सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी आर्यावर्तामध्ये शाक्यराजकुलात गौतमनामे करून एक राजपुत्र निर्माण होऊन तो जगद्गुरूच्या योग्यतेस पावल्याचे कित्येक मराठी वाचकांस फार तर कर्णोपकर्णी ऐकून माहीत असेल. त्याचे विस्तृत चरित्र किंवा त्याने स्थापित केलेली धर्ममते व नीतिसिद्धांत फारच थोड्यांना अवगत असतील.
मराठी भाषेत तर या विषयावर एकही नाव घेण्यासारखा ग्रंथ झालेला नाही. या अद्वितीय महापुरुषाचे चरित्र व त्याने स्थापित केलेली मते यांच्या विवेचनपर शेकडो ग्रंथ युरोपातील निरनिराळ्या भाषांत झाले आहेत. तिकडील शोधक पुरुषांना या विषयाचे इतके महत्त्व वाटत आहे की, ते नेहमी काहीतरी नवीन शोध करीत आहेत व पूर्वी प्रसिद्ध न झालेले पाली, संस्कृत वगैरे भाषांतील ग्रंथ भाषांतररूपाने किंवा मुळांत आहेत;
तसेच छापून प्रसिद्ध करीत आहेत. त्यांच्या जिज्ञासेमुळे व शोधकबुद्धीमुळे गौतम बुद्धाच्या संबंधाने पुष्कळ माहिती उपलब्ध झाली आहे. याप्रमाणे पाश्चात्त्य विद्वानमंडळाचे लक्ष या विषयाकडे मोठ्या उत्कंठेने लागले असता, आम्ही त्याच्या संबंधाने अपरिमित उदासीनता दर्शवावी हे मोठे वाईट आहे.
गौतम बुद्धाचा धर्म आपल्या देशात जरी आज फारसा प्रवृत्त नाही, तरी तो तेथे सुमारे हजार-बाराशे वर्षे एकसारखा चालू होता व त्याच्यामुळे भारतभूमीवरील निरनिराळ्या धर्मपंथावर अनेक परिणाम झाले आहेत. पुन्हा त्याच्या धर्मपंथाचा प्रसार आज सरासरी एक तृतीयांश मनुष्यजातीत कमी-जास्त प्रमाणात झाला आहे आणि कित्येक पाश्चात्त्य पंडितांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा पुरातन खिस्ती धर्मावरही पुष्कळ परिणाम झाला आहे.
या दोन्ही गोष्टी लक्षात आणल्या म्हणजे आम्हा आर्य लोकांस गौतम बुद्धाविषयी अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. कारण तो आमच्या लोकांमध्ये निर्माण झाला असून आमच्या पुरातन विद्या व धर्म यांचा त्याच्या मनावर पूर्ण संस्कार झाला होता. त्याने स्थापिलेला धर्मपंथ आमच्या प्राचीन आर्य धर्मरूप जरठ वृक्षाची एक शाखा होय.
यास्तव त्याचे चरित्र व त्याची धर्ममते समजून घेण्याविषयी आमच्या मनामध्ये अवश्य उत्कंठा उत्पन्न झाली पाहिजे. गौतम बुद्धाचा धर्मपंथ आम्हास संमत नसला व तो वैदिक धर्माशी कितीही विरोधी असला, तरी त्याचे अल्पमात्र ज्ञान आम्हास नसावे हे मोठेच चमत्कारिक होय. त्याचप्रमाणे या महापुरुषाचे चरित्र जे निःपक्षपाती पाश्चात्त्य पंडित वाचतात, त्यांचा अभिप्राय असा पडतो की, एका खिस्ताखेरीज दुसरा कोणीही या महात्म्याच्या योग्यतेचा पुरुष या भूतलावर आजपर्यंत निर्माण झाला नाही.
हे असे अलौकिक नररत्न आमच्या या भारतभूमीमध्ये निर्माण झाले असता त्याची काहीच माहिती आम्हा आर्याचे वंशज म्हणविणाया जनांस नसावी व ती प्राप्त करून घेण्याविषयीची इच्छा आमच्या मनात उत्पन्न होऊ नये, ही मोठी शरमेची गोष्ट आहे. आमच्या देशातील लोकांच्या ठायी आमच्या पुरातन गोष्टींविषयी बेसुमार उदासीनता वास करीत आहे.
तीमुळे आमची खरी योग्यता आम्हांस कळेनाशी झाली आहे. आमच्या प्राचीन चांगल्या गोष्टीविषयी आमच्या ठायी योग्य प्रकारचा अभिमान जागृत झाल्याने आम्हास आमच्या सध्याच्या स्थितीची थोडीबहुत लाज वाटून स्वसुधारणा करण्याची बुद्धी आमच्यामध्ये जागृत होण्याचा संभव आहे.
प्राकृत विषय अशातलाच एक आहे. तेव्हा त्याविषयी महाराष्ट्रजनांस थोडीशी माहिती या ग्रंथाद्वारे करून देण्याचा आमचा उद्देश आहे. तो कितपत सिद्धीस गेला आहे, ते अभिज्ञ जनांस क्रमाक्रमाने दिसून येईल.
हा ग्रंथ लिहिताना, ज्या मोठमोठ्या युरोपीय पंडितांनी या विषयावर दीर्घकाळ परिश्रम करून ते ग्रंथरूपाने जगास सुलभ व सुगम केले आहेत, त्यांचा आधार आम्ही घेतला आहे. त्याचप्रमाणे जे संस्कृत ग्रंथ या विषयावर आजपर्यंत प्रसिद्ध झाले आहेत, त्या सर्वांचे साहाय्य घेतले आहे.
प्रथमतः प्राकृत भागामध्ये उपोद्घातरूपाने थोडेसे लिहून मग गौतम बुद्धाच्या चरित्राचा ऐतिहासिक तेवढा भाग देऊ. नंतर त्याच्या संबंधाने ज्या कित्येक अद्भुत गोष्टी प्रचलित आहेत त्यांचे निरूपण करू. एवढा भाग आटोपल्यानंतर मग बुद्धाचे धर्मविचार व नीतिविचार यांचे सार देऊ.
याप्रमाणे प्राकृत विषयाच्या मुख्य अंगांचे विवेचन झाल्यावर बुद्ध धर्माचा आजपर्यंतचा इतिहास संक्षेपतः सांगू. हे असे एकंदर भाग आटोपल्यावर गौतम बुद्धाच्या धर्ममतांचे आमच्या देशावर व खिस्ती वगैरे इतर राष्ट्रांवर कोणकोणते परिणाम झाले आहेत, ते थोडक्यात लिहून उपसंहार करू.
प्रथमतः प्राकृत विषयाचे महत्त्व आमच्या वाचकांच्या ध्यानात चांगले येण्यासाठी बौद्ध धर्माचा सांप्रत काळी किती प्रसार झाला आहे ते आकडे देऊन दाखवितो. बुद्धधर्मानुयायी जनांचे मुख्य दोन वर्ग करतात. एक दक्षिणेकडील वर्ग व दुसरा उत्तरेकडील वर्ग.
दक्षिणेकडील बौद्धांच्या संख्येचा तपशील येणेप्रमाणे आहे-
सिंहलद्वीप – 20,00,000
ब्रह्मदेश – 68,88,076
हिंदुस्थानातील इतर प्रांत – 2,43, 677
सयाम – 1,00,00,000
आनाम – 1,20,00,000
एकंदर सुमारे – 3,10,00,000
उत्तरेकडील बौद्धांच्या संख्येचा तपशील येणेप्रमाणे आहे –
जावा वगैरे दच लोकांच्या वसाहती व वाली – 50,000
आसाम, स्पिटी, हाँगकाँग वगैरे ब्रिटिश वसाहती – 5,00,000
रशियन प्रांत – 6,00,000
ल्यू खेन बेटे – 10,00,000
कोरिआ – 80,00,000
भूतान व सिक्कीम – 10,00,000
काश्मीर – २,००,०००
तिबेट – ६०,००,०००
मोंगोलिया २०,००,০০০
मॅन्चुरिआ ३०,००,०००
जपान ४,०४,५३,४६१
नेपाळ – ५,००,०००
चीनदेश- ४१,४६,८६,९९४
एकंदर सुमारे – ४७,९०,००,०००
या दोन्ही वर्गातील बौद्धांची गोळाबेरीज केली असता पृथ्वीवर अदमासे पन्नास कोटी बौद्ध आहेत असे दिसून येईल. पृथ्वीतलावरील एकंदर लोकसंख्या सुमारे एकशेतीस कोटी आहे. तेव्हा अर्थात जगातील एकंदर लोकांच्या तिसऱ्या हिश्शाहून जास्त लोक बुद्धानुयायी आहेत.
त्याचप्रमाणे आजकाल सर्वत्र प्रसार पावलेला जो खिस्तीधर्म त्याचे अनुयायी अवघे बत्तीस कोटी आहेत. आमच्या हिंदू धर्माचे इतर वीस कोटी लोक आहेत आणि
मुसलमानी धर्माचे सुमारे साडेपंधरा कोटी आहेत. यावरून पाहता बुद्ध धर्माइतका प्रचार दुसऱ्या कोणत्याही धर्माचा नाही आणि कित्येक पाश्चात्त्य पंडित म्हणतात त्याप्रमाणे खुद्द खिस्ती धर्माची बहुतेक उत्कृष्ट तत्त्वे बुद्धधर्मातूनच घेतली असल्यास खिस्ती धर्मपंथ बुद्ध धर्माचीच एक शाखा आहे असे म्हणावे लागते. याप्रमाणे प्राकृत विषयाचे महत्त्व फारच मोठे आहे आणि हा गौतम बुद्धाचा धर्म आमच्या आर्यधर्माची एक उपशाखा आहे हे मनात आले म्हणजे आम्हास त्याबद्दल अभिमानच वाटला पाहिजे.
आता या अलौकिक धर्मसंस्थापकाने या भूतलावर निर्माण होऊन कोणकोणत्या गोष्टी केल्या त्याचे थोडक्यात निरूपण करतो.
१) हिंदुस्थानामध्ये उपाध्यायवर्गाचा जो एवढा प्रचंड व अप्रतिम जुलूम सुरू झाला होता त्यावर गौतम बुद्धाने हल्ला करून तो अगदी कमजोर करून टाकला आणि त्याच्या अनुयायी जनांची सत्ता हिंदुस्थानात जवळ जवळ हजार वर्षे कायम होती.
२) हिंदुस्थानामध्ये जातिभेदाचे जे प्रचंड बंड माजले होते त्याला बुद्धाच्या उपदेशामुळे प्रतिकार होऊन ते बरेच कमी झाले.
३) एका पुरुषाने अनेक स्त्रियांशी विवाह करण्याची जी पद्धती कैक काळापासून चालत आली होती, ती अनीतीची आहे असे त्याने पहिल्याने प्रतिपादन केले व त्याचप्रमाणे दास्याची पद्धती सदोष व अन्याय्य आहे, असा त्याने उपदेश केला. त्यापूर्वी या दोन्ही अनीतीच्या गोष्टीस कोणीच प्रतिरोध केला नव्हता.
४) स्त्री म्हटली म्हणजे पुरुषाची मालमत्तेपैकीच एक चीज असून, तिने ओझी वाहणाऱ्या पशूप्रमाणे त्याच्यासाठी ठरवून असे प्रतिपादन केले की, स्त्री पुरुषाची केवळ सहचारिणी असून, तिची त्याच्याहून कोणत्याही बाबतीत योग्यता कमी नाही. त्याप्रमाणे ती धर्माचरण करण्यास सर्वतोपरी योग्य आहे, असे त्याने स्थापित केले.
५) पूर्वी यज्ञयागादिकांच्या मिषाने उपाध्यायवर्ग पशुहिंसा करीत असे, तिचा निषेध बुद्धाने पहिल्याने केला. इतकेच नव्हे तर देश जिंकून राज्यविस्तार वाढविण्याची हाव धरणाऱ्या नृपतीला त्याने दोष लावून त्याचे ते मनुष्यसंहारमूलक युद्धकर्म सर्वथा निषिद्ध होय, असा उपदेश केला.
६) प्रत्येकाने आपापल्यापुरते धर्माचरण करावे अशी जी रीत पूर्वापार चालत आली होती, तिच्याऐवजी धर्माचरण संघ करून करावेत अशी पद्धती बुद्धानेच प्रथम सुरू केली. त्याचप्रमाणे त्याने असे प्रतिपादन केले की, मनुष्याच्या कर्तव्यकर्माचा निश्वय, नीती व न्याय यांच्या शाश्वत तत्त्वांस अनुसरून करावा. पशुयज्ञ व उपाध्यायांनी प्रचलित केलेले स्वकपोलकल्पित आचार यात काही एक हाशील नाही. या गोष्टी मनुष्याने केल्या नाहीत, तर तो स्वकर्तव्यच्युत झाला असे सहसा समजू नये.
७) स्वतःस संमत असलेला धर्मपंथ इतरांनी स्वीकारावा अशी इच्छा धरून त्याचा उपदेश करीत फिरण्याचे तत्त्व प्रथमतः बुद्धानेच जगामध्ये सुरू केले आणि या स्वधर्मप्रसाराच्या साहाय्यभूत अशा दोन नव्या संस्था त्याने स्थापित केल्या. एक देशोदेशी हिंडून धर्मप्रसार करणान्यांची व दुसरी धर्मानुयायी जनांस वेळोवेळी धर्मोपदेश करून त्यांची स्वधर्मावरील श्रद्धा दृढ करणाऱ्या उपदेशकांची.
या इतक्या गोष्टी त्याने पहिल्यानेच जगामध्ये प्रविष्ट केल्या असे म्हणण्यास मुळीच प्रत्यवाय नाही. हे एवढे फेरफार एकट्या माणसाच्या हातून व्हावे हे काही लहानसहान काम नव्हे. या गोष्टीमुळे त्याच्या धर्मपंथाचा प्रसार बहुतेक सर्व आशिया खंडात झाला. त्याचप्रमाणे कित्येक शोधक विद्वानांचे असे म्हणणे आहे की, सिकंदर बादशहाच्या वेळी काही बुद्ध धर्मप्रसारक जन आलेक्झेंन्ड्रिया येथे गेले होते.
हे म्हणणे या देशात अशोक राजाचे जे कित्येक शिलालेख वगैरे आहेत त्यावरूनही सिद्ध होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या कित्येक पाश्चात्त्य विद्वानांचे असे म्हणणे आहे की, उच्च प्रतीचा यहुदी धर्मपंथ व हिंदुस्थानातील पशुयज्ञनिषेधकपंथ म्हणजे अर्थात बौद्ध धर्म हे एकरूपच होत. बाबिलोनिया, पालेस्टाइन, मिसर व ग्रीस या देशातील उपाध्याय वर्गांनी प्रवृत्त केलेल्या हिंसामूलक धर्मपद्धती नष्ट करण्याचा प्रयत्न बुद्ध धर्मप्रसारक जनांकडून प्रथमतः झाला होता.
या बुद्ध धर्मप्रसारकांनी सदरील देशांमध्ये जाऊन तेथे निरनिराळ्या नावांची मंडळे स्थापन केली होती असे म्हणण्यास पुष्कळ आधार आहे व मंडळांच्या योगाने खिस्ती धर्माच्या प्रसारास अनुकूल अशी स्थिती अगोदरच प्राप्त झाली होती. त्याचप्रमाणे बुद्ध धर्मप्रसारक जनांनी इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये अमेरिकेत जाऊन क्वाझल कोटाल नामक एका राजाकडून पशुयज्ञ बंद करविला, असा पुरावा चिनी लोकांच्या ग्रंथांतून आढळतो व बौद्ध लोक तिकडे गेले होते, याची काही चिन्हेही तेथे आढळून आली आहेत. हत्ती, नाग, बुद्धाची प्रतिमा इत्यादी काही चित्रे तेथील पुरातन अवशेषांमध्ये सापडली आहेत.
सर विलिअम जोन्स वगैरे कित्येक विद्वानांचे असे म्हणणे आहे की, युरोपाच्या उत्तरभागी प्राचीन काळी नॉर्स, अँगल, गॉथ वगैरे लोक होते. त्यांच्यामध्ये बुद्ध धर्मप्रसारकजनांनी जाऊन आपल्या धर्म पंथाचा उपदेश त्याला केला होता, असे त्यांच्या कित्येक पुरातन अवशेषांवरून दिसून येते. आणखी असे की, वोडन म्हणून जे स्कॅन्डिनेविअर लोकांचे उपास्य दैवत होते त्यांचे नाव बुद्ध या नावाचेच अपभ्रष्ट रूप होय. यावरून पाहता जान उतार पुरोपातील लोकांचा एकेकाळी देव होता असे वाटते; परंतु यासंबंधाने विद्यान लोकांमध्ये मतभेद आहेत.
या सर्व गोष्टीचा विचार केला असता असे म्हणावे लागते की, या एका अद्वितीय पुरुषाच्या धर्मविषयक विचारांचा प्रभाव सर्व पृथ्वीतलावर प्रमाणाने पसरून त्याच्या अनुयायी जनांनी कोरलेली लेणी, पुतळे, खांब व इतर स्मारके सर्वत्र दृष्टीस पडतात. हा एवढा प्रचंड धर्मविस्तार बुद्ध धर्मानुयायी जनांनी केवळ नीतीवाले करून केला. इतर कित्येक धर्माप्रमाणे त्यांनी कोणावरही जुलूम असा कदापि केला नाही.
तेव्हा तात्पर्य काय की, हा एवढा प्रभाव एका महापुरुषाने प्रवृत्त केलेल्या धर्ममताचा व्हावा ही मानवी इतिहासातील अत्यंत आश्चर्यावह गोष्ट होय आणि याबद्दल आम्हा भरतखंडवासी जनांस मोठे भूषण असून आम्ही या अलौकिक पुरुषाच्या चरितामृतपानाविषयी उत्कंठित होणे योग्य होय.
येथवर फक्त प्राकृत विषयाचे महत्त्व किती आहे त्याचे दिग्दर्शन केले. आता बुद्ध या भारतभूमीत निर्माण होण्याच्या सुमारास आर्यधर्माची व समाजाची स्थिती कशी काय होती, तिचे संक्षेपतः विवेचन करू. हिंदुस्थानवासी आर्याचा प्राचीन धर्म वेदामध्ये दिसून येतो. त्याचे कालांतराने रूपांतर होता होता मूळ स्वरूप पुष्कळच पालटले. पूर्वकाली जे धर्मविधी मनापासून पाळले जात असत त्याला पुढे पराकाष्ठेची कृत्रिमता आली.
ऋग्वेदातील देवतांची आराधना व पूजा प्राचीन ऋषी जशी मोठ्या प्रेमाने व उत्कंठेने करीत असत तशी आता मुळीच होईनाशी झाली. इंद्र, उषा, वरुण इत्यादी देवतांच्या नामोच्चाराने प्राचीन आर्यांच्या हृदयात ज्या वृत्ती व कल्पना उत्पन्न होत असत, तशा आता कोणाच्याही मनात येत नसत. या देवता यावेळी केवळ नामशेष झाल्या.
सोम, दुग्ध, मांस इत्यादी पदार्थाचे अर्पण प्राचीन ऋषी आपल्या आराध्यदेवतांस जसे केवळ मोठ्या भक्तीने करीत असत तसे आता काहीच होईनासे झाले. ही साधी अर्पणाची पुरातन रीती जाऊन तिच्या जागी मोठ्या बिकट व नियमांचे अवडंबर माजून निरर्थक अशा यज्ञादिकांच्या पद्धती सुरू झाल्या, साध्या सरळ भावाने व केवळ प्रेमाने अर्पणांद्वारे स्वदेवतार्पण करणाऱ्या प्राचीन ऋर्षीचे वंशज यावेळी एक मोठी जात होऊन बसले.
ही जात असा हक्क सांगू लागली की, यज्ञादी विधी करण्याचा अधिकार केवळ आपणासच आहे. देवतांचे आव्हान व आराधना करण्याचे मंत्र म्हणण्याचा अधिकार अन्य कोणासही नाही.
या उपाध्यायवर्गाकडून आपले विधी करून घेतले असता व देवतांची आराधना त्यांच्या मुखाने केली असता आपणास अवश्य पुण्यप्राप्ती होईल, एरवी व्हावयाची नाही, अशी समजूत या उपाध्यायवर्गाने इतर जनांची करून दिली. तात्पर्य काय की, ऋग्वेदतांर्गत स्तोत्रे ज्यांनी प्रारंभी करून स्वाभिमत देवतांची आराधना केली त्यांच्या हृदयात जी धर्मभावना व जी प्रेमळ वृत्ती होती
ती नष्ट होऊन लोकांमध्ये मोठमोठे बिकट विधी व निरर्थक यज्ञादी पद्धती उद्भवल्या. पुढे कालांतराने या अनिष्ट स्थितीस कित्येक विचारशील पुरुषांकडून प्रतिकार होऊ
लागला. कित्येकांच्या मते, हा प्रतिकार इसवी सनापूर्वी अकराव्या शतकाच्या सुमारास सुरू झाला म्हणजे अर्थात या पृथ्वीतलावर बुद्ध अवतरण्यापूर्वी सरासरी पाच शतकारास प्रतिकार होऊ लागला होता. वेदकालानंतरचा जो ब्राह्मणकाल त्या काली सर्वत्र रूढ आलेल्या यज्ञादिकांच्या पद्धतीविषयी कित्येक महाशय पुरुषांच्या चित्तात अनादर उत्पन्न होऊन व त्यात गुंतून आयुष्यव्यय केल्याने स्वजीवितसार्थक्य काहीच व्हावयाचे नाही, असे त्यास वाटून ते जीवात्मा व परमात्मा याविषयी विचार करू लागले. त्यांचे तत्त्वविचार उपनिषदग्रंथात ग्रंथित केले आहेत.
या सर्व विचारांचे सार असे होते की, हे सारे चराचर विश्व एका ब्रह्मापासून निर्माण झाले असून, ते त्यांचे केवळ अंशरूप होय. त्याचप्रमाणे मृत्यू, परलोक, पुनर्जन्म इत्यादी गूढ गोष्टींचे त्यात विवेचन आहे. आमच्या लोकांमध्ये ज्यापुढे निरनिराळ्या तत्त्वज्ञानपद्धती निर्माण झाल्या, त्या सर्वांची बीजे या उपनिषदग्रंथात आढळतात.
याप्रमाणे त्या काळच्या आर्यांमध्ये स्वतंत्र विचार जागृत होऊन मोठमोठे गहन तत्त्वविचार निर्माण झाले होते, हे जर खरे आहे तरी त्याकाळी अशा विचारात मग्न होऊन इतर सर्व कर्मकांड विसरणारे पुरुष फारच थोडे असत. त्या काळचे सामान्यजन रूढ असलेल्या यज्ञयागादी कर्मकांडातच आपला काळ घालवीत असत. हे कर्मकांड प्राचीन वेदविहित आहे, यास्तव ते केल्याने पुण्यप्राप्ती होईल असा त्यांचा दृढ विश्वास असे.
उपाध्यायवर्गास तरी हेच हवे असे. लोकांची या अप्रयोजक कर्मकांडावरील श्रद्धा कमी होऊ नये म्हणून ते अनेक प्रकारचे उपाय करीत. कर्मकांडप्रशंसापर ते नाना ग्रंथ लिहून जनांत प्रसिद्ध करीत आणि त्यांची त्याकडे सर्वदा प्रवृत्ती राहण्याविषयी नाही नाही त्या युक्ती योजीत.
ही अशी स्थिती इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात हिंदुस्थानामध्ये होती. खरी धर्मवासना जनचित्तांतून बहुतेक लोपल्यासारखीच झाली होती. जिकडे तिकडे शुष्क व अप्रयोजक कर्मकांड माजले होते. ब्राह्मणांचे स्तोम मनस्वी माजून त्यास काही विशेष अधिकार व सवलती प्राप्त झाल्या होत्या. शूद्रासंबंधी अतिक्रूर नियम प्रचारात आले होते.
यामुळे तेव्हाच्या कित्येक ग्रंथांतून आढळणारे सामाजिक व नीतीसंबंधी उत्कृष्ट नियम असून नसून सारखेच झाले होते. या वेळच्या ब्राह्मण जातीचे वर्चस्व एवढे मोठे असता त्या जातीचासुद्धा म्हणण्यासारखा उत्कर्ष झाला नाही. त्यांची जात पराकाष्ठेची लोभी, अहंमन्य व अज्ञान, गर्विष्ठ झाली.
ती इतकी की, त्या वेळच्या सूत्रकारांनी त्या जातीला याबद्दल फार दोष लाविला आहे. या काळी आर्याचा आश्रय पत्करून जे इतर जातीचे जन राहिले होते, त्यांस शूद्र म्हणण्याचा परिपाठ पडला होता. या आश्रितजनांस आर्यधर्म ग्रंथ व धर्मविधी करण्याची बंदी असे. त्याचप्रमाणे आर्यांचे कोणतेही धर्मविधी करण्याची त्यास
बंदी असे. त्यांना समाजात कोणत्याही प्रकारचा मान नसे. त्यास हीन लेखून उच्चवचि जन त्यांचा तिरस्कार करीत. त्या आपल्या हीन स्थितीबद्दल तेव्हाच्या शूद्रजनांस परम खेद होत असे. ही आपली स्थिती पालटावी असे त्यांना अहर्निश वाटे.
पुढे पुढे तर या शुद्रवर्णातील लोकांची संख्या वाढून ते निरनिराळे उपयुक्त धनोत्पादक धंदे करू लागले, त्यांच्यापैकी कित्येकांच्या ताब्यात मोठमोठ्या जमिनी व गावे येऊन ते मोठे वजनदार गृहस्थ झाले. असा त्यांच्या स्थितीत चांगला पालट झाला असताही तेव्हाच्या धर्म व व्यवहार ऐतद्विषयक ग्रंथामध्ये त्यांच्याविषयी अत्यंत अन्यायाचे नियम पुन्हा पुन्हा प्रणीत व करीत असत.
ज्या पुरुषाच्या ठायी सत्य व न्याय याविषयीची प्रीती वसत असते, ज्याच्या बुद्धीला थोडाबहुत सुसंस्कार होऊन सभोवतालची स्थिती नीट लक्षपूर्वक पाहण्याची शक्ती ज्याच्या अंगी आलेली असते, परदुःख पाहून ज्याचे हृदय कळवळून जाते आणि ज्यास परोपकार करण्यातच स्वजीवित सार्थक्य आहे असे वाटत असते, त्याच्या दृष्टीस ही या वेळची दुःस्थिती पडली असता त्याला खरोखरीच वाईट वाटल्यावाचून राहत नाही.
त्याकाळी आर्यांची जी धर्मसंबंधी व इतर विद्या उपलब्ध होती, ती सारी गौतम बुद्ध पढला होता तरी आपण जे काही शिकलो ते कितपत हितावह व सत्य आहे याचा विचार त्याच्या मनात उत्पन्न झाला. हा विचार करता करता त्याला असे दिसून आले की, मानवामध्ये जे हे जातीसंबंधी निर्बंध रूढ आहेत ते सर्वथा अयोग्य होत आणि त्याच्या दयामय अंतःकरणात अशी उत्कट इच्छा उत्पन्न झाली की हीन, दीन व त्रस्त जनांची स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी उपाय योजावा.
वरती सांगितले आहेच की, यज्ञयागादिकांच्या खटपटीत सर्वदा चूर होण्यात काहीच सार्थक्य नाही असे ज्यास वाटत असे त्यांस कर्मकांडांविषयी व एकंदर संसाराविषयी उपरती होऊन त्यांच्या मनाची प्रवृत्ती याहून काही तरी उच्चतर धर्ममार्ग आहे किंवा कसे याचा विचार करण्याकडे होत असे. असे जन वानप्रस्थ होऊन अरण्याच्या ठायी पर्णकुटिका बांधून एकांतात राहत असत.
अशा रीतीने संसाराचा व्याप सोडून मोकळे झाले म्हणजे त्यांचे चित्त आध्यात्मिक विचारांकडे निर्वेधपणे लागत असे. ते सृष्टीचे अवलोकन सतत करून, स्वतःच्या मनाशी तिचा पुन्हा पुन्हा विचार करून आत्मा, परमात्मा, परलोक आदी करून धर्मतत्त्वासंबंधी अनुमाने करीत असत.
याप्रमाणे स्वशिष्यांद्वारे केले. यापैकी बहुतेक विचार करणारे ऋषी पुरातन वेदाच्या आधारावरच आपले तत्त्वविचार रचित; परंतु त्या सर्वांचे साधारण धोरण असे असे की, यज्ञादी कर्मे करून स्वकार्यसिद्धीसाठी पशुहिंसा करणे युक्त नव्हे, असे प्रतिपादन करून जनचित्तामध्ये उच्चत्तर धर्मसंकल्पनांचा प्रवेश
होईल असे करावे. फार तर काय; पण यज्ञयागादी महाप्रसंगी त्यास इतर ब्राह्मणाप्रमाणे निमंत्रण गेले म्हणजे ते त्या समयी तेथे अवश्य येत आणि मग पूर्वापार चालत आलेल्या क्रमाप्रमाणे यज्ञ चालला असता ते अध्यात्मविषय काढून भवती न भवती करीत आणि आपापल्या विचारांचे मंडन करण्याचा प्रयत्न करीत.
याप्रमाणे तत्त्वविचारांकडे विचारी जनांची प्रवृत्ती झाल्यानंतर यज्ञांविषयी कित्येक ऋषींनी अशी कल्पना बसविली की, यज्ञ करून ईशकृपा संपादन करावयाची ती पशुयज्ञाने कदापि प्राप्त होणे नाही, तर तिच्या प्राप्तीसाठी आपल्या ठायीच्या असद्वृत्तीचा होम केला पाहिजे.
आपल्या ठायीच्या ज्या वासना व तृष्णा आपणास पापकर्माकडे प्रवृत्त – करणाऱ्या असतात त्यांचा यज्ञ केल्यानेच खरी कैवल्यप्राप्ती होते. याप्रमाणे यज्ञकर्मास – आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊन बाह्य कर्मापेक्षा आत्मोन्नती विशेष हितकर असून, – वास्तव सुखाची प्राप्ती करून देणारी आहे, असा उपदेश कित्येक धर्मगुरूंकडून होऊ लागला.
या उपनिषत्काली वेदाच्या आधाराने तत्त्वविचार करणारे जे जन निर्माण झाले त्यांचे साधारणतः धोरण पाहिले तर ते अलीकडे ज्यास वेदांतमत म्हणण्याची प्रवृत्ती पडली आहे त्याकडे मुख्यतः होते, असे दिसून येते. सर्व चराचर विश्व एका ब्रह्मापासून उद्भवले असून ते पुनरपि त्यातच लीन होणार आहे. नामरूपभेद जो आज दृग्गोचर होत आहे तो केवळ मायेचा खेळ आहे.
ही सारी भ्रांती आहे. हा सर्व पसारा केवळ चंचल व अशाश्वत आहे. वास्तव अचल व शाश्वत असे एक ब्रह्मच आहे. याशिवाय अन्य काहीच नाही. नामरूपभेद उत्पन्न होऊन आत्म्यास उपाधित्रयाच्या योगाने शोक व जन्ममरणही प्राप्त झाले आहे. वयापासून मुक्त होऊ इच्छिणाऱ्यांनी ऐहिक किंवा पारलौकिक सुखविषयांच्या प्राप्तीची – लालसा धरू नये. त्याविषयीच्या कामनांचा समूळ उच्छेद करावा. म्हणजे मोक्षसिद्धी सुगम होऊन अंती परमात्म्याच्या ठायी प्रत्यगात्मा या जड कलेवरामुळे प्राप्त झालेल्या बंधनांचा छेद करून लीन होतो.
याप्रमाणे परब्रह्मी लीन होईपर्यंत जीवात्म्यास जन्ममरणरूप संस्मृती भोगावी लागते. नामरूप धारण करणाऱ्या प्रत्येक जीवाच्या कर्माप्रमाणे त्यास उच्च-नीच स्थिती प्राप्त होते. संस्मृतीचा पाश तोडण्याचे उपाय दोन; एक असा की, मनुष्याने कामनांचा जय करावा व प्रारब्ध प्राप्त देहकर्मे फलाशा न धरिता जीवमान आहे तोपर्यंत केवळ अलिप्तपणे करावी, म्हणजे त्यास कर्मसंग न घडून तन्मूलक सुख-दुःखापासून तो मुक्त होतो.
दुसरा उपाय असा की, आत्मविषयक अज्ञानामुळे चित्तास भ्रांती होऊन अशाश्वत काय, शाश्वत काय याचा विवेक होत नसतो. तो सत्य ज्ञानाच्या योगाने झाला म्हणजे अज्ञानतिमिरनाश
होऊन परब्रह्मप्राप्ती होते. यास्तव मानवाने दुःख व क्लेश यांनी युक्त अशा या ऐहिक जीवनाची मुळीच पर्वा करू नये, तर शाश्वत व सतत परमानंदप्राप्तीचे आस्पद जे परब्रह्म त्याच्या प्राप्तीच्या मार्गाचा अवलंब प्रत्येकाने करावा. क्षणभंगुर संसाराविषयी प्रीती मनात क्षणभरसुद्धा येऊ देऊ नये, तर त्याचा होईल तितक्या लवकर त्याग करून परमात्मप्राप्तीविषयी प्रयत्नशील असावे.
हा असा धर्मविचार व तत्त्वविचार उपनिषत्काली भारतखंडातील कित्येक भागांमध्ये प्रचलित झाला. या विचाराप्रमाणे आपला वर्तनक्रम ठेवणारे पुष्कळ महात्मे वेळोवेळी निर्माण होऊन ते इतर जनांस आपल्यासारखे करण्याविषयी सतत परिश्रम करीत. हा त्यांचा क्रम बुद्धाच्या काळापर्यंत अव्याहतपणे चालला होता. हा तत्त्वविचार केवळ वेदांत आधार घेऊन प्रचलित केला होता, म्हणून त्यास कोणी वेदांत असेही म्हणतात;
परंतु बुद्धाच्या वेळी यास ब्रह्मविद्या म्हणत असून, ती प्रतिपादन करणारास ब्राह्मण अशी संज्ञा असे. म्हणून ‘ब्रह्म जानति ब्राह्मण’ ही ब्राह्मण शब्दाची व्युत्पत्ती पुरातन काळापासून लोकसंमत आहे आणि त्या काळी अशाच ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणास इहलोकी देवासारखा मान असे.
आता या स्वतंत्र विचाराच्या युगामध्ये वेदाचा आधार न घेता केवळ आपल्या बुद्धीच्या साहाय्याने जो काय होईल तो तत्त्वविचार करणारे कित्येक महात्मे निर्माण झाले, असे दिसून येते. उपनिषत्कालास आरंभ होऊन बुद्धाच्या आगमनापर्यंत असे स्वतंत्र विचार करणारे लोक पुष्कळ झाले होते. त्यांनी आपापल्या बुद्धीच्या व विचारशक्तीच्या मगदुराप्रमाणे निरनिराळे तत्त्वविचार व धर्मविचार स्वशिष्यांद्वारे त्या काळच्या लोकांत प्रचलित केले होते.
उपनिषत्कालानंतर जे मोठमोठे तत्त्वविचार करणारे जन झाले ते बहुतेक असे म्हणत की, आपल्या विचारास उपनिषदांचा आधार आहे आणि हे त्याचे म्हणणे खोटे नसे. कारण उपनिषत्काली सर्व प्रकारचे धर्मविचार व तत्त्वविचार बीजरूपाने किंवा विस्तरतः होऊन चुकले होते. तेव्हा प्रत्येकाने आपल्या मताला उपनिषदग्रंथाचा आधार आहे असे प्रतिपादन करून स्वाभिमत विचारांकडे जनप्रवृत्ती करण्यास फारशी पंचाईत नसे.
हल्ली जशी उपलब्ध असलेली सर्व उपनिषदे पाहिजे त्यास सामग्रे करून अवलोकन करावयास मिळणे शक्य झाले आहे तसा काहीच प्रकार पुरातन काळी नसल्यामुळे हा असा घोटाळा वारंवार होत असे. यामुळे परस्परविरोधात्मक मतांचा पुरस्कार व प्रसार, सर्वांस पूज्य व मान्य असे जे उपनिषद ग्रंथ त्यांच्या आधाराने होत असे आणि या विरोधाची मीमांसा करणे त्या काळी बरेच अशक्य असल्यामुळे ‘धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनोयेन गतः स पंथः’ अशी तोड सामान्य जनास काढावी लागत असे. याप्रमाणे जे वाटतील ते विचार जनात प्रसिद्ध करण्याची मोकळीक असल्यामुळे आर्यावर्तात त्याकाळी अनेक धर्मग्रंथ व तत्त्वविचारपद्धती
निर्माण झाल्या. बौद्ध धर्म हा अशापैकीच एक होय. बुद्धाचे म्हणणे असे की, चालू असलेले यज्ञयागादिकांचे शुष्क कर्मकांड केवळ निरर्थक व अप्रयोजक असून, पुरातन व खरा कैवल्यप्रद जो धर्ममार्ग त्याकडे जनांची प्रवृत्ती होणे इष्ट आहे आणि सांप्रत जी बुद्ध धर्माची मूळची मते उपलब्ध आहेत त्यातील बहुतेकांस उपनिषदांचा आधार आहे.
यावरून पाहता बुद्धमत हे काही तरी नवीनच बंड नसून आमच्या पुरातन अगणित धर्मविचारांपैकी व तत्त्वविचारांपैकी काहीकांचे मंडन करणारे होते असे म्हणावे लागते. तरी वेदाविषयी बुद्धाच्या मनात आदरबुद्धी मुळीच नव्हती.
उपनिषत्काळास आरंभ होऊन बुद्धावतारासमयी निदान पाचशे वर्षे तरी लोटली होती असे दिसते. त्याच्या वेळी शेकडो स्वतंत्र रीतीने तत्त्वविचार करणारे जन निर्माण झाले होते. जो तो मनास वाटतील तसे विचार लोकांत प्रसिद्ध करीत असे. यामुळे जिकडे तिकडे घोटाळा उत्पन्न झाला होता. आपले या जगात खरे कर्तव्य कोणते व परलोकप्राप्तीसाठी कोणते उपाय योजावेत याविषयी लोकांची मने साशंक झाली होती.
कित्येकांच्या मनात तर परलोक, आत्मा, परमात्मा, पुण्य, पाप इत्यादी धर्मविषयक गोष्टींविषयी अश्रद्धा उत्पन्न होऊन जिकडे तिकडे अनाचार व उच्छृंखलपणा सुरू झाला होता. कित्येकांना असे वाटे की, हा संसार सोडून गिरिकुहरामध्ये जाऊन बसावे आणि तेथे तपश्चर्या करून देहदंडन करावे. म्हणजे देवास आपली करुणा येऊन तो आपणास मोक्षपदास नेईल.
अशा प्रकारे संसारास त्रासलेले कित्येक जन महंत बनून लोकांस असा बोध करीत की, हा संसार केवळ असार आहे. त्याच्या पाठीस लागून कर्ममार्गामध्ये व पापी जनांच्या संगतीत आयुष्य व्यय करण्यात काही एक अर्थ नाही. जगातील एकंदर सुखविषयक अशाश्वत व दुराचाराकडे प्रवृत्ती करणारे असल्याकारणाने त्यांची लालसा धरणे चांगले नव्हे, तर वासनाजय करून व केवळ असंग होऊन आध्यात्मिक उन्नती साधावी.
या अशा शोधाचा परिणाम ज्यांच्या मनावर होत असे ते संसार त्याग करून केवळ विरक्त बनून या महंताचे अंतवासित्व स्वीकारीत असत. याप्रमाणे बनलेले गुरू-शिष्य समुदाय बुद्धाच्या वेळी जागोजागी आढळून येत. या विरक्त मंडळ्या भिक्षापात्रावर उपजीवन करीत असत. म्हणून त्यास ‘भिक्षू’ अशी संज्ञा असे. हे संन्याशांचे समुदाय त्यावेळी प्रचलित असलेल्या निरनिराळ्या मतांचे असत.
आपली मते प्रतिपादन करण्यास जे साहित्य अवश्य लागे ते सर्व मिळविण्यासाठी ते – मनापासून उद्योग करीत. यामुळे त्यांच्या अंगी वावदूकपणा उत्तम प्रतीचा असून तो ते – स्वपक्षमंडन व प्रतिपक्षखंडन करण्यामध्ये चांगल्या प्रकारे दर्शवीत असत. वाद-प्रतिवादः करून त्यांची तर्कशक्ती विलक्षण वाढली होती व संपादित ज्ञानाची उपस्थिती त्यास – वाखाणण्यासारखी असे.
दुःखनिवृत्ती कशी होईल हा विचार या काळी विवेकी मनुष्यांच्या मनात सतत घोळत असल्यामुळे ते त्यातून मुक्त होण्यासाठी नाना युक्त्या योजीत. केवळ संसारत्याग केल्याने सर्व दुःखविमोचन होत नाही, ते तत्त्व समजण्यास मुळीच विचार लागत नाही.
यास्तव एवढाच एक मार्ग कल्पून तेव्हाचे लोक राहिले नाहीत. कित्येकांचे असे म्हणणे असे की घोर तपश्चरण करून देहदंडन केले असता ईश्वरप्रसादाने मनुष्यास अलौकिक सिद्धी प्राप्त होतात.
या सिद्धी मुख्यतः आठ मानल्या होत्या. कित्येकांच्या मते या सिद्धी देहदंडनाने म्हणजे हठयोगानेच केवळ प्राप्त होतात असे नाही, तर मनोजय व वृत्तिजय करून शुद्धाचरण ठेविले असता मानवास त्या प्राप्त होणाऱ्या आहेत. या सिद्धीच्या योगाने मनुष्यास सर्व प्रकारच्या ऐहिक दुःखापासून मुक्त होता येते असे ते म्हणत.
बुद्धाच्या पूर्वी नाव घेण्यासारखी तत्त्वज्ञानीपद्धती म्हटली म्हणजे एक सांख्यमतवाद्यांचीच होती. या तत्त्वपद्धतीचा मूळ प्रवर्तक कपिल नामे करून एक महामुनी होता. त्याचे विचार वेदधर्मास पुष्कळ सोडून होते. त्याच्या विचारपद्धतीस निरीश्वरसांख्य असे म्हणण्याचा परिपाठ पडला आहे. त्याच्या विचारास निरीश्वरसांख्य म्हणण्याचे कारण असे आहे की, तो हे विश्व कोणी ईश्वरशक्तीने निर्माण केले आहे असे मुळीच मानीत नसे.
कारण त्याचे असे म्हणणे असे की, जेथे मूळचे काहीच नसते तेथे कोणाच्याने काहीएक उत्पन्न करावयाचे नाही, तर पदार्थाच्या ठायीच ही विकास पावण्याची शक्ती असली पाहिजे, ती पदार्थात मूळची नसेल तर ती त्यात कोणालाही घालता येणारी नव्हे. गती पावणे हा परमाणूंचा स्वभावधर्मच आहे. या प्रकृतीरूप परमाणूंच्या ठायी प्रेरकरूपाने पुरुष स्थित आहे. तो त्यापासून अलग असा कदापि व्हावयाचा नाही. यास जड व चैतन्य अशी नावे द्यावयाची, हीच काय ती या विश्वामध्ये सद्रूप आहेत. यांच्या योगाने हे चराचर विश्व निर्माण झाले आहे. सत्त्व, रज व तम या तीन गुणांनी युक्त जी प्रकृती तिचा पुरुष हा केवळ साक्षी आहे.
तरी त्याला प्रकृतिसंगाने सुख-दुःखादिकांचा अनुभव घडतो. पुरुष प्रकृतिबद्ध झाल्याच्या योगाने त्यास तीन प्रकारचे दुःख होते. हे प्रकार अर्थात आधिदैविक, आध्यात्मिक व आधिभौतिक होत. या त्रिविध तापांपासून मुक्त होणे हाच पुरुषास मोक्ष होय. हा मोक्ष पुरुषाची कर्मवासना नष्ट होऊन त्यास स्वरूपाचे ज्ञान झाले म्हणजे व्हावयाचा. याप्रमाणे सांख्यमताचे मुख्य सिद्धांत आहेत. या मत्ताचा यापूर्वी निर्दिष्ट केलेल्या वेदानुसार प्रचलित झालेल्या ब्रह्मविद्येचा बुद्धमतावर पुष्कळ परिणाम झाला होता.
एकंदरीत पाहता बुद्धाच्या पूर्वी आर्यावर्तात पूर्वजन्म व पुनर्जन्म यांची कल्पना, कर्मानुसार बरी-वाईट गती प्राप्त होते हा सिद्धांत, ऐहिक जीवन कष्टमय व असार आहे ही समजूत, अज्ञाननाश होऊन सत्यज्ञानाच्या योगाने संसृतिमूलक दुःखाची निवृत्ती होते
हा निर्णय, सर्व ऐहिक सुखाचा त्याग करून देहदंडन केल्याने किया मनोजय केल्याने शाश्वतसुखप्राप्ती होते असा उपदेशही सर्वत्र रूढ आला होता. त्याचप्रमाणे शूद्रादी नीच मानलेल्या जातीस उच्चवर्णसंमत मोक्ष साधण्याचा अधिकार नाही. हीन जातीनी स्वतःची कितीही सुधारणा केली तरी त्या अस्पृश्य व नीच समजावयाच्या मोक्षसिद्धीस तपश्वरवादी कष्टसाध्य उपायांची आवश्यकता अत्यंत आहे.
यज्ञादिकर्मकांड स्वर्गादी आमिष दाखवून वित्तशुद्धीसाठी विहित केले आहे इत्यादी समजुती जिकडे तिकडे पसरल्या होत्या. ह्या अशा सर्वसाधारण समजुती प्रवृत्त झाल्या होत्या तरी आर्यावर्तामध्ये त्या काळी विचारस्वातंत्र्य असल्याकारणाने जो तो आपापल्या बुद्धीप्रमाणे धर्मकल्पना व तत्त्वविचार जनांत प्रकट करीत असे. याचा थोडासा मासला आमच्या वाचकास येथे सादर करितो. कोणी म्हणत की, हे विश्व अनादि व अनंत आहे, कोणी म्हणत की, त्यास आरंभ असून ते सांत आहे.
कोणी म्हणत की, आत्मा अनादि आहे. कोणी म्हणत की, त्यास आदि आहे, कोणी या अनाद्यतत्त्वाची एकवाक्यता प्रतिपादित असत. कोणी तर तसा तर्क चालवीत की, विश्व व आत्मा हे अनादि आहेत तरी सांतही आहेत. जे अनादि नाही ते सांत असू शकेल. कोणी तर असे म्हणत की, अनाद्यनंतत्वाची कल्पना केवळ व्यर्थ आहे. सर्वकाही आदियुक्त व सांत आहे.
याप्रमाणे नानाप्रकारे तर्कवितर्क करता करता मुख्यतः दोन विचारपद्धती निर्माण झाल्या. एका विचारपद्धतीप्रमाणे जेवढे काही गोचर होते तेवढेच काय ते सत्य आहे, असा सिद्धांत स्थापित झाला होता आणि दुसऱ्या विचारपद्धतीप्रमाणे जेवढे काही गोचर होते तेवढे सारे चंचलत्वास्तव असत्य होय, हा सिद्धांत रूढ झाला होता.
याप्रमाणे तत्त्वविचार व धर्मविचार यामध्ये दुफळी होऊन इहलोकाव्यतिरिक्त परलोक आहे किंवा कसे? मनुष्य मरण पावल्यावर त्याचा आत्मा शेष राहतो किंवा कसे? मनुष्याने केलेल्या पातकाबद्दल त्यास दंड होतो तो कोणत्या प्रकारे होतो? इत्यादी प्रश्न उत्पन्न झाले होते आणि तत्कालीन सर्वविद्यापारंगत पंडितजनांमध्ये या प्रकरणी प्रचंड विवाद माजून राहिला होता. ही अशी स्थिती उपनिषत्कालास प्रारंभ होऊन बुद्धाच्या वेळी सुमारे पाचशे वर्षे लोटली होती त्यावेळी आर्यजनांची होती.
आता बुद्धाने या भारतभूमीत निर्माण होऊन जे धर्ममत स्थापित केले त्याचे धोरण कसे काय होते त्याचे संक्षेपतः निरूपण करून हा उपोद्घातरूप लेख पुरा करू. जे सारे दिसते ते अशाश्वत असून भ्रममूलक व शोकमूलक आहे. त्याची लालसा सर्वत्र रूढ झाल्या कारणाने संसारमूलक दुःखापासून सुटण्याचा खरा मार्ग कोणता याविषयी जो तो विचार करू लागला आणि जो मार्ग आपणास योग्य वाटला त्याचा पुरस्कार करण्याची इच्छा प्रत्येकास स्वभावतः होऊ लागली. बुद्ध अशाच विचारी पुरुषांपैकी एक होता. त्याच्या
बेळी मुख्यतः दोन प्रकारचे लोक समाजामध्ये दृष्टीस पडत. एका प्रकारच्या लोकांस असे बाटे की, पुरातन काळापासून चालत आलेली यज्ञयागादी कर्मे करण्यातच जीवितसार्थक्य आहे. या समजुतीचा प्रसार पुष्कळ लोकांमध्ये झाला होता.
दुसऱ्या प्रकारच्या लोकांस असे वाटे की, या शुष्क कर्मकांडात काहीच तथ्य नाही, तर या दुःखमय संसाराचा त्याग करून, वनवास पत्करून ध्यानधारणा, तपञ्चरण इत्यादिकांमध्ये जीवितक्षय करावा, म्हणजे खरी सौख्यप्राप्ती होईल; परंतु बुद्धाला या उभय प्रकारच्या लोकांच्या समजुतीत व कृतीत काहीच अर्थ नाही असे वाटून त्याने नवाच जीवितसार्थक्याचा मार्ग काढला.
तो अर्थात असा की, मनुष्याने यज्ञादी कर्मकांडात किवा देहदंडमूलक तपश्चरणात आपला अमोलिक जीविताचा क्षय करण्याचे टाकून देऊन स्वतःच्या ठायीच्या वासनांचा जय करून सदाचारी व्हावे. मानवांची अनीतीकडे ज्या गोष्टींनी प्रवृत्ती होण्यासारखी असते त्याचा बीमोड करण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने मनुष्याचे आचरण पवित्र होऊन त्याचे दुःख टळेल आणि त्यास सुखशांतीचा लाभ होऊन व अंती सर्व उपाधींचा क्षय होऊन निर्वाणपदवी प्राप्त होईल.
ही अशी अनैतिक उन्नती प्रत्येक प्राण्याची होणे शक्य आहे, असा बुद्धाच्या मनाचा निश्चय होऊन त्याने मनुष्यजातीस दुःखापासून सोडविण्याच्या या स्वाभिमत मार्गाचा उपदेश करीत फिरण्याचा निर्धार केला. सर्व प्रकारच्या व सर्व जातीच्या स्त्री-पुरुषांस त्याचा असा बोध असे की, तुम्हास दुःखमुक्त व्हावयाचे असेल तर तुम्ही आपली आध्यात्मिक उन्नती करा. ही उन्नती कर्मकांडाच्या किंवा तपश्चरणाच्या योगाने होणे नाही.
खरी नीतिमत्ता वाढल्यावाचून आणि सर्व प्रकारच्या विषयवासना व सुखतृष्णा यांचा उच्छेद झाल्यावाचून दुःखनिवृत्ती व्हावयाची नाही. हा दुःखनिवृत्तीचा मार्ग सर्व जातींच्या, वर्णाच्या व दर्जाच्या लोकांस साध्य होणारा असून त्यास अनाधिकारी असा कोणीच नाही.
याप्रमाणे त्या वेळच्या आर्यजन समाजात जो वर्णादिकांचा भेद उत्पन्न झाला होता व जो अधिकारानधिकाराचा बराच प्रकार माजला होता, त्याला प्रतिरोध करण्यास बुद्ध प्रथमतः प्रवृत्त झाला असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. वेदसंहिता, ब्राह्मणे आणि उपनिषदे यामध्ये पुष्कळ टाकाऊ मजकूर आहे. त्यात जेवढा सत्य व हितकर भाग असेल तेवढा आपल्या विवेकबलेकरून निवडून घ्यावा, असा बुद्धाचा जनास उपदेश असे.
हे ग्रंथ अपौरुषेय मानून त्यातील सर्वच गोष्टी ईश्वरप्रोक्त आहेत असे म्हणणे व्यर्थ होय. त्या ग्रंथसमुदायात आढळणारा बालिशपणा, विसंवाद, विसंगतपणा व अपयोजकपणा पाहिला म्हणजे सर्वज्ञ, सर्वसाक्षी अशा देवाने ते ग्रंथ मानवास दिले असे म्हणणे चमत्कारिक वाटते, असे बुद्धाचे म्हणणे असे. ‘तुम्ही जे काही ऐकत आला आहा, ते सारे सत्य आहे असे मानू नका. ज्या गोष्टी पितृ-पुत्र परंपरेने चालत आलेल्या असतात किंवा ज्या केवळ
दंतकथारूपाने जनांत रूढ झालेल्या असतात त्यावर श्रद्धा ठेवू नका. कोणत्याही गोष्टी पुष्कळ लोकांच्या तोंडी आहेत म्हणून त्या खऱ्या आहेत असे सहसा मानू नका. एखाद्या पुरातन साधूने एखादी गोष्ट लिहून ठेवली आहे म्हणून तीवर भरवसा ठेवावा असे कदापि समजू नका.
नुसत्या पोकळ अनुमानावर किंवा निराधार कल्पनांवर विश्वास ठेवू नका. केवळ अभ्यासास्तव जी गोष्ट तुमच्या अंगवळणी पडलेली असते ती खरी असली पाहिजे असं कदापि समजू नका. कोणतीही गोष्ट तुमचे गुरू किंवा वडील माणसे सांगतात म्हणून ती खरी वाटून घेऊ नका, तर योग्य अवलोकन व सत्यासत्यविमर्शण करून जे विवेकास अनुसरून आहे असे सिद्ध होईल व जे सदाचारप्रवृत्ती वाढविणारे असून एकंदर जनसमाजाचे हित करणारे आहे असे दिसेल त्याचा अंगीकार करून तद्नुसार स्ववर्तन ठेवण्याचा प्रयत्न करा’ असा बुद्धाचा स्वशिष्यांस उपदेश आहे.
याप्रमाणे बुद्धाने ग्रंथप्रामाण्य व आत्मवचनप्रामाण्य याविषयीचा निकाल लावून केवळ विवेकशक्तीस प्राधान्य दिले. जे अत्यंत गूढ प्रश्न विचारी मनुष्य आपापल्या सामर्थ्यानुसार व चिररूढ पद्धतीप्रमाणे सोडविण्याच्या कामात गुंतले आहेत, त्याचा परिस्फोट व विवेचन करण्याची ही पद्धती प्रथमतः बुद्धानेच रूढ केली, असे म्हणावे लागते.
त्या वेळच्या आर्यतत्त्ववेत्त्यास सत्यासत्यविमर्शणाला जी प्रमाणे अवश्य वाटत त्यामध्ये आप्तवचनप्रामाण्याचे माहात्म्य पराकाष्ठेचे असे. ज्या गोष्टी अतींद्रिय असून ज्यांच्याविषयी मानवास काहीच तर्क करिता येत नाही, त्या आप्तवचनाच्या प्रमाणावरून सत्यवत मानावयाच्या, असा त्यांचा साधारण क्रम असे;
परंतु बुद्धाने या बहुतेक सर्वसाधारण प्रवृत्तीस प्रतिरोध करून असे स्थापित केले की, ज्या गोष्टी स्वविवेकास अगम्य असतील, त्या श्रुत्यादि परमपूज्य मानलेल्या ग्रंथात सांगितलेल्या असल्या किंवा कोण परम सात्त्विक पुरुषाने उपदेशिलेल्या असल्या, तरी त्या खऱ्या मानू नयेत. याप्रमाणे आत्मविषयक कल्पना, ज्या बुद्धाच्या वेळी सर्वत्र रूढ झाल्या होत्या, त्या त्याने मुळीच मनास आणल्या नाहीत.
त्यात सत्याचा अंश असल्यास तो मानवाच्या बुद्धीस विषय होणारा नाही, असे त्याचे मत असे. ईश्वरकल्पनेविषयीही त्याचे विचार याचप्रमाणे होते. संसृतिमूलक दुःखनिवृत्तीरूप मोक्ष तो – मानवास इहलोकी स्वतःच्या परिश्रमानेच केवळ प्राप्त व्हावयाचा. तो प्राप्त होण्यास कोणा – ईशशक्तीचा किंवा देवतासमुच्चयाचा प्रसाद जोडण्याच्या निरर्थक प्रयत्नात मग्न होण्याचे – मुळीच प्रयोजन नाही.
हा असा दुःखविमोचनाचा मार्ग मनुष्यजातीस बुद्धानेच प्रथमतः – उपदेशिला. आता या मोक्षसिद्धीस ज्ञानाची आवश्यकता आहे असे त्याचे म्हणणे असे. हाच सिद्धांत उपनिषद ग्रंथातूनही प्रतिपादिला आहे; परंतु बुद्धाच्या मते, हे ज्ञान ब्रह्माविषयीचे • किवा देवाविषयीचे नव्हे, तर मानव व इतर वस्तुजात स्वरूपाची जी स्पष्ट व सत्य भावना
तिलाच केवळ ज्ञान म्हणावयाचे. याखेरीज आणखी मोक्षसिद्धीस चित्ताची शुद्धता अवश्य व्हावी, असे त्याने प्रतिपादन केले. एकंदरीत पाहता या चित्तशुद्धीवरच त्याचा कटाक्ष विशेष असे. इतर सर्व धर्माचार तीपुढे गौण आहेत असे त्याचे म्हणणे असे. पवित्रता, विनय, आर्जव, शांती, अखिल भूतमात्राविषयीचे निःसीम प्रेम इत्यादी सदृत्ती मनुष्याच्या ठायी उत्पन्न झाल्या पाहिजेत.
त्याचप्रमाणे आपल्या अनुयायीजनांनी आपल्या मोक्षप्राप्तीच्या सत्यपथावर पूर्ण भरवसा ठेवावा. त्यांनी नेहमी विनयशील असावे. असत्यकर्म करण्याविषयी त्यास लाज वाटावी. त्यांनी सर्व प्रकारची सत्य विद्या संपादन करावी. त्यांनी सदैव उद्योगशील असावे. त्यांनी आपल्या मनाचा उत्साह कमी होऊ देऊ नये. त्यांनी सर्व प्रकारचे अनुभवज्ञान निरलसपणे प्राप्त करून घ्यावे.
त्यांनी लौकिकात व एकांतीही आपले आचरण नीतिनियमाप्रमाणे ठेवावे. नीतिनियमांचा भंग कदापि न करिता स्वतःचे आचरण निर्दोष व निर्मळ राखले तरच खरा मोक्ष प्राप्त व्हावयाचा. केवळ ब्राह्म कर्मकांडामध्ये तर्क झाल्याने किवा कोणा ईशशक्तीची कृपा संपादन करण्याची खटपट करून परलोकप्राप्तीची लालसा धरल्याने दुःखविमोचनरूप मोक्ष कदापि प्राप्त होणे नाही, असा बुद्धाचा स्वशिष्यांस उपदेश असे.
त्यावेळचे गृहस्थाश्रमी जन जे विधी व जी नित्यनैमित्तिक कर्मे करीत असत, ती ज्याप्रमाणे बुद्धास निरर्थक व निष्फळ आहेत असे वाटे, वरती निर्दिष्ट केल्याप्रमाणे पवित्र व निर्दोष आचरण आणि परोपकार यांच्या योगाने मानवी नियतीची पूर्णता प्राप्त होऊन इहलोकास स्वर्गाची योग्यता येईल, असा बुद्धाच्या बुद्धीचा निश्चय होऊन त्याने हे स्वाभिप्रेत धर्मरहस्य इतर मानवी बंधूंस उपदेशिण्याचा क्रम परम उत्साहाने आमरण चालविला आणि आपल्या मागे हा आपला क्रम निरलसपणे अव्याहत चालवावा, असा त्याने आपल्या शिष्यसमुदायास मोठ्या आग्रहाने उपदेश केला.
कारण मनुष्यमात्राची विपत्ती नष्ट व्हावी, अशी त्याला पराकाष्ठेची इच्छा होती. आपण योजलेल्या स्वोन्नतीच्या व सदाचरणाच्या मार्गाचा अवलंब केल्याने मनुष्याच्या एकंदर विपत्तीचे व दुःखाचे निर्मूलन होईल असे त्यास मनापासून वाटत असल्यामुळे व हा मोक्षसिद्धीचा मार्ग सर्वांस सुगम व साध्य असल्यामुळे त्याने एकंदर हीन, दीन व त्रस्त जनांस आपल्या मार्गाचे अवलंबन करून दुःखविमोचन करून घ्यावे, असा उपदेश करण्यास आरंभ केला. मुमुक्षु जनांनी आपली नीतिमत्ता वृद्धिंगत करावी.
दुर्वृत्तीचे दमन करावे, दुर्वासनांचा जय करावा आणि अखिल मानवजाती आपला बांधववर्ग आहे असे समजून तीविषयी निःसीम प्रीती मनात बागवावी म्हणजे त्यास मोक्षप्राप्ती सुगम होईल, असे त्याच्या एकंदर बोधाचे सार आहे. बुद्धाच्या मते ब्राह्मण आणि शूद्र, उच्च आणि नीच, राव आणि रंक असे जे कृत्रिम भेद आहेत त्यात काहीच अर्थ नाही. सर्व मानव येथून तेथून सारखेच आहेत. आपण
प्रतिपादलेल्या मोक्षमार्गास अनधिकारी असा कोणीच नाही. हा अर्थ सर्व कृत्रिम भेदाभेद विनष्ट करणारा खऱ्या कळवळ्याचा धर्मरहस्यबोध ज्यांच्या कानी पडला ते सारे त्याचे अनुयायी झाले आणि काही शतकांच्या अवधीमध्ये त्याच्या धर्माचा प्रसार सर्व आशियाखंडभर झाला. गरीब शेतकरी, साधेभोळे कारागीर, मोठमोठे धनाढ्य सावकार, मोठमोठे बलाढ्य सरदार व राजे वगैरे सर्व दर्जाचे व जातीचे लोक त्याचे अनुयायी झाले.
सुशील, सुस्वभावी, सदाचारी, शांत व सौम्य अशा त्या काळाच्या सहस्रविधी आर्यजनांनी त्याच्या मोक्षमार्गाचा अवलंब करून आपले ऐहिक जीवन सत्कर्मात व परोपकार करण्यात वेचले. बुद्धाच्या पूर्वी जे बिकट धर्मविधी व सामान्य जनांसह सहसा न झेपणारी अशी जी यज्ञादिकर्मे वेदविहित म्हणून सर्वत्र रूढ होती, ते विधी व ती कर्मे आपणास स्थिती प्रतिकूल असल्यामुळे किंवा अनधिकारास्तव, असाध्य आहेत असे ज्यास वाटे त्याला हा बुद्धाचा उपदेश हिताचा व सत्य वाटून ते त्याच्या धर्मपंथाचा स्वीकार करीत.
त्याचप्रमाणे वनवासाचा अंगीकार करून घोर तपश्चरण केल्याने ऐहिक विपत्तीपासून मनुष्य मुक्त होतोच असे सहसा म्हणवत नाही; कारण वृत्ती व वासना यांचा जय केल्यावाचून विपत्तिनाश व्हावयाचा नाही. हा जय तपश्चर्यादिकेकडून देहदंडन केल्याने निश्वयाने होईलच असे म्हणवत नाही. हा अनुभव त्या काळी जनास अनेक प्रकार येत असल्याकारणाने त्यास हा मोक्षसिद्धीचा दुर्घट मार्ग पसंत न वाटणे साहजिक होते.
पुन्हा हे तपश्चरणही सर्वास साध्य नव्हते. पुष्कळास तर ते अनधिकारास्तव दुर्गम होते. म्हणून त्याला बुद्धाचा धर्मपंथ विशेष हितकर व सत्य वाटणे साहजिक होते.
याप्रमाणे बुद्धाच्या वेळी धर्मसंबंधी साधारणतः स्थिती असल्यामुळे बुद्धाने उपदेशिलेल्या मोक्षमार्गाचे पुष्कळांनी अनुसरण केले; कारण तो आर्यधर्माहून सुगम व सोयीचा असून त्याचे अवलंबन करण्यास सर्व प्रकारच्या मनुष्यास कोणत्याही तहेचा प्रत्यवाय नव्हता. म्हणूनच त्याच्या धर्माचा प्रसार एवढा मोठा झाला आहे.
आणखी असे की, बुद्धाने या भूतलावर स्वधर्मोपदेश करण्यास आरंभ केल्यावर सुमारे पंचेचाळीस वर्षे लोकांमध्ये वागून आपण केलेला उपदेश स्वआचरणाने लोकांच्या चांगला प्रत्ययास आणून दिला. त्यामुळे त्याच्याविषयीची पूज्यताबुद्धी तत्कालीन लोकांमध्ये पराकाष्ठेची असून, पुढेही ती कायम राहिली. एकसारखी पंचेचाळीस वर्षे नेहमी सर्वप्रकारच्या स्त्री-पुरुष संघामध्ये राहून आपले आचरण अत्यंत निर्दोष ठेवणाऱ्या महापुरुषांविषयी लोकांच्या मनामध्ये पराकाष्ठेची आदरबुद्धी व अमर्याद श्रद्धा उत्पन्न होणे साहजिकच आहे.
याप्रमाणे या अद्वितीय व अलौकिक महापुरुषाचे माहात्म्य आहे. आमच्या या भारतभूमीमध्ये हे अप्रतिम नररत्न निर्माण होऊन अखिल मानवजातीस स्वतेजाने दिपविणारे झाले असता, त्याच्या परमपवित्र चरित्राविषयी व बोधामृताविषयी आम्ही आर्यांचे वंशज म्हणविणाऱ्या जनांनी आजवर उदासीन राहावे हे मोठेच चमत्कारी आहे. हे मनात आणून आम्ही या महापुरुषाचे यथोपलब्ध चरित्र, त्याच्या बोधाचे सार आणि त्याच्या धर्मप्रसाराचा थोडासा इतिहास इतकी प्रकरणे पुढील ब्लॉग मध्ये क्रमाक्रमाने लिहिली आहेत. त्यांचे अवलोकन आमचे आर्यबांधव अवश्य करतील अशी उमेद आहे.
आता कित्येक वेदधर्माभिमानी पुरुषांचे असे म्हणणे पडेल की, ज्याने सनातन वेदधर्माशी विरोध करून आत्मा व परमात्मा याविषयीच्या कल्पना विवेकशुद्ध नाहीत असे प्रतिपादन केले, या नास्तिकशिरोमणीचे चरित्र व धर्ममते याविषयी जिज्ञासा उत्पन्न होण्यात काय अर्थ आहे? या शंकेचे समाधान अर्थात असे आहे की, त्याचे बहुतेक तत्त्वविचार व नीतिविचार तत्कालीन आर्यविचार पद्धतीत अनुसरून होते. एवढेच नव्हे, तर तो स्वतः असे म्हणे की, आपण काढलेला मोक्षसिद्धीचा मार्ग पुरातन असून चालू असलेला धर्ममार्ग भ्रममूलक आहे.
यावरून पाहता त्याच्या मताचे ज्ञान प्राप्त झाल्याचे अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांच्या मनात कोणते धर्मविचार व तत्त्वविचार घोळत होते त्याची माहिती आम्हास अंशतः होईल. दुसरे असे की, बुद्धकृत धर्मपरिवर्तन या भारतभूमीत सुमारे एक सहस्र वर्ष कायम राहून, पुढे ते हळूहळू निर्मूळ होऊन शेवटी केवळ नामशेष झाले आणि सांप्रत तर त्या धर्माचे अनुयायी नेपाळ व काश्मीर खेरीजकरून हिंदुस्थानाच्या इतर भागात फार तर दोन-अडीच लाख असतील.
तेव्हा जो धर्म अशोकासारखा दिग्विजयी चक्रवर्ती राजाचा हस्तालंब मिळून हिंदुस्थानात एके काळी सर्वत्र पसरला होता, त्याचे बहुतेक निर्मूलन युद्धादिमूलक रक्तपातादी घोर प्रसंग घडून न येता व्हावे हे मोठेच विलक्षण आहे. यास्तव बुद्धधर्माच्या प्रसाराचा व पराभवाचा वृत्तांत देवधर्माभिमानी जनांनी अवश्य जाणून घ्यावा असा आहे.
Conclusion
बौद्ध धर्म हा मानवतेसाठी शांतता, अहिंसा आणि आत्मविकासाचा मार्ग दाखवणारा एक प्राचीन विचारसरणी आहे. तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणींमुळे आत्मज्ञान, शांती, आणि मानसिक समतोल साधता येतो. त्यांच्या उपदेशांमध्ये मानवतेच्या गरजा, नैतिकता आणि करुणेची शिकवण आहे, जी आजही प्रत्येकाच्या जीवनात प्रासंगिक आहे. ‘उपोद्घात’ या ब्लॉगद्वारे आपण बौद्ध धर्माचे विविध पैलू, त्यातील तत्वज्ञान आणि त्याचे समाजासाठी असलेले योगदान जाणून घेतले. ही शिकवण स्वीकारून आपण आपल्या जीवनात शांती आणि आनंद आणू शकतो.