बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – ६
प्रश्न २५ : कपिलवस्तू मधून सिद्धार्थाने कोठे प्रयाण केले?
उत्तर : सिद्धार्थ कपिलवस्तु नगरीपासून फार दूर अनोमा (ओनामा) नदीकडे गेला. परंपरागत कथा अशी आहे की, तेथे त्याने आपले सुंदर लांब केस तलवारीने कापून काढले संन्याशाचा पिवळा वेष धारण केला. आपले अलंकार व प्रिय घोडा कंथक यास छन्नाकडे सोपवून शुद्धोदन राजाकडे परत जाण्याची त्याला आज्ञा केली. त्याचे केस केवळ दोन बोटे लांब राहून उजवीकडे वळून डोक्याला चिपकून गेले व त्यानंतर जीवनभर केसांचे परिमाण तेच राहिले.
आज काल अफ्रिकेतील निग्रो लोकांचे केसही तसेच कुरळे पाहावयास मिळतात व त्यांची वाढ होत नाही. कपिलवस्तू मधून सिद्धार्थ राजगृह या बिंबिसार राजाच्या राजधानीच्या शहरी पायीच गेला. तेथून जवळच असलेल्या पांडव पर्वताच्या पायथ्याशी एक लहानशी पर्णकुटी बांधली. कपिलवस्तू ते राजगृह हे ४०० मैलांचे अंतर तो पायीच चालत गेला.
प्रश्न २६ : बिंबिसार राजाने सिद्धार्थास परिव्राजेचा त्याग करावयास विनंती करून काय देऊ केले?
उत्तर : राजगृह या शहराच्या बाहेर झोपडी बांधल्यावर सिद्धार्थ भिक्षेकरिता राजगृहास पायीच जात असे. त्याचे भव्य आणि आकर्षक व्यक्तित्व पाहून तेथील प्रजेत फार कुतूहल उत्पन्न झाले. तेव्हा राजा बिंबिसार याला समजले की, ज्याच्या विषयी अशी भविष्य वाणी केली गेली होती की, तो एक तर चक्रवर्ती राजा होईल किंवा जगास ज्ञानाचा प्रकाश दाखविणारा ‘बुद्ध’ होईल. तोच सिद्धार्थ गौतम परिव्राजक झालेला आहे. तेव्हा त्याच्या पर्णकुटीवर जाऊन बिबिसाराने त्यास आपले अर्धे राज्य देऊ केले व परिव्रजा सोडून देण्याची विनंती केली.
प्रश्न २७ : सिद्धार्थाने बिंबिसारास काय उत्तर दिले?
उत्तर : बिबिसाराने सिद्धार्थास असा उपदेश दिला की – तारुण्यामध्ये काम भोग योग्य आहे. मध्यम वयीन, वयस्करांसाठी धन प्राप्ती च वृद्धांसाठी धर्माजन, म्हातारपणी पुण्य करून माणूस धर्मार्जन करू शकतो. त्यावर सिद्धार्थाने उत्तर दिले की, विषय सुखाची कामना करणाऱ्याच्या वासनेचे शमन कधीच होत नाही. मार्ग लोकच नव्हे तर दिव्य लोकांत हीं माणसाच्या मनाची तृप्ती कधीच होत नसते. समुद्राने वेढलेल्या विस्तीर्ण भू – प्रदेशांवर कायम केल्यावर राजे लोक प्रभुसत्ता होता, कायम केल्यावर राजे लोक तुप्त न होता.
समुद्राच्या दुसऱ्या भागावरीत भूप्रदेश काबीज करावयाची कामना करतात. मी रागामुळे, इर्षामुळे किंवा प्रलोभनामुळे गृहत्याग केलेला नाही. बालक असो, तरुण असो किंवा वृद्ध असो. त्याने करुण्यावर धर्मचारण करायला हवे. बोलण्यावर अपिष्ठित असे धर्माचरण करायला हवे. मी ह्या जगातील कलह पाहून मर्माहत झालो आहे. मी शांतीचा शोधात आहे आणि दुखाचा अंत कसा होईत? याचा मार्ग शोधत आहे. (ही कथा सुत्तनिपातातील पब्बजा सूत्रात दिली आहे.)
प्रश्न २८ : राजगृहास गेल्यावर सिद्धार्थाने काय केले?
उत्तर : राजगृहास गेल्यावर सिद्धार्थाने जवळच असलेल्या पांडव पर्वताच्या पायथ्याशी लहानशी पर्णकुटी बांधली. कपिलवस्तू ते राजगह हे ४०० मैलाचे अंतर तो पायीच चालत गेला. त्यानंतर तो उरुवेलेस सध्याच्या बुद्ध गयेतील महाबोधी मंदिराजवळ गेला. तेथीत अरण्यामध्ये अत्यंत विद्वान तपस्वी राहत होते.
ज्या ज्ञान प्राप्तीच्या शोधात तो निघाला होता ती मिळविण्याच्या आशेने पुढे तो त्यांचा विद्यार्थी झाला. त्याने त्यांच्या पद्धती ग्रहण केल्या आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या तपश्चर्याचा अभ्यास केला. परंतु तसे केल्यावर ही राज कुमाराला काहीच लाभ झाला नाही व मानवी दुःखाचे मूळ आणि पूर्णतः मुक्तीचा मार्ग गवसला नाही. ते उरलेले जवळ असलेल्या एका दूरच्या अरण्यात निघून गेले आणि कडकडीत वृत्त नियमांनी आपली शरीर शुद्धी करण्यासाठी कडक शिस्तीचे पालन करून त्यांनी सहा वर्षे महान तप केले.
प्रश्न २९ : सिद्धार्थाने गृहत्याग केल्यानंतर कोलीय आणि शाक्य यांच्यात समेट पडून आला काय?
उत्तर : होय. कोलियांशी युद्ध न व्हावे. यासाठी शाक्यनी बरेच आंदोलन केले आणि शाक्य संघाने समोपचाराने वाद मिटविला. हा समाचार सिद्धार्थास राजगृहात असताना पंचवर्गीय भिक्खुं कडून समजला.
प्रश्न ३० : शाक्य आणि कोलीय यांच्या मधील वाद मिटल्यानंतर देखील सिद्धार्थाने परिव्रजेचा त्याग का केला नाही?
उत्तर : ही गोष्ट सत्य होती की, शाक्य आणि कोलीय यांच्यातील वाद व त्यामुळे उद्भवणारी युद्धाची परिस्थिती यामुळे सिद्धार्थाने गृहत्याग केलेला होता. परंतु बराच विचार केल्यावा त्यास असे आढळले की, संपर्ष आणि विरोध यांचे मूळ केवळ वेगवेगळ्या जाती व राजे रजवाडे यांच्यातच नव्हे, तर क्षत्रियांमध्ये, ब्राह्मणांमध्ये, गृहस्थांमध्ये, माता आणि पुत्र, पुत्र आणि पिता, भाऊ आणि बहीण, मित्र आणि मित्र इत्यादी सर्वांमध्ये स्थायी स्वरूपात असतेच. जगातील कष्ट आणि दुःख यांच्या मुळाशी हा वर्ग संघर्षच आहे व या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे मूळ शोधून काढावयाचा सिद्धार्थाने निर्धार केला.
बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – ७
प्रश्न ३१ : ज्ञान प्राप्तीसाठी सिद्धार्थाने कोण कोणते प्रयत्न केले?
उत्तर : सिद्धार्थाने प्रथम उरुवेला येथील तपस्व्यांसोबत तपश्चर्या सुरू केली. तपस्वी देहदंडाची व आत्म क्लेशाची उग्र तपश्चर्या करीत असत. यामुळेच मनुष्यास पूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकते, असे ते म्हणत. सिद्धार्थाने त्यांच्या सर्व पद्धती आत्मसात केल्या. त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. यामुळे ते त्यास गुरू मानू लागले. परंतु असे केल्यावर ही राजकुमारास काहीच ज्ञान लाभ झाला नाही आणि मानवी दुःखाचे मूळ किंवा पूर्णतः मुक्तीचा मार्ग गवसला नाही.
प्रश्न ३२ : सिद्धार्थाने कोण कोणत्या ऋषींजवळ तपश्चर्येचे शिक्षण घेतले?
उत्तर : राजगृह नगरीस सोडून सिद्धार्थ प्रथम भृगू ऋषींच्या आश्रमात गेला तेथे स्वर्ग प्राप्तीसाठी नाना प्रकारची तपस्या करणारे तपस्वी त्यास दिसले. तेथे काही जन कंदमुळे व फळे खाऊन राहत असत. काही जन पक्षांप्रमाणे दाणे वेचून खात, काही जन गवत खाऊन तर काही जण दातांनी कच्चे पदार्थ चावून खात. काही जण सतत पाण्यात राहत असत. याप्रमाणे कष्ट सहन केल्याने स्वर्ग लाभ होतो आणि कष्ट सहन केल्यानेच (देह दंडानेच) पुण्य लाभ होतो, अशी त्यांची धारणा होती. त्यानंतर सिद्धार्थ विध्य प्रदेश मार्गे वैशाली मध्ये राहत असलेल्या आलार कालाम या ऋषीकडे गेला. तेथे त्याने सांख्य दर्शनाचे सिद्धान्त ग्रहण केले.
प्रश्न ३३ : सिद्धार्थाने ध्यान मार्गाचे शिक्षण कोणाजवळ घेतले?
उत्तर : आलार कालामाने सिद्धार्थाला ध्यान मार्ग शिकविला, आकिंचन्यायतन नावाची समाधी शिकविली. त्याच्या सात पायऱ्या होत्या. त्या सर्व त्याने आत्मसात केल्या.
श्वासोच्छ्वासाच्या तीन पद्धती होत्या. :- (१) आनापानसती म्हणजे श्वासाला नियंत्रणात ठेवणे., (२) प्राणायाम म्हणजे पूरक, कुंभक आणि रेचक यांवर नियंत्रण आणि (३) समाधी मार्ग! त्यानंतर सिद्धार्थ उदक रामपुत्र नावाच्या ऋषीकडे गेला आणि ध्यान करावयाची आठवी पायरी देखील आत्मसात केली. याप्रमाणे कोसल जनपदातील दोन्ही महान आचार्याकडून ज्ञान प्राप्त केल्यावर सिद्धार्थ मगध राज्यात गेला व तेथील ध्यान पद्धती आत्मसात केली. त्यानुसार श्वासाचे पूर्णतः निरोधन करून एकाग्रता साधावयाची असे. ही अत्यंत वेदनादायी पद्धती होती परंतु सिद्धार्थाने तिला ही आत्मसात केले.
प्रश्न ३४ : सिद्धार्थाने ब्राह्मणांच्या तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले होते काय?
उत्तर : होय. त्यावेळी ब्राह्मणांच्या तत्त्वज्ञानाचे (Philosophy) चार प्रमुख आधार स्तंभ होते. :-
(१) वेद पवित्र आहेत व ते अपौरुषेय आहेत.
(२) जन्म, मरणाच्या फेऱ्यापासून आत्म्याची मुक्ती वैदिक यज्ञयाग केल्याने व ब्राह्मणांना दान दिल्याने होऊ शकते. चातुर्वर्ण्य ही आदर्श समाज रचना होय. (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र)
(३) चार आश्रम हीच आदर्श जीवन रचना होय. (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्था श्रम, वानप्रस आणि संन्यासाश्रम)
४) कर्मवादाचा सिद्धान्त म्हणजे मागील जन्मी केलेल्या कर्मानुसार आत्मा पुढील जन्म ग्रहण करतो.
प्रश्न ३५ : सिद्धार्थाचे वेदांविषयी काय मत होते?
उत्तर : वेदांना ‘अपौरुषेय’ मानल्याने विचार स्वातंत्र्यास तिलांजली देण्यासारखेच आहे, असे सिद्धार्थाचे मत होते. वेद म्हणजे मंत्र आणि ऋचा किंवा स्तुती काव्यांचा संग्रह होय. या ऋचांचे उच्चारण व पठण करणाऱ्यांना ‘ऋषी’ असे म्हणत. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ब्रह्म इत्यादी देवांना संबोधून केलेली काव्य रचना व प्रार्थना होय. शत्रूपासून रक्षण किंवा शत्रू विरुद्ध सहाय्य किंवा धन प्राप्त करावयासाठी ह्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यासाठी भक्तजनांपासून भोजन, मांस आणि सुरा देवांनी स्वीकार करावी, असे आवाहन प्रार्थनांमध्ये केलेले आहे.
वेदांमध्ये तत्त्वज्ञानाचे प्रमाण फारच कमी आहे. परंतु काही ऋषींनी तत्त्वज्ञानापर काव्य रचलेले दिसते. त्यांची नावे अशी –
१) अमर्षघण
२) प्रजापती परश्रेष्ठी
३) बृहस्पती
४) अनिल
५) दीर्घतमा
६) नारायण
७) हिरण्य गर्भ
८) विश्वकर्मा
या सर्वांनी सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? वेगवेगळ्या वस्तू कशा उत्पन्न झाल्या? सृष्टी कशांत कशा प्रकारे विलीन होईल? इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह केलेला आहे.
अमर्षणाचे म्हणणे असे की, सृष्टीची उत्पत्ती ताप (तपस) पासून झाली. ब्राह्मण बृहस्पतीचे (बृहस्पतीचे) म्हणणे असे की, सृष्टी असतू मधून सत् स्वरूपात आली. कदाचित असत ह्याचा आशय अनंत असा असावा, प्रजापती परश्रेष्ठीने बृहस्पतीच्या मताचा विरोध केला व असे प्रतिपादन केले की, जल हेच सृष्टीचे मूळ होय. अनिलचे कवन असे की, वायू हेच मुख्य तत्त्व होय त्यातच गती, वेग उत्पन्न करण्याची शक्ती आहे. दीर्घतमाचे म्हणणे असे की, सर्वांचा मूलाधार सूर्य होय. नारायणाच्या मतानुसार ‘पुरुष’ सृष्टीचे मूळ कारण होय.
पुरुषापासून ‘सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल इत्यादी… आणि सर्व प्राणी व मनुष्य देखिल उत्पन्न झाले. हिरण्य गर्भाचे मत असे की, अग्नी विश्वाची उत्पादक शक्ती होय. विश्वकर्माचे मत होते की, जलापासून सृष्टीची रचना झाली. त्याचे म्हणणे असे होती की – ‘पुरुष’ आदी आणि अंत होय व त्यानेच जलापासून सृष्टीची रचना केली. सिद्धार्थास वेदमंत्रामध्ये मानवाच्या नैतीक उत्थानास सहाय्यक होणारी एकही गोष्ट दिसली नाही. त्यास वेद निष्प्रयोजन वाटले.
त्यामुळे त्यापासून ग्रहण करण्यासारखी एकही गोष्ट त्यास दिसली नाही. वैदिक ऋषींना ज्ञानाची लालसा होती व ते सत्य शोधनाच्या प्रयासात होते; परंतु त्यांना ते गवसलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान सिद्धार्थास पूर्णतः व्यर्थ स्वरूपाचे वाटले. सिद्धार्थाने बेद अपौरुषेय असल्याचे नाकारले. कोणत्याही गोष्टीचे परीक्षण करणे आवश्यक आहे, असे त्याचे मत होते. सिद्धार्थास विचार स्वातंत्र्य ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट वाटत होती.
बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – ८
प्रश्न ३६ : यज्ञयाग विषयी सिद्धार्थाचे काय मत होते?
उत्तर : सिद्धार्थाला वैदिक यज्ञ किंवा इतर धार्मिक विधीमुळे जन्म, मरणापासून मुक्ती मिळते. ही ब्राह्मणी कल्पना मान्य नव्हती. यज्ञाची व्याख्या करताना त्याने ‘खरे यज्ञ’ आणि ‘खोटे यज्ञ’ असे स्पष्ट विभाजन केले. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी केलेला ‘आत्म परित्याग’ हाच खरा यज्ञ होय, असे सिद्धार्थाचे मत होते. कोण्या देवतेला प्रसन्न करावयास करण्यात येणाऱ्या यज्ञास खोटा यश, असे म्हणून त्याने त्याची निंदा केली.
प्रश्न ३७ : सिद्धार्थांच्या काळी चातुर्वर्ण्य व्यवस्था प्रभावी होती काय?
उत्तर : होय. ब्राह्मणवादानुसार असलेली चातुर्वर्ण्याची समाज व्यवस्था सिद्धार्थास पूर्णतः अनैसर्गिक वाटत होती. कोणी तरी समाजावर लादलेल्या हुकूमानुसार ती व्यवस्था होती. परंतु सिद्धार्थ स्वतंत्र समाज व्यवस्थेचा समर्थक होता. ब्राह्मणवादी समाज रचना गतिशील समाज रचना नव्हती जन्माच्या वेळी मिळालेला विशिष्ट दर्जा (ब्राह्मण किंवा वैश्य वगैरे) त्या व्यक्तीचा कायमचा दर्जा असे. कोणी कितीही पुण्य कर्म केले किंवा कितीही पाप कर्म केले तरी त्याचा दर्जा बदलत नसे. त्यामुळे गुणांची पूजा होत नसे किंवा त्यात विकास घडवून आणावयाची शक्यता नसे.
प्रत्येक समाजात असमानता आहे; परंतु त्या असमानतेस धार्मिक मान्यता नाही. ब्राह्मणवादाने समानतेचा सिद्धान्त कधीही स्वीकार केला नाही. कारण तो समानतेच्या सिद्धान्ताचा शत्रू आहे. चार ही वर्णाचे व्यवसाय निश्चित केले होते व निवड करावयाची कोणास ही स्वतंत्रता नव्हती. सिद्धार्थास चातुर्वर्णाचे तत्त्वज्ञान पूर्णत: चुकीचे वाटले. कारण चातुर्वर्णाचा उद्देश्य चातुर्वर्णाचा कमजोर वर्गाला दाबून त्यांचे शोषण करणे हाच होता.
शूद्र आणि स्त्रिया सर्वथा शक्तिहीन होत्या. त्यांना ज्ञान प्राप्त करावयाचा देखील अधिकार नव्हता, सिद्धार्थास ठाऊक होते की, चातुर्वणी समाज रचने मध्ये सुधार करणे शक्य नव्हते. कारण तिला ‘ईश्वर निर्मित’ मानले जात असे. म्हणून त्या समाज व्यवस्थेला पूर्णत: नष्ट करणेच आवश्यक होते.
प्रश्न ३८ : ब्राह्मणांचा कर्मवादाचा सिद्धान्त सिद्धार्थास मान्य होता काय?
उत्तर : नाही. सिद्धार्थास दिसून आले की, कर्मवादाची रचना ब्राह्मणवादातूनच झालेली आहे आणि विद्रोहाची भावना शूद्र समाजातून पूर्णत: नष्ट व्हावे यासाठीच आहे. ब्राह्मणी कर्मवादानुसार पुनर्जन्माच्या वेळी कोणता जन्म घ्यावयाचा हे मागील जन्मी केलेल्या कर्मावर अवलंबून असते.
पुनर्जन्म हा मागील जन्मीच्या कर्माचा परिणाम होय. याचा अर्थ असा की, या जन्मीच्या दुःखाकरिता पूर्वजन्मीची कर्मेच जबाबदार आहेत. विद्रोह करून देखील दुःख दूर केले जाऊ शकत नाही कारण पूर्वजन्मीच्या कर्मामुळेच असे निश्चित केलेले आहे की, या जन्मी तो दुःखीच राहील. असा कर्मवाद सिद्धार्थास मान्य नव्हता.
प्रश्न ३९ : उपनिषद विषयी सिद्धार्थांचे काय मत होते?
उत्तर : उपनिषद सुद्धा वैदिक वाङमयाचा भाग असल्याचाच समज होता. हा वेदांचा भाग नव्हे, उपनिषद श्रुतिबाह्य आहेत, परंतु त्यांना धार्मिक वाङमयाचा भाग असल्याचे मानले जात नाही. त्यांची संख्या बरीच आहे. त्यातील काही प्रमुख आहेत. काही उपनिषदाविषयी ब्राह्मण पुरोहितांमध्ये बराच विरोध होता.
तथापि सर्व उपनिषद याविषयी सहमत होते की, वैदिक अध्ययन ‘अविद्येचे’ अध्ययन होते. ते सर्व वेदांना व वैदिक ज्ञानास अपरा (निम्न स्तरीय) विद्याच मानीत होते आणि वेदांना अपौरुषेय मानीत नव्हते. तथापि उपनिषदांचा मुख्य विषय ब्रह्म आणि आत्मा असा होता. ब्रह्म हेच सर्व व्यापक तत्त्व असून त्याने सृष्टीस एकत्र बांधलेले आहे.
आत्म्यास ज्यावेळी हे ज्ञान होईल की, तो सुद्धा ब्रह्माचे स्वरूप आहे, तेव्हाच आत्म्याची मुक्ती होईल. उपनिषदाची मुख्य शिकवण अशी की, ‘आत्मा’ आणि ‘ब्रह्म’ एकच आहेत. मायेमुळे ग्रथित झाल्यामुळे आत्म्यास हा बोध होत नाही. परंतु सिद्धार्थास ‘ब्रह्माच्या वास्तविकतेचे प्रमाण मिळालेच नाही.
म्हणून त्याने उपनिषदाच्या मूलभूत पायासच अस्वीकार केले. याज्ञवल्क्य सारख्या महान ऋषींना जेव्हा विचारण्यात आले की, ‘ब्रह्म म्हणजे काय? आत्मा काय आहे?’ तेव्हा बृहदारण्यक उपनिषदात त्याचे उत्तर असे नमूद केलेले आहे की, मी जाणत नाही, मी जाणत नाही (नेति, नेति), ज्याविषयी कोणीही काहीच जाणत नाही. ती वस्तू वास्तविकता कशी असू शकेल? म्हणून सिद्धार्थाने उपनिषदांना शुद्ध काल्पनिक मानले.
प्रश्न ४० : सिद्धार्थाने कपिल मुनीच्या सांख्य मताचे अध्ययन केले होते काय?
उत्तर : होय. प्राचीन तत्त्वज्ञानी लोकांमध्ये कपिलमुनी सर्वांत प्रमुख होते. त्यांचे तत्त्वज्ञान सांख्य तत्त्वज्ञान या नावाने ओळखले जाते. त्याचा प्रथम सिद्धान्त असा की, सत्यासाठी प्रमाण आवश्यक आहे. प्रमाणाशिवाय सत्याचे अस्तित्व नाही. सत्याला सिद्ध करावयास केवळ दोनच प्रमाण मान्य केले जाऊ शकतात. : १) प्रत्यक्ष व २) अनुमान!
प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रियांच्या माध्यमाने विद्यमान वस्तूची चित्तास ओळख करून देणे. अनुमान प्रमाण तीन प्रकारचे आहेत. :-
◆ कारणामुळे कार्याचे अनुमान. जसे ढगांच्या अस्तित्वामुळे पावसाचे अनुमान लावू शकतो.
◆ कार्याने कारणाचे अनुमान. जसे जर नदीला पूर आलेला दिसत असेल तर वरच्या प्रवाहाच्या प्रदेशात पाऊस पडलेला असावा, असे अनुमान लावू शकतो.
◆ सामान्यतः दृष्टीस पडणाऱ्या गोष्टीवरून अनुमान. जसे आकाशात तारे भिन्न भिन्न ठिकाणी गेलेले पाहून आपण असे अनुमान लावतो की, तारे स्थान परिवर्तन करतात.
कपिलमुनीला सृष्टिकर्त्यांचे अस्तित्व मान्य नव्हते. त्यांचे असे मत होते की, उत्पन्न वस्तू आधीपासून आपल्या कारणामुळे विद्यमान असते जसे मातीपासून भांडे बनते किंवा धाग्यापासून कपडा बनतो. नवीन उत्पत्ती कधीच होत नसते. तसेच असत्य हे कोणत्याही कार्याचे कारण होऊच शकत नाही. या जगाचे मूळ स्रोत (उत्पत्तीस कारण) दोन आहेत. : – (१) व्यक्त आणि (२) अव्यक्त (अविकसित) दुसरा तर्क असा की, कार्यास आपल्या कारणाहून भिन्न असायलाच पाहिजे.
कपिल ऋषीचे म्हणणे असे होते की, अव्यक्त (अविकसित), वस्तूची व्यक्त (विकसित) वस्तूंमध्ये परिणती ज्या तीन गुणांमुळे होते. ते असे. :- सत्त्व, रज आणि तम. सत्त्व गुण सृष्टीमध्ये प्रकाशाप्रमाणे आहे. जो प्राणिमात्रास सुख देतो. रजगुण प्रेरित करतात, संचारित करतो. तो क्रिया शीलतेस कारण होतो.
तमोगण वजनीपणाचे द्योतक आहे, वस्तूचे द्योतक आहे. तो निरोध करतो. उपेक्षा किंवा निष्क्रियता उत्पन्न करतो .या गुणाचे प्रमाण कमी, अधिक होण्यामागच कारण होय. सिद्धार्थाने त्यातील केवळ तीन गोष्टी ग्रहण केल्या. (१) सत्य प्रमाणावर आधारित असलेच पाहिजे. यथार्थतेचा आधार, बुद्धिवाद असायलाच पाहिजे., (२) ईश्वराच्या अस्तित्वास तर्कावर आधारित असे कोणतेच कारण विद्यमान नाही, (३) जगात दुःख आहे.
बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – ९
प्रश्न ४१ : तपश्येचे परीक्षण सिद्धार्थाने कोठे केले?
उत्तर : सांख्य मार्ग आणि समाधी मार्गाचे परीक्षण केल्यावर सिद्धार्थ गयेस गेला. तेथे राजर्षी नेगरी यांच्या आश्रमात व उरुवेलेस नेरंजरा नदीच्या काठावर एकांत ठिकाणी गेला. तेथे त्यास पंचवर्गीय भिक्खू भेटले. ते सिद्धार्थाची सेवा करू लागले व तो म्हणेल ते ऐकू लागले. तेथे सिद्धार्थ अत्यंत उग्र स्वरूपाची आत्म क्लेशाची तपश्चर्या आरंभ केली.
प्रश्न ४२ : संबोधी प्राप्त होण्यापूर्वी सिद्धार्थाचे पाच आचार्य होते ते कोणते?
उत्तर : बोधिसत्वाचा जन्म होताच ज्या आठ ब्राह्मणांनी येऊन त्याची लक्षणे वर्तविली होती. त्यांची नावे : राम, ध्वज, लक्ष्मण, मंत्री, यज्ञ, सुयाम, सुभोज आणि सुदत्त अशी होती. ह्या सर्वांनी ‘स्वस्ती’ सांगून सिद्धार्थाची जोपासना केली होती. हे त्याचे प्रथम आचार्य होते. बोधिसत्त्वाचा दुसरा आचार्य सब्बमित्त नावाचा ब्राह्मण होय. तो फार कुलीन अशा उच्च घराण्यातील असून शब्द शास्त्र, वैयाकरण आणि वेदांची सहा अंगे जाणणारा पंडित होता.
पिता शुद्धोदनाने त्यास पुष्कळसे धन देऊन व सोन्याच्या झारीद्वारे पाण्याने संकल्प करून कुमार सिद्धार्थाला त्याच्याकडे सोपविले होते. हा त्याचा दुसरा आचार्य होय. त्याचा तिसरा आचार्य एक देवता होती, जिने बोधिसत्त्वाच्या अंत:करणात ज्ञानाचा शोध करण्यासाठी घराबाहेर पडण्यास त्याला उद्यत आणि उत्सुक केले होते. तिचे म्हणणे ऐकून सिद्धार्थास महालात राहणे. असह्य होऊ लागले व त्याने गृहत्याग करून महाभिनिष्क्रमण केले. ही देवता तिसरा आचार्य होती. आलार कालाम बोधिसत्त्वाचा चौथा आचार्य होता. उद्दक रामपुत्र हा बोधिसत्त्वाचा पाचवा आचार्य होता.
प्रश्न ४३ : तपश्चर्येच्या वेळी सिद्धार्थाचे कोण कोण सोबती होते?
उत्तर : तपश्चर्येकरिता सिद्धार्थ उरुवेले कडील एका दूरच्या अरण्यात निघून गेला आणि कडकडीत व्रत नियमांनी आपली शरीर शुद्धी करण्यासाठी शिस्तीचे पालन करून त्याने सहा वर्षे महान तप केले. त्याच्या सोबत पाच ब्राह्मण सोबती होते. त्यांची नावे : कौडिण्य, भद्दीय, वप्प, महानाम आणि अश्वजित अशी होती. यांनाच पुढे पंचवर्गीय भिक्खू म्हटलेले आहे.
प्रश्न ४४ : सिद्धार्थ गौतमाने कशा तऱ्हेची तपश्चर्या केली?
उत्तर : सिद्धार्थाची तपश्चर्या अत्यंत उग्र स्वरूपाची होती. कधी कधी तो दोन – तीन घरीच भिक्षा मागण्यास जाई. सात घरांपेक्षा जास्त घरी जात नसे. प्रत्येक घरून दोन – तीन घासांचेच भोजन स्वीकारित असे. सात घासांपेक्षा अधिक भोजन स्वीकारित नसे. तो केवळ एक – दोन वाट्या अन्न खाऊनच उदरनिर्वाह करीत असे सात वाट्यांपेक्षा अधिक अन्न सेवन करीत नसे. तो दिवसातून एकदाच भोजन करीत असे. तर कधी कधी दोन दिवसातून एकदा असे करीत. कधी कधी सात दिवसांतून एकदाच तर कधी पंधरा दिवसांतून एकदा आणि ते सुद्धा मोजकेच अन्न ग्रहण करीत असे.
जेव्हा त्याने तपश्चर्येत अधिक प्रगती केली, तेव्हा त्याचा आहार जंगलातील केवळ हिरवी कंदमुळेच होता किंवा आपणहून उगवलेले जव किंवा धनाचे दाणे किंवा झाडाच्या सालींचे तुकडे किंवा धानाच्या आतील लाल कण किंवा उकळलेल्या तांदळाची पेज किंवा मोहरीच्या दाण्याचे चूर्ण असाच त्याचा आहार होता.
तो कंदमुळे व हवेने आपोआप खाली पडलेली जंगली फळे खाऊन राहत असे. त्याचे कपडे तागाचे किंवा कचऱ्याच्या दिगाऱ्यावर पडलेल्या चिंध्यांचे किंवा झाडांच्या सालीचे किंवा हरिणाच्या कातडीचे किंवा गवतापासून बनविलेल्या पट्टयांचे, मनुष्य किंवा जनावरांच्या केसांपासून बनविलेल्या घोंगड्यांचे किंवा गिधाडांच्या पंखांचे बनविलेले असत. तो आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढी, तो नेहमीच मांडी घालून ताठ बसत असे आणि तशाच अवस्थेत पुढे सरकत असे.
अशा प्रकारे आणि अशाच अनेक प्रकारे तो आपल्या शरीराला कष्ट व वेदना देई. आपल्या शरीराविषयी त्याने एवढी उपेक्षा दाखविली की, वर्षानुवर्षे त्याच्या शरीरावर मळाचे थर जमून पुढे ते आपोआप खाली पडू लागले होते. हिवाळ्यात अतिशय थंडीच्या आणि कृष्ण पक्षांतील अंधाऱ्या रात्री तो उघड्यावर राहत असे, तर दिवसा गडद काळोखात राहत असे. पावसाळा सुरू होताना जेव्हा भयंकर उष्मा होऊ लागे. तेव्हा तो सूर्याच्या प्रखर उन्हात व रात्री जीव गुदमरल्या जाईल. अशा गर्मीमध्ये घनघोर जंगलात राहत असे. तो स्मशानात प्रेतांच्या हाडांची उशी डोक्याखाली घेऊन झोपत असे.
शेवटी तर गौतमाने आहार अत्यंत कमी केला. दररोज एकच शेंग खाऊन पूर्ण दिवस घालवीत असे. त्यानंतर मोहरीचा एकच दाणा व नंतर तांदळाचा एकच दाणा खाऊन राहत असे. त्यामुळे त्याचे शरीर अत्यंत कृश झाले. त्याने आपल्या पोटाला स्पर्श केला असता त्याचा हात पाठीच्या बरगड्यांना जाऊन लागे आणि पाठीला स्पर्श केला असता पोटाच्या आतडीस स्पर्श होई इतके त्याचे पोट व पाठ एक झाले होते.
गौतमाची तपश्चर्या व आत्म क्लेश अशा प्रकारे अत्यंत उग्र स्वरूपाचे होते. तपश्चर्या जितकी उग्र करता येईल तेवढी त्याने केली. हे सर्व सहा वर्षांच्या दीर्घ काळापर्यंत सुरूच होते. सहा वर्षांनंतर त्याचे शरीर एवढे क्षीण झाले की, तो जागच्या जागी हालचाल ही करू शकत नव्हता. एके दिवशी त्यास एका एकी मूर्च्छा आली व तो जमिनीवर कोसळला त्याच्या सोबत्यांना तो मरण पावला असेच वाटले, परंतु थोड्याच वेळाने सिद्धार्थास चेतना आली.
प्रश्न ४५ : सिद्धार्थाने कडक तपश्चर्येचा त्याग का केला?
उत्तर : सिद्धार्थाने विचार केला की – “कडक उपोषणाने किंवा आत्म क्लेशाने ज्ञान प्राप्ती कधीही होणार नाही. मनाची दारे उघडी केल्यानेच ती होऊ शकेल. कडक उपोषणामुळे त्याला आलेले मरण त्याने नुकतेच जेमतेम टाळले होते. तथापि त्याला ज्ञान प्राप्ती झाली नव्हती. खरी शांती व चित्ताची एकाग्रता शरीराची नैसर्गिक गरज भागविल्यानेच प्राप्त होऊ शकते.”
असा त्याने विचार केला व म्हणून सिद्धार्थाने अन्न ग्रहण करण्याचा निश्चय केला. जेणे करून ज्ञान प्राप्ती होईपर्यंत तरी त्याला जगता यावे. ध्यान मार्गाने जाऊन चिंतन करूनच दुःख मुक्तीचा मार्ग सापडू शकेल. असे त्यास वाटू लागले. म्हणून त्याने तपश्चर्येचा त्याग केला. (मझिम निकाय मधील महासचक सुत्त) त्यानंतर सिद्धार्थाने काही दिवस मिताहार करुन पूर्वीची शारीरीक शक्ती पुन्हा मिळविली. (बुद्ध लीला. १३६)
बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – १०
प्रश्न ४६ : तपश्चर्येचा त्याग केल्यावर सिद्धार्थास प्रथम अन्न दान कोणी दिले?
उत्तर : त्यावेळी उरुवेलेमध्ये सेनानी नावाचा गृहस्थ राहत होता. त्याच्या कन्येचे नाव सुजाता असे होते. तिने न्यग्रोध वृक्षाला नवस केला होता की, जर तिला पुत्र लाभ झाला तर प्रत्येक वर्षी ती त्याला नैवेद्य चढवील. तिची ही इच्छा पूर्ण झाल्यामुळे तिने आपल्या पुण्णा नावाच्या दासीला न्यग्रोध वृक्षाखाली पूजेची जागा तयार करण्यास पाठविले होते. तेथे गौतमाला बसलेला पाहून पुण्णाला वाटले की, वृक्ष देवताच साकार झालेली आहे.
सुजातेला हे समजल्यावर ती स्वतःच तेथे गेली व तिने स्वत: बनविलेली खीर सुवर्ण पात्रामध्ये सिद्धार्थ गौतमाला अर्पण केली. सिद्धार्थाने त्या खिरेचा स्वीकार केला आणि जवळच्या सुपति (नेरंजरा) नावाच्या नदीवर स्नान करून खीर ग्रहण केली. अशा प्रकारे सिद्धार्थाच्या तपश्चर्येचा शेवट झाला. खीर खाल्यानंतर त्याने सुवर्ण पात्र नेरंजरा नदीत फेकून दिले. ते पात्र ‘काळ’ नावाच्या नागराजाच्या महालाजवळ जाऊन नदीच्या डोहात बुडून गेले. त्यानंतर सिद्धार्थाने काही दिवस मिताहार करुन पूर्वीची शारीरीक शक्ती पुन्हा मिळविली. (बुद्ध लीला १३६)
प्रश्न ४७ : सर्वात फलदायी अन्न दान कोणते?
उत्तर : भगवंताचे महापरिनिर्वाण निकट आहे, असे त्यांनी जेव्हा जाणले. तेव्हा त्यांनी आयुष्यमान आनंदास, “चुन्द लोहाराला लोकांनी दूषण देऊ नये. याकरिता स्पष्ट केले.” ही दोन अन्नदाने समान फलदायी आणि दुसऱ्या कोणत्याही अन्नदानापेक्षा अतीव लाभदायक आहेत.
पहिले अन्न दान म्हणजे जेव्हा तथागतांनी परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती केली ते आणि दुसरे अन्नदान म्हणजे जेव्हा त्यांच्या ऐहिक अस्तित्वाचा मागमूस ही मागे शिल्लक न राहता त्यांनी अंतिम निर्वाणात पदार्पण केले. तेही दोन अन्नदान समान फलदायी व समान लाभदायक अशा एकाच योग्यतेची असून दुसऱ्या कोणत्याही अन्नदानापेक्षा अधिक फलदायी व अधिक लाभदायक आहेत.
प्रश्न ४८ : उपोषण सोडल्यानंतर सिद्धार्थाने काय केले?
उत्तर : मनाचा पक्का निर्धार करून तो उरुवेलेहून निघाला आणि राज मार्गाने वाटचाल करीत करीत गयेस पोहोचला. तेथे एक चांगल्यापैकी पिंपळाचा वृक्ष त्यास दिसला. त्या पिंपळाच्या वृक्षाखाली (अश्वत्थ वृक्ष) पूर्वेकडे तोंड करून मांडी घालून तो बसला. चित्त मलाचा क्षय करावयास ऋषिमुनी बहुधा पूर्व दिशाच निवडीत असत.
ध्यान करावयास बसण्यापूर्वी सिद्धार्थाने इतकी भोजन सामग्री एकत्र केली की, जी त्यास चाळीस दिवसांपर्यंत पुरेल. सुजातेपासून खीर ग्रहण केल्यावर त्याच रात्री सिद्धार्थाला पाच स्वप्ने पडलीत. त्यांचा त्याने असा अर्थ काढला की, प्रयत्नांती त्याला सम्बोधि अवश्य प्राप्त होईल. त्याने निश्चय केला की, शरीरातील सर्व रक्त आणि मांस सुकून गेले तरी सुद्धा ‘बोधी’ प्राप्त होईपर्यंत तो त्या जागेस सोडणार नाही.
असे म्हणतात की, काळ नावाचा नागराजा व स्वर्ण प्रभा नावाची त्याची पत्नी पिंपळाच्या झाडाजवळ आले आणि प्यानस्थ बसलेल्या सिद्धार्थाची स्तुती करून तो निश्चितच बोधी प्राप्त करेल, अशी शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली. तो दृढ आसन लावून बसलेला असताना वाईट चेतना आणि वाईट विचार एकामागून एक त्याच्या मनावर आक्रमण करू लागले. यालाचा पौराणिक भाषेमध्ये ‘मार पुत्रांचे आक्रमण’ म्हटलेले आहे.
सिद्धार्थास भीती वाटू लागली की, त्या वाईट विचारांचे जर त्याने नियंत्रण केले नाही तर त्याची साधना विफल होऊ शकेल. त्याला माहीत होते की, मार युद्धामध्ये पुष्कळसे ऋषिमुनी पराजित झाले होते. तेव्हा त्याने आपले संपूर्ण साहसपणाला लावून मनाचा निर्धार केला की – “माझ्या मध्ये श्रद्धा आहे. प्रज्ञा बल आहे. दृढ संकल्प आणि कर्तृत्व आहे. तेव्हा मी माराच्या आक्रमणास भिणार नाही.”
प्रश्न ४९ : ज्ञान प्राप्तीपूर्वी सिद्धार्थास कसा अनुभव आला व त्यास ज्ञान प्राप्ती कशी झाली?
उत्तर : ज्ञान प्राप्तीसाठी सिद्धार्यास चार आठवडे सतत ध्यान मग्न राहावे लागले. त्याला शेवटच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यास चार अवस्था पार कराव्या लागल्या. पहिली अवस्था वितर्क आणि विचार प्रधान होती. एकान्तवासामुळे त्याने तिला सरलतेने प्राप्त केले. दुसऱ्या अवस्थेमध्ये एकाग्रता आली. तिसऱ्या अवस्थेमध्ये समचित्तता आणि जागरूकतेचा समावेश झाला. चवथ्या आणि अंतिम अवस्थेमध्ये समचित्ततेचा व पवित्रतेचा संयोग आणि समचित्तता व जागरूकतेचा संयोग झाला. याप्रमाणे चार आठवडे सतत चिंतन करीत राहिल्याने अविद्येचा नाश होऊन प्रकाश प्रकट झाला.
सिद्धार्थ बोधिसत्व होता म्हणजेच ज्ञान प्राप्तीकरिता प्रयत्नशील होता. चौथ्या आठवड्याच्या अंतिम रात्री वासनांचा समूळ नाश कसा करावा? ह्याचा मार्ग सापडला. दुसन्या दिवशीच्या प्रातःकाळी जणू फुलणाऱ्या कमळाप्रमाणे त्याचे चित्त विकसित झाले. सम्यक् सम्बोधी प्राप्त होऊन चार आर्यसत्यांचे आणि प्रतित्यसमुत्पाद सिद्धान्ताचे ज्ञान झाले. सिद्धार्थ सम्यक संयुद्ध झाला. त्यावेळी त्याचे वय ३५ वर्षांचे होते.
तो दिवस बुधवार वैशाखी पौर्णिमेचा असून ते इ. स. पूर्व ५२८ वे वर्ष होते. ज्याप्रमाणे उषा कालीन सूर्य रात्रीच्या अंधकारास दूर पळवितो आणि वृक्ष, शेते, खडक, सागर, नद्या, प्राणी, मानव आणि सर्वच वस्तूंना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे त्याच्या चित्तांत ज्ञानाचा पूर्ण प्रकाश फाकला आणि मनुष्याच्या दुःखाची कारणे व ती दुःखे दूर करावयाचा मार्ग त्याने एकाच दृष्टीक्षेपात पाहिला. यापुढे त्याला संबुद्ध, तथागत, सुगत, धर्मराज, मारजित, जीन इत्यादी नावांनी ओळखत.
प्रश्न ५० : ज्ञान प्राप्तीसाठी भगवंताना कशा तऱ्हेचा मानसिक त्रास सहन करावा लागला?
उत्तर : त्यांना पराकष्ठेचे व भयंकर मानसिक श्रम करावे लागलेतत. सत्य शोधण्याच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या स्वतःच्या शरीरामधील सर्व नैसर्गिक दोषांशी, मानवी अंतवासनेशी, इच्छा शक्तीशी त्यांना झगडावे लागले. सभोवतालच्या पापी जगामधील सर्व अकुशल शक्तींना पराजित करावे लागले. ज्याप्रमाणे एखादा सैनिक जीवावर उदार होऊन युद्धात पुष्कळ शशी एकटाच लढतो. त्याप्रमाणे ते लढले. एखाद्या विजयी वीराप्रमाणे त्यांनी आपले लक्ष्य गाठले आणि त्यामुळे मानवी दुःखाचे रहस्य बाहेर पडले. ह्यालाच ‘मारावरील विजय’ म्हणतात.
2 Comments