Buddha Stories

बुद्ध कथा -७: मालुंक्यपुत्ताचा प्रश्न | Buddha Katha Marathi

Embark on a journey of enlightenment with our latest blog post on Buddha Katha Marathi, delving into the profound teachings of Buddha in response to Maalulyaputta’s thought-provoking question. Discover the timeless wisdom encapsulated in Buddha’s reply as we explore the essence of existence, suffering, and the path to true liberation.

बुद्ध कथा

एकदा तथागत बुद्ध श्रावस्ती येथील लोकांना उपदेश करण्यासाठी गेलेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे काही निवडक भिक्खू सुद्धा होते. भिक्खू संघातील भिक्खू निःसंकोचपणे, निर्भीडपणे त्यांना विविध विषयांवरील वेगवेगळे प्रश्न विचारायचे. आपल्या मनातील शंका, अडचणी त्यांच्यापुढे ठेवायचे.

बुद्धसुद्धा त्यांच्या प्रश्नांची अतिशय शांतपणे आणि सोप्या पद्धतीने उत्तरे द्यायचे. माणसाला भेडसावणारे प्रश्न, आनंदी जीवन जगण्याचा मार्ग यासारख्या विविध प्रश्नांची उत्तरे बुद्ध अगदी सहजपणे द्यायचे. पण स्वर्ग- नरक, पाप-पुण्य इ. काल्पनिक गोष्टींवरील प्रश्नांना उत्तर देणे मात्र ते टाळायचे.

एके दिवशी ते श्रावस्तीमधील जेतवनात विहार करत होते. तेव्हा भिक्खू संघातील ‘मालुंक्यपुत्त’ नावाचा एक तरुण भिक्खू त्यांच्या जवळ आला. त्याने बुद्धांना वंदन केले आणि त्यांच्या बाजूला जाऊन बसला. काहीशा उद्धटपणे तो बुद्धांना म्हणाला, “मला आज तुमच्याशी स्वर्ग- नरक, पाप-पुण्य, आत्मा-परमात्मा या विषयांवर बोलायचे आहे.


Listen to Buddha Katha in Marathi


मला सांगा, मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो का ? स्वर्ग-नरक खरंच असतं का? मला माझ्या या प्रश्नांची उत्तरे आताच तुमच्याकडून हवी आहेत. जर तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही, तर मी तुम्हाला सोडून दुसऱ्या गुरूकडे जाईल.”

तो चिडून बोलत असतानाही बुद्धांनी त्याचं म्हणणं अतिशय शांतपणे ऐकून घेतलं. मग ते त्याला म्हणाले, “मालुंक्यपुत्ता, संघ सोडून दुसऱ्या गुरूकडे जाण्याची धमकी कुणाला देतोस? तुला जायचे असेल, तर तू खुशाल जाऊ शकतोस. मी तुला थांबवणार नाही. पण जाण्याआधी तुझ्या प्रश्नांची उत्तरे ऐकून घे. तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी मी तुला एक छोटासा प्रसंग सांगणार आहे. तू तो शांतपणे ऐक.”

Buddha Katha Marathi

मालुंक्यपुत्त मान खाली घालून शांतपणे ऐकायला लागला. बुद्ध त्याला म्हणाले, “कल्पना कर, एक अतिशय घनदाट जंगल आहे. चारही बाजूंनी उंच-उंच झाडे आहेत. त्या जंगलातून काही माणसे प्रवास करीत आहेत. तेवढ्यात अचानक जंगलातून कुणीतरी मारलेला एक तीक्ष्ण बाण एका माणसाच्या शरीरात घुसतो.

त्या बाणाने ती व्यक्ती गंभीर जखमी होते. शरीरातून रक्त वहायला लागतं. त्याचे सोबती त्याला एका झाडाखाली ठेवतात आणि वैद्याला बोलावून आणतात. वैद्य तिथे येतो आणि त्याच्या शरीरातील बाण काढून औषधोपचार सुरू करणार इतक्यात तो जखमी व्यक्ती म्हणतो, थांबा. माझ्या शरीरातील बाण काढून औषधोपचार करण्याआधी एक काम करा. मला बाण मारणारा व्यक्ती जंगलात जिथे कुठे लपून बसला असेल तेथून त्याला शोधून माझ्यासमोर आणा. मग माझ्यावर औषधोपचार करा.”

हा प्रसंग सांगितल्यावर बुद्ध मालुंक्यपुत्ताला म्हणाले, “बाबारे मालुंक्यपुत्ता, आता मला सांग. त्याच्या सोबत्यांनी आधी काय करावं ? आधी जंगलात जाऊन बाण मारणाऱ्याचा शोध घ्यावा की त्याच्यावर औषधोपचार करावे?” हे ऐकून मालुंक्यपुत्त शांतपणे म्हणाला, “आधी त्या व्यक्तीच्या शरीरातील बाण बाहेर काढून, त्याच्यावर उपचार करून त्याचे प्राण वाचवले पाहिजे.

औषधोपचार न करता आधी बाण मारणाऱ्याचा शोध घेत बसलो, तर तो जंगलात जिथं कुठं लपून बसला असेल तेथून त्याला शोधेपर्यंत जखमी माणसाचे प्राण जातील. म्हणून औषधोपचार करून प्राण वाचवायला अग्रक्रम दिला पाहिजे.”

मालुंक्यपुत्ताने दिलेलं हे उत्तर ऐकून बुद्ध म्हणाले, “अगदी बरोबर. तू सांगितलेला क्रम अचूक आहे. जीवन जगताना आपणही असाच क्रम ठरवायला हवा. स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, आत्मा यांसारख्या काल्पनिक गोष्टींच्या मागे लागलो, त्यांच्यावर चर्चा करून उत्तरे शोधत बसलो, तर खूप सारा महत्त्वाचा वेळ निघून जाईल पण समाधानकारक उत्तरे मिळतीलच, असे नाही. हे सगळं करत असताना आपल्या जीवनातील प्रत्यक्ष समस्यांकडे दुर्लक्ष होईल, त्यांना सोडविण्यात अडचणी येतील.

म्हणून आपण काल्पनिक गोष्टींच्या मागे न लागता प्रत्यक्ष जीवनातील समस्या, दुःख यांचा विचार करून त्यांना दूर केलं पाहिजे. त्यामुळे आपला वेळही वाया जाणार नाही आणि आपलं जीवनही आनंदी होईल. म्हणून मी अशा काल्पनिक गोष्टींवर आधारित प्रश्नांची उत्तरं देणं नेहमीच टाळतो.”

बुद्धांचं बोलणं ऐकून मालुंक्यपुत्ताला आपली चूक कळली. त्याने अतिशय नम्रपणे बुद्धांची क्षमा मागितली. बुद्धांनी सुद्धा त्याला क्षमा केली आणि उतावीळपणे, उद्धटपणे न वागण्याचा सल्ला दिला.

तात्पर्य/बोध – काल्पनिक आणि अनावश्यक गोष्टींच्या मागे न लागता आपण प्रत्यक्ष जीवनातील गोष्टींवर, समस्यांवर लक्ष दिले पाहिजे तसेच त्या सोडविण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे. कुणालाही प्रश्न विचारताना हळुवारपणे, नम्रपणे विचारले पाहिजेत. उद्धटपणे वागू नये. 

Conclusion

Whether you’re a seasoned practitioner or a curious seeker, this blog post serves as a guide to integrating Buddha’s teachings into your daily life. Gain clarity on Maalulyaputta’s question and find practical applications for timeless principles that lead to a more meaningful and fulfilling existence.

You may like this: बुद्ध कथा -६: निंदा हि सुधारण्याची संधी | Tales of Buddhism

Follow our podcast: Buddha Dhamma in Marathi

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *