Buddha Stories

बुद्ध कथा -८: ज्ञान हि सर्वश्रेष्ठ संपत्ती | Buddha Story

Embark on a journey of enlightenment with our latest blog post Buddha Story in Marathi, where we explore the profound teachings of Buddha on the timeless concept that “knowledge is the best wealth.” Delve into an ancient parable that encapsulates the essence of wisdom and its transformative power in shaping a meaningful and fulfilling life.

बुद्ध कथा

बुद्धांच्या काळात ‘पसेनदी’ नावाचा एक प्रसिद्ध राजा होता. तो ‘कोसल’ नावाच्या देशावर राज्य करीत होता. त्याच्या दरबारात अनेक हुशार मंत्री आणि पराक्रमी सरदार होते. पसेनदी राजा आपल्या राज्यातील विविध ज्ञानी आणि पराक्रमी अशा लोकांचा नेहमी गौरव करायचा. अशाच ‘लोहिच्च’ नावाच्या ब्राह्मणाला त्याने ‘सालवतिका’ नावाचे एक गाव बक्षीस म्हणून दिलेलं होतं.

लोहिच हा एक अतिशय नम्र आणि ज्ञानी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या विद्वत्तेमुळे सर्वजण त्याची स्तुती करायचे, त्याला मान द्यायचे. परंतु त्याच्या अंगी एक मोठा दुर्गुण होता. आपल्याला असलेले ज्ञान दुसन्यांना देऊ नये, असा स्वार्थी आणि संकुचित विचार तो करायचा. आपल्याला मिळालेलं ज्ञान दुसऱ्याला देऊ नये.

त्या ज्ञानाचा दुसऱ्याला काहीच उपयोग होत नाही. एक माणूस दुसऱ्यासाठी काहीच करू शकत नाही, अशा संकुचित विचारांमुळे सालवतिका नगरातील लोक लोहिच्चची निंदा करायचे.


Listen to Buddha Story in Marathi


एके दिवशी तथागत बुद्ध सालवतिका नगरात गेले. तेथील लोकांना सदाचरणाचा उपदेश करावा, या उद्देशाने काही दिवस ते तेथेच थांबले. आपल्या नगरात तथागत बुद्ध नावाची एक ज्ञानी व्यक्ती आल्याचे एका सेवकाने लोहिच्चला सांगितले. आपण या ज्ञानी व्यक्तीचा यथायोग्य असा सन्मान केला पाहिजे, असे त्याला वाटले.

लोहिच्चने आपल्या रोसिका नावाच्या सेवकाला बोलवून घेतले आणि म्हणाला, “रोसिका, आपल्या सालवतिका नगरात तथागत बुद्ध नावाचे एक ज्ञानी व्यक्ती आलेले आहेत. तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना सन्मानपूर्वक भोजनाचे निमंत्रण देऊन ये.” मालकाच्या आज्ञेनुसार रोसिका बुद्धांकडे गेला आणि त्यांना आदरपूर्वक भोजनाचे निमंत्रण दिले. त्याने दिलेले निमंत्रण बुद्धांनी स्वीकारले आणि ठरलेल्या वेळी भोजनास येण्याचे कबूल केले.

Buddha Story in Marathi

दुसऱ्या दिवशी भोजन तयार झाल्यावर बुद्धांना बोलविण्यासाठी लोहिच्चने पुन्हा रोसिकाला पाठवले. रोसिका बुद्धांकडे गेला आणि त्यांना लोहिचच्या घरी येण्याची विनंती केली. बुद्ध लोहिचकडे जाण्यास निघाले. तथागत बुद्ध लोहिच ब्राह्मणाकडे येत असताना बुद्धांचा संघ आणि रोसिका त्यांच्या मागून चालत होते. चालता चालता सगळे दमले.

बुद्ध, संघ आणि रोसिका सारेजण वाटेत एका वळणावर येऊन थांबले. तेव्हा लोहिच्चबद्दल बोलताना रोसिका बुद्धांना म्हणाला, “भन्ते, माझा मालक लोहिच्च अतिशय ज्ञानी आहे, तो सर्वांचा सन्मान करतो. परंतु आपल्याकडे असलेलं ज्ञान तो कुणाला देत नाही. त्याच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना व्हावा, असं मला वाटतं. म्हणून हे बुद्ध, तुम्ही त्याच्या अंगी असलेला हा दोष, ही संकुचित वृत्ती दूर करावी. त्याला योग्य असे मार्गदर्शन करावे.” तेव्हा ‘असेच होईल’ असे म्हणून बुद्ध हळूहळू चालायला लागले.

थोड्याच वेळात सारे जण लोहिच्चकडे जाऊन पोहोचले. लोहिच्चने अतिशय नम्रपणे सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले. जेवणानंतर लोहिच्चने बुद्धांना वंदन केले आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसला. तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले, “लोहिच्च, आपल्याकडे असलेलं ज्ञान दुसऱ्याला देऊ नये, असं तुला वाटतं का?” त्यावर लोहिच्चने “होय” असे उत्तर दिले.

बुद्ध त्याला म्हणाले, “लोहिच्च, तुला असं का बरं वाटतं?” लोहिच्च शांतपणे म्हणाला, “आपल्या ज्ञानाचा इतरांना काहीच उपयोग नाही. आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना दिल्यामुळे त्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही, असं मला वाटतं.” तेव्हा त्याला समजावत बुद्ध म्हणाले, “लोहिच्च, तू सालवतिका या गावाचा प्रमुख आहेस. त्यामुळे या गावाचे सर्व उत्पन्न तू एकट्याने घ्यावे, ते उत्पन्न दुसऱ्यांना देऊ नये, असे कुणी म्हटलं, तर ते योग्य होईल का?” लोहिच म्हणाला, “नाही, हे योग्य होणार नाही.

असं केलं तर तो नगरातील इतर लोकांवर अन्याय केल्यासारखे होईल. एकूण उत्पन्नामधील योग्य वाटा जर त्यांना मिळाला नाही, तर ते मला शत्रू समजतील. नगरातील सर्व लोक माझा द्वेष करतील. हे सारं माझ्या दृष्टीने घातक ठरेल.” त्याचं बोलणं ऐकून बुद्ध शांतपणे म्हणाले, “लोहिच्च, पसेनदी राजा हा कोसल देशाचा प्रमुख आहे. म्हणून देशाचे सर्व उत्पन्न एकट्या राजाने घेतले, इतरांना काहीच दिले नाही, तर ते योग्य होईल का?” यावर लोहिच्च लगेच म्हणाला, “भन्ते, हे योग्य होणार नाही.

देशावर मालकी जरी राजाची असली तरी मिळणाऱ्या उत्पन्नाचा अधिकार हा सर्वांना आहे. सर्वांना उत्पन्न मिळाले नाही तर तो त्यांच्यावर अन्याय होईल. सर्व लोक राजाचा द्वेष करतील, राजाला शत्रू समजतील. हे सर्व राजाला घातक ठरेल. याउलट, जर सर्वांना संपत्तीचा अधिकार मिळाला, तर सर्वांचं भलं होईल. सर्वजण राजाची स्तुती करतील, त्याचा आदर करतील. म्हणून राजाने एकट्याने सर्व उत्पन्न न घेता ते सर्वांना देणे योग्य आहे.”

त्याचे उत्तर ऐकून बुद्ध हसले आणि म्हणाले, “छान, तू दिलेली उत्तरं अगदी बरोबर आहेत. लोहिच्च, संपत्तीच्याबद्दल, उत्पन्नाबद्दल तू जे म्हणाला तीच गोष्ट ज्ञानाच्या बाबतीतही लागू होते. ज्ञान हे संपत्तीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. आपल्याकडे असलेल्या ज्ञानामुळे दुसऱ्याचं भलं होणार असेल, तर ते ज्ञान एकट्याने न ठेवता दुसऱ्यांना सुद्धा दिलं पाहिजे.

त्यामुळे दुसऱ्यांना तर फायदा होईलच, पण त्या सर्वांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम, आदर, मैत्री यांसारखे भाव निर्माण होतील. हे सर्व आपल्यासाठी हिताचे, फायद्याचे असेल. म्हणून हे लोहिच, ज्ञानाचा अधिकार सर्वांना समान आहे. आपण ते दुसऱ्याला दिले पाहिजे.”

हे ऐकल्यावर लोहिच्चला आपली चूक कळली. तो बुद्धांना हात जोडत म्हणाला, “भन्ते, मला क्षमा करा. पालथा घडा सरळ करावा, चुकलेल्याला वाट दाखवावी त्याप्रमाणे तुम्ही मला कल्याणाचा मार्ग दाखविला आहे. मला तुमचा उपासक म्हणून स्वीकारा.”

बुद्धांनी प्रेमाने जवळ घेत त्याला क्षमा केली. सर्वांनी मोठ्या आदराने आणि आनंदाने बुद्धांना वंदन करत त्यांचा जयघोष केला.

तात्पर्य / बोध- ज्ञान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. आपल्याला असलेले ज्ञान स्वतःकडे न ठेवता आवश्यक तेव्हा इतरांना द्यावे. सर्वांना ज्ञानाचा समान अधिकार आहे. 

Conclusion

Whether you’re a seeker of truth or someone navigating life’s complexities, this post offers practical insights on cultivating knowledge as a pathway to genuine prosperity. Learn from the timeless wisdom of Buddha and uncover the keys to unlocking your inner potential and true wealth.

You may like this: बुद्ध कथा -७: मालुंक्यपुत्ताचा प्रश्न | Buddha Katha Marathi

Follow our podcast: Buddha Dhamma in Marathi

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *