Unlock the secrets to academic success with enlightening Buddha tales in Marathi. Explore timeless wisdom and strategies for excelling in every exam.
उच्च विचार येण्याआधी काही कर्म करणे आवश्यक असते. या विचाराची गहनता समजून-उमजून घेण्यासाठी तुम्ही एक दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणारे सर्व विचार एका कागदावर लिहून पाहा.
Buddha tales in Marathi
तेव्हा तुम्हांला समजेल, की विशेष कर्मांअभावी मनात कशा प्रकारचे विचार येतात. आपण आपलेच विचार कागदावर लिहून नंतर तेच वाचले तर एक सामान्य माणूस किती निद्रिस्त किंवा संभ्रमित असतो, हे आपल्याला समजेल. एक निद्रिस्त व्यक्ती जेव्हा विचार करते, तेव्हा काय विचार करत असेल, याची जाणीव तुम्हांला असेलच. गौतमांनी संकल्प करण्याचा विचार केला, कारण ते जागृत होते.
आपण भगवान बुद्धांची कथा वाचतो, तेव्हा या प्रचलित व्यवहारी भाषेत किंवा कर्ताभाव (डूअर) असलेल्या भाषेतच आपण ती समजून घेतो. बुद्धांनी असा विचार केला, तसा विचार केला, असे आपण समजतो. मात्र, जेव्हा ज्ञानप्राप्ती होते, तेव्हा ‘असं झालं, असा विचार आला’ (इट हॅपन्ड) असे उमगते. तेव्हा कर्ताभावातून श्रेय घेण्याचा प्रश्नच उरत नाही.
सर्व काही घडत असते. घडवणारा विलीन होतो. या शरीराचा मृत्यू झाला तरी हरकत नाही. पण सत्यप्राप्ती होईपर्यंत मी डोळे उघडणार नाही, हात-पाय न हलवता बसून राहीन, असा संकल्प बुद्धांनी केला. ते असे करू शकले, कारण तोपर्यंत केलेल्या साधनेद्वारे कर्मबंधन आणि चित्तवृत्ती यांवर मात करून गौतम मुक्त झाले होते. त्यामुळेच ते असा दृढ संकल्प करू शकले.
अन्यथा एखादी सामान्य व्यक्ती असा विचार करूच शकत नाही. समजा, विविध चित्तवृत्तींत अडकलेल्या व्यक्तीच्या मनात जर असा विचार आला, तर नाना प्रकारची भीतीही त्याच्या मनात उत्पन्न होते. मला सत्य मिळाले नाही तर काय होईल? जर असे बसलो असताना मनरूपी साप-विंचांनी सतावले तर काय होईल? असे विविध विचार सामान्य माणसाला भेडसावतात.
गौतमांनी सहा वर्षे केलेल्या तपसाधनेतून त्यांचे शुद्धीकरण झाले होते. अर्थात तपसाधनेसाठी तुम्ही किती काळ व्यतीत केला आहे, हे महत्त्वपूर्ण नाही, तर त्याला योग्य दिशा मिळणेही आवश्यक आहे. एवढ्या तपानंतर गौतम आतून रिक्त झाले होते. त्यामुळेच ते संकल्प करून बसू शकले.
माणसाला आतून रिक्त होणे आवडत नाही, हीच दुःखदायक बाब आहे. जेव्हा आतून रिक्त होणे मनुष्याला आवडते, तेव्हा वास्तवात ते सुखच असते. ज्या वेळी ही रिक्तता आपल्याला मुक्त करते, ती ‘तेजुख’ (सुख-दुःखापलीकडील) अवस्था असते. खरे तर गौतम तोपर्यंत आतून शंभर टक्के रिक्त झालेले नव्हते.
त्यांच्यात अद्यापही काही विकार वृत्ती शिल्लक होत्या. पण त्या इतक्या कमी झाल्या होत्या, की त्यांच्यात असे उच्च संकल्प निर्माण झाले आणि ते पूर्णही करू शकले. हे खरे सौंदर्य आहे. ध्यानात जास्तीत जास्त काळ व्यतीत करण्याचा दृढ संकल्प करण्याइतपत आपल्यातील गाठी, चित्तवृत्ती, कर्मबंधनांचा गुंता कमी होणे गरजेचे आहे. यांचा आपल्या अंतरात असलेला संग्रह एवढा कमी व्हायला हवा, की ‘जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा मी ध्यान करेन’ असा विचार आपण करू शकाल.
विकारांपासून मिळावी मुक्ती
इतरांकडे पाहून माणसांत द्वेष, मत्सर आणि दुर्भाव यांचे भांडार वाढतच जाते. त्यामुळेच हल्ली लोक विचारांसह वाणीद्वारेही हिंसक झाले आहेत. या विकारांतून मुक्त होणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून आपण सत्संगात जाण्याचा, ध्यान करण्याचा आणि संकल्प घेण्याचा विचार करू शकाल. एरवी असा विचार तुम्हांला स्पर्शही करू शकणार नाही. त्यामुळे सत्यप्राप्तीच्या दिशेने वाटचालही थांबेल.
विश्वात सर्व काही स्वयंचलित (हॅपनिंग) आणि सुंदररीत्या चाललेले असते. जो या प्रक्रियेस जितके सुयोग्य पद्धतीने समजून घेतो, तितका तो आनंदित होत जातो आणि ‘आहे’ या भावावस्थेत राहू लागतो. जिथे सुखही नाही आणि दुःखही नाही, अशी अवस्था म्हणजे ‘आहे’ची अवस्था.
महापुरुषांच्या या कथा फक्त एक माध्यम असतात. वास्तविक या महापुरुषांच्या अंतरंगात काय चालले होते, हे समजून घेणे गरजेचे असते. त्यांची आंतरिक अवस्था समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. त्यांची कथा वाचून आपण स्वतःला हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे, की हे मी करायला हवे, अशी ही गोष्ट आहे का? गौतमांनी नेमके हेच केले, त्यामुळेच ते संकल्प करून बसू शकले.
तुमच्या चित्तवृत्तींचे भांडार ५१ टक्के जरी रिक्त झाले, तरीदेखील तुमच्या मनात चांगले विचार येऊ लागतील आणि तुम्ही नवनवीन संकल्प करू शकाल. जर हा कचरा ४० टक्के साफ झाला तर तुमच्या आत उरलेला ६० टक्के कचरा नव्या विचारांना आत येऊ देणार नाही. अशा वेळी तुम्हांला रिक्त होण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
आपल्या अंतरंगातील अर्ध्याहून अधिक अथवा ५१ टक्के कचरा निघून जाताच असे संकल्प सहजगत्या तुमच्या मनात निर्माण होतील. तेव्हा तुम्ही संपूर्ण दिवसभरही साधना करू शकाल. जेव्हा लोक दिवसभर क्रिकेट सामना पाहण्याची इच्छा व्यक्त करतील, तेव्हा तुम्ही मात्र दिवसभर साधनेत रममाण होण्याची इच्छा व्यक्त कराल.
सुटीच्या दिवशी ‘आज पब्लिक हॉलिडे आहे, तर आपण असं काही करू, जेणेकरून हा दिवस होली डे (पवित्र दिवस) बनावा’ असे विचार तुमच्या मनात येऊ लागतील. संकल्प निर्माण होणे आणि तो पाहण्याची कला अवगत झाल्यानंतर पुढील प्रक्रिया तीव्र गतीने होते. पाहण्याची कला येणे, हीसुद्धा एक विशेष अवस्था आहे. अर्थात याही अवस्थेत शरीरातील सर्व पीडा निघून जातात, असे नाही.
वेदना-पीडा असतातच. पण जसजशा त्या कमी होऊ लागतात, तसतसे सुखद अनुभव येऊ लागतात. मात्र, त्यातही न अडकता आपल्याला साधना सुरूच ठेवायला हवी.
गौतमांच्या कथेद्वारे हे सांगितले आहे, की मानसिक वेदनांचा मारा करून यांना खूप घाबरवले गेले; पण ते तसेच अचल राहिले. त्यांनी खूप त्रास सहन केला. मात्र, त्या त्रास-वेदनांशी संलग्न न होता, त्यांनी या वेदनांकडे, त्रासाकडे साक्षीभावाने पाहिले. दुःख आणि त्रास यांच्याशी त्यांनी कोणताही संघर्ष केला नाही. आता आपण समजू शकता, ही कशी अवस्था असेल !
‘पार्ट टू’ अर्थात मरणोत्तर जीवनाच्या सुखांचा मोह
कधीकधी काही लोक ध्यानासाठी बसल्यानंतर त्यांच्या मनात असे विचार येऊ शकतात, ‘मी ध्यानात बसणार नाही. कारण माझा अंतिम दिवस येणार आहे; आणि अद्याप मी मृत्युपत्रही लिहिलं नाही.’ ध्यानात असताना असे येणारे विचार आपण साक्षीभावानेच पाहायला हवेत. गौतमांनी नेमके हेच केले होते. कारण, भीतिदायक विचार हे एखाद्या हल्ल्याप्रमाणेच असतात.
अशा सर्व विचारांना साक्षीभावाने पाहिल्यानंतर त्यांच्या अंतरंगात सुखद तरंगही उठले. गौतमांसंबंधीच्या कथेत नमूद केले आहे, की गौतमांवर असे हल्ले करण्यासाठी ‘मार’ म्हणजेच सैतानाने अनेक देवतांचे मन वळवले. त्यांना सांगितले, गौतमला ‘मरणोत्तर जीवनातील सुखांचं दर्शन घडवा. त्यानं भूलोकावरील सर्व सुखं आधीच उपभोगली आहेत. त्यामुळे अशा सुखांचं त्याला आकर्षण वाटत नाही.
एवढ्या साधनेनंतर गौतमाला भूलोकावरील ही सर्व सुखं अस्थायी असल्याचं समजलं आहे. या सुखांची लालूच दाखवून गौतमावर काहीएक परिणाम होणार नाही. यामुळेच त्याला मरणोत्तर जीवनातील सुखांची माहिती द्या.’
वास्तविक गौतमांच्या जागी इतर कुणी सर्वसामान्य व्यक्ती असती, तर ती या भूलोकीच्या सुखांमध्येच संतुष्ट झाली असती, तिने मध्येच ध्यानधारणा सोडून दिली असती. अशा व्यक्तीला एवढे सांगून लालूच दिली गेली असती, ‘ही सर्व सुखं स्थायी होऊ शकतील.
तुझी नोकरी स्थायी होऊ शकेल. तुझ्या जीवनात येणारी सुंदर स्त्री कायमस्वरूपी तुझ्याकडेच राहील, तुझी मुलं कायम तुझ्यासोबत राहतील, तू असं मृत्युपत्र बनव, ज्यामुळे सर्व तुझ्यासोबतच राहतील. तुझा आदर करतील, कोणी तुझ्यापासून दूर जाणार नाही… त्यामुळे द्विधा मनःस्थितीचा प्रश्नच उद्भवणार नाही. सर्वत्र सुखसुविधाच असतील…’
‘या गोष्टी खऱ्या मानून, होकार देण्यासाठी माणूस कायम तयार असतो. कारण, याच आशेवर तो जगत असतो. जे लोक आज माझं ऐकताहेत, त्यांनी कायमच माझं ऐकावं. आता मिळणाऱ्या सुविधा मला कायम मिळत राहाव्यात. आज जे भोजन मिळतंय, ते कायमच मिळत राहावं.’ कारण, माणसाच्या मनात सर्व गोष्टी स्थायी राहाव्यात, अशी सुप्त इच्छा असतेच.
त्यामुळे या गोष्टींना तो कायम अनुकूल असतो. कुणीतरी यावे आणि या इच्छांवर शिक्कामोर्तब करावे, असे त्याला कायम वाटत असते. त्यामुळे कुणी जर असे सांगितले, की हे सर्व चिरस्थायी होऊ शकते, तर माणूस लगेच त्याच्यासमोर स्वतःला समर्पित करतो. अशा व्यक्तीला नमवण्यासाठी सैतानाला स्वतः येण्याचीही गरज नसते.
अशा व्यक्तीला एखादे विकाररूपी प्यादे पाठवूनही नमवता येते. कारण माणसाला जीवनात सर्वच हव्याहव्याशा गोष्टी चिरस्थायी रूपात हव्या असतात. त्यामुळे वास्तवाकडे तो पाठ फिरवतो. दाहक सत्य पाहू इच्छित नाही.
भगवान बुद्धांनी सांगितले, ‘सुख असो वा दुःख, सर्वच अस्थायी आहे. त्यामुळे सत्य काय आहे, हे निश्चित करा.’ म्हणून तर सैतानाला स्वतः येऊन गौतमांसमोर मरणोत्तर जीवनाच्या सुखांचे दर्शन घडवावे लागले. ही सुखं जास्त काळ टिकतात. गुलाबजाम खाल्ल्यानंतर दोन तासांनी जर तुम्हांला विचारले, गुलाबजामचा स्वाद आता आहे का?’
तेव्हा मनुष्याला भान येते, ‘अरे! आता तर तो स्वाद जिभेवर नाही.’ माणूस या चविष्टपणाला, स्वादालाही चिरस्थायी करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठीच तो आपल्या आवडीचे पदार्थ वारंवार खातो. मरणोत्तर जीवनात या स्वादाचा दरवळ अनेक दिवस राहतो. त्यामुळे या संवेदना चिरस्थायी आहेत, असा गैरसमज होण्याची शक्यता अधिक असते.
भूलोकावर बेहोशीत अल्पकाळ टिकणारा स्वादाचा आनंद स्थायी असल्याचा भ्रम आपल्याला होऊ शकतो. पण असा स्वाद काही दिवस रेंगाळल्यास तो कायमस्वरूपी असल्याची धारणा दृढ होऊ शकते.
अस्थिर सुख की साधना: निवड
व्यक्ती जेव्हा वासनांमध्ये अडकते, तेव्हा ती खूप आनंदात असते. त्यामुळे या सुखसंवेदना कायमस्वरूपी राहतील, असे ती गृहीत धरते. पण अशी व्यक्ती जेव्हा मरणोत्तर जीवनात प्रवेश करते, तेव्हा तिला हे सर्व काही कायमस्वरूपी वाटेल. भूलोकी जी गोष्ट तिला स्पष्ट झालेली नसते, ती मृत्यूनंतर तरी कशी उमगेल ?
त्यामुळेच गौतमांना मृत्यूनंतरच्या जीवनातील सर्व सुखांची लालच दाखवण्यात आली. इथे आपल्याला या कथांमागील दडलेला अर्थ समजून घ्यायचा आहे. गौतमांना विदेही अवस्थेतील सूक्ष्म देहाचे अनुभवही आले. ते जागृतावस्थेत शरीराबाहेर पडून सूक्ष्म देहातील सर्व दृश्ये अनुभवत होते.
या सर्व सुखांचा अनुभव घेतल्यानंतरही त्यांनी निर्णय घेतला, की ही सर्व सुखे अस्थायी आहेत. त्यामुळे मी साधनाच करेन. इतक्या कठीण परीक्षेनंतरही गौतमांनी आपला संकल्प सोडला नाही. इथे मरणोत्तर जीवनाच्या सुखांचा अनुभव लोकांना देऊन त्यांची परीक्षा घेतल्यास किती लोक यशस्वी होतील, हे पाहणे मोठे रंजक ठरेल.
मृत्योपरान्त जीवनातील सुखांच्या बदल्यात सत्याचा सौदा करणारा माणूस या परीक्षांमध्ये अपयशीच ठरेल. खरे तर अशा परीक्षेत ९० टक्के व्यक्ती अपयशीच ठरतील. त्यापैकी ५० टक्के लोक गुरूंची आज्ञा आणि भक्तीद्वारे काही काळानंतर किमान यातून बाहेर तरी येऊ शकतील. मात्र, इतर सर्व लोक या सुखांतच लिप्त राहतील. यातून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या अंतर्यामी जे बीज पेरले गेले आहे, तेच मृत्यूनंतरच्या जीवनात कामाला येते.
यापैकीही १० टक्के लोक पूर्ण यशस्वी होतात. कारण त्यांनी सर्व सुखं मिळाल्यानंतरही साधनेलाच प्राधान्य दिले. कारण खरी साधना त्यांनी पूर्णपणे तन्मयतेने समजून घेतली होती. जेव्हा त्यांची परीक्षा घेतली जाईल, तेव्हा त्या स्थितीतही त्यांना केवळ सत्याचेच स्मरण होईल. कारण सत्याचे बीज त्यांच्या अंतर्यामी खोलवर रुजलेले असते.
जी व्यक्ती बरीच साधना करून मरणोत्तर जीवनात प्रवेश करते, त्या वेळी तिथे त्याला ही साधना खूप उपयुक्त ठरते. सत्यासंबंधी त्याने जे ऐकले-वाचलेले असते, ते कुठे ना कुठे त्याच्या उपयोगी पडते. सर्वोच्च गोष्टींवरील त्याचे प्रेमच त्याला उच्च स्तरावर नेते. मात्र ज्याने मृत्युलोकात स्वतःवर काम केलेले नाही, त्याला मृत्यूनंतरच्या जीवनातील सुखांच्या प्रलोभनांपासून दूर राहणे अशक्य होते.
खरे तर माणूस सुखांपासून नव्हे तर फक्त दुःखांपासून मुक्त होऊ इच्छितो. त्यामुळे तो व्यसनाधीन होतो. आपल्याला व्यसनांचा मोह कधीपासून पडला, हेच त्याला समजू शकत नाही. ही व्यसने त्याला कुठल्या दलदलीत नेणार आहेत, याविषयी कुणीच त्याला इशारा देत नाही. अज्ञानापोटी तो दीर्घ काळ अशा गोष्टींत आपला वेळ वाया घालवतो.
धूम्रपान, मद्य किंवा इतर नशा केल्याने माणसाला तेवढ्यापुरते समाधान वाटते. त्यामुळेच काही लोक आयुष्यभर व्यसनाधीन राहतात. काही जण तर यालाच अध्यात्म समजतात. नशेला अध्यात्म समजणारे लोक अध्यात्मापासून शेकडो मैल दूर असतात व नशेत बेधुंद असतात. या सुखातून निर्माण होणाऱ्या मोहांची त्यांना कल्पनाच नसते. त्यामुळे स्वतःला ज्ञानी समजत ते गाफील राहतात.
नशेद्वारे होणारा क्षणभंगुर आनंद त्यांच्या अंतरंगात खोलवर रुतून बसलेला असतो. त्यामुळे व्यसनमुक्त होणे हे व्यसनाधीन व्यक्तींसाठी मोठे अंतर्गत युद्धच असते.
गौतमांना यापेक्षाही हजारपट अधिक सुख अनुभवायला दिले गेले. तरीही त्यांना आपल्या संकल्पांचे विस्मरण झाले नाही. कारण, आपल्या ध्येयाबाबत त्यांच्या संकल्पना स्पष्ट होत्या. त्यांना शारीरिक वेदना अनुभवास आल्या, तेव्हा त्यांच्याशी त्यांनी संघर्ष केला नाही. तशाच सुखसंवेदनाही आल्या. त्यातही ते गुरफटले नाहीत. तेव्हा कुठे त्यांना अशी अवस्था प्राप्त झाली, जी सर्वसामान्यांना मिळत नाही.
बुद्ध अनेक अडथळ्यांवर मात करत, अथक प्रयत्नांद्वारे आपल्या स्वानुभवापर्यंत पोहोचले. ही बाब जर आपण समजू शकलात, तर लहानसहान घटनांमध्ये न अडकता सहजपणे जीवन व्यतीत कराल. तुमच्यासमोर एखादी समस्या निर्माण झाली तर स्वतःला तुम्ही विचाराल, ‘ही समस्या गौतम बुद्धांसमोर आलेल्या समस्यांपेक्षा मोठी आहे का?
एवढ्याशा समस्येवरही मी मात करू शकणार नाही का?’ अशा कथा वाचून, ऐकून मला सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींपासून मुक्त व्हायचे आहे, अशी मंगल इच्छा तुमच्या मनात निर्माण व्हायला हवी. ध्यान करणारी व्यक्ती बाहेरून शांत दिसते.
परंतु तिच्या अंतरंगात द्वंद्व सुरू असते. विविध प्रलोभनांपासून तिला स्वतःला दूर ठेवायचे असते. असेच आंतरिक युद्ध समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साधक, सत्यशोधक गौतमही विलीन झाले आणि प्रकटले ते बुद्ध !
You may like this: गौतमाची बोधयात्रा | Gautama’s Pilgrimage
Follow our podcast: Buddha Dhamma in Marathi
Conclusion
In conclusion, the stories of Buddha offer profound insights and timeless wisdom that can guide us towards academic success and personal growth.
By incorporating the teachings from these tales into our lives, we can cultivate a mindset of resilience, perseverance, and wisdom, enabling us to overcome challenges and excel in every exam we face.
Let the stories of Buddha inspire and empower you on your journey towards success.
One Comment