, ३. उपेक्षा (उपेक्खा), ४. नैष्कर्म्य, ५. वीर्य, ६. शांती (खान्ती), ७. सत्य, ८. अधिष्ठान, ९. करुणा, १०. मैत्री” या दहा सदगुणांचा अभ्यास आणि विकास करावा लागतो.

शील म्हणजे नैतिकता, अकुशल न करण्याची प्रवृत्ती व कुशल करण्याची प्रवृत्ती, दुष्ट कर्मापासून भय आणि लज्जा! शील म्हणजे पापभीरूता. दान म्हणजे कसलीही अपेक्षा न करता दसन्याचे भले करणे. उपेक्षा म्हणजे अनासक्ती! याचा अर्थ इतरांच्या सुख – दुःखाविषयी निरपेक्ष भाव नव्हे. ही चित्ताची अवस्था आहे. ज्यात प्रिय – अप्रिय काहीही नसते. फळ काहीही असो. त्याविषयी निरपेक्ष राहन साधना करण्यात मग्न राहणे. नैष्कर्म्य म्हणजे सांसारिक काम, भोगांचा त्याग! वीर्य म्हणजे सम्यक प्रयत्न! जो उत्तम संकल्प केला त्यास पूर्ण करावयास संपूर्ण सामर्थ्यानिशी प्रयत्न करणे आणि त्यास पूर्ण केल्याशिवाय मागे वळून न पाहणे. शांती म्हणजे क्षमा शीलता, घृणा न करणे आणि पृणेच्या मोबदल्यात क्षमा शीलता दाखविणे. सत्य म्हणजे कधीही खोटे न बोलणे. अधिष्ठान म्हणजे आपल्या उद्देशापर्यंत पोहचविण्याचा दृढ निश्चय! करुणा म्हणजे मानवाविषयी प्रेमपूर्ण दया, मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी भ्रातृभावना मित्रांसाठीच नव्हे तर शत्रूविषयी देखील भ्रातृभावना!

प्रश्न ६७ : पंचवर्गीय भिक्खूनी बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली?

उत्तर : जगाच्या इतिहासात अभूतपूर्व अशा धम्माची शिकवण भगवंतानी त्यांना दिली. यापूर्वी अशी शिकवण त्यांना कोणीही दिली नव्हती. त्याची विशेषता अशी :- दुखाचा विनाश हा धम्माचा वास्तविक उद्देश आहे, असे त्यापूर्वी कोणीही प्रतिपादन केलेले नव्हते. तो मुक्तीचा अत्यंत सरळ मार्ग होता; ज्याला अपौरुषेय शक्तींच्या मदतीची गरज नव्हती. ज्यासाठी आत्मा किंवा परमात्मा यांवर विश्वास करावयाची आवश्यकता नव्हती आणि ज्याला मोक्ष लाभाकरिता मरणोत्तर जीवनावर विश्वास करावयाचीही गरज नव्हती.

तो असा धर्म होता. ज्याचा ईश्वर वचनाशी किंवा ईश्वराच्या आज्ञेशी कसलाही संबंध नव्हता. ज्यात केवळ मानवाच्या सामाजिक गरजा पूर्ण करावयास आवश्यक असणाऱ्या अनुशासनासच ‘धर्म’ असे नाव दिलेले होते. ‘मोक्ष’ म्हणजे असे सुख जे मानव धर्मानुसार आचरण केल्याने ह्या पृथ्वीवरच प्राप्त होऊ शकते. असे यापूर्वी कुणीही प्रतिपादित केलेले नव्हते. भगवंतांच्या धम्माच्या या अभूतपूर्व गुणांमुळे पंचवर्गीय भिक्खूनी बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली.

प्रश्न ६८ : पंचवर्गीय भिक्खूनंतर कोण कोण त्यांचे धर्मानुयायी झालेत?

उत्तर : वाराणशीचा यश नावाचा एक श्रीमंत तरुण उपासक व श्रीमंत व्यापारी असलेला त्याचा पिता! त्यावेळी यशाला विरक्तीने पछाडलेले होते व त्यामुळे त्याला सगळीकडे दुःखच दुःख दिसू लागले. फिरत फिरत तो ऋषिपतनास गेला. तेथे भगवंताने आदल्या दिवशीच पंचवर्गीय भिक्षूना उपदेश दिलेला होता. त्यांनी त्याला ही धर्मोपदेश केला. यशाने त्यांना याचना केल्यावर भगवंताने त्याला भिक्खू धम्माची दीक्षा दिली. तीन महिन्यांतच त्यांच्या धर्मानुयायांची संख्या साठपर्यंत गेली.

यशाची आई आणि त्याची पत्नी या धम्माच्या प्रथम उपासिका होत. प्रथम साठ भिक्खू मध्ये यश आणि त्याचे चौपन्न मित्र होते. त्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांना बोलावून घेतले. त्यांना धम्माविषयी पूर्ण माहिती दिली आणि त्यांना आपल्या धम्माचा प्रचार करण्याकरिता चहूकडे पाठवून दिले. जे वैदिक धर्मीय नव्हते. त्यांना ब्राह्मणी धर्म स्वीकारावयास मनाई होती. (विरुद्ध धर्मीयांना हिंदू धर्मात प्रवेश करावयास मनाई होती.) यास्तव प्रचारकांद्वारे प्रसारित केलेला बौद्ध धम्म हाच जगातील सर्वात जुना धर्म आहे, असे म्हणावे लागेल. पूर्वीच्या धर्म प्रचारकांनी (म्हणजे भिक्खूनी) अनेक प्रकारचे कष्ट, छळ आणि निर्दयपणा अतिशय धैर्याने सहन केला.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *