Embark on a virtual journey following Gautama Buddha’s footsteps on his pilgrimage. Explore the sacred sites where he attained enlightenment, delivered profound teachings, and left a lasting legacy.
Discover the spiritual significance of each pilgrimage site and the profound impact of Gautama’s journey on Buddhism.
गौतमाची बोधयात्रा | Gautama’s Pilgrimage
सिद्धार्थ आपल्या राज्याबाहेर पडून दुसऱ्या राज्यात आले. रानावनांतून भटकत भटकत ते तत्कालीन सुप्रसिद्ध गुरू आलार कलाम यांच्या आश्रमात पोहोचले. आलार कलाम हे असित ऋषर्षीचे शिष्य होते. त्यांच्या आश्रमात सत्याच्या शोधार्थ सिद्धार्थ गौतम आले.
गौतमांनी आलार कलामांकडून दीक्षा घेतली. तिथे ते सात प्रकारचे ध्यानविधी शिकले. या प्रत्येक ध्यानविधीचा त्यांनी अभ्यास केला. ते विधी शिकल्यानंतरही त्यांना आतून एक रिक्तता जाणवत होती. तेव्हा त्यांनी गुरुजींना विचारले, ‘हे विधी करूनही मला एक रिक्तता जाणवत आहे.
आता यापुढे मी काय करू?’ त्यांचे गुरुजी प्रामाणिक होते. ते म्हणाले, ‘मी तर एवढंच जाणतो. यापुढील ज्ञान जाणणारा सध्या आणखी कुणी असेल असं मला तरी वाटत नाही.’
गौतम एक योग्य शिष्य आहेत, याची जाणीव गुरुजींना होती. त्यामुळे त्यांनी गौतम यांच्यासमोर त्यांचा आश्रम सांभाळण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, गौतम स्वतः ही प्रामाणिक असल्याने, त्यांनी नम्रतापूर्वक नकार दिला. प्रामाणिकपणा हा फार मोठा गुण आहे.
दुसऱ्याशी प्रामाणिकपणे वागण्याचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच स्वतःशी प्रामाणिक राहणेही अतिशय महत्त्वाचे आहे. मी स्वतः माझ्या ज्ञानाविषयी समाधानी नाही, तेव्हा आश्रम सांभाळून इतरांना सत्याचा मार्ग कसा बरं दाखवू शकेन? अशी गौतमांची या नकारामागची भूमिका होती. गौतमांना अद्याप सत्याचा शोध घ्यायचा होता.
खरे तर एखादे उच्च पद मिळवण्यासाठी लोक काय करत नाहीत? परंतु अशा अभिलाषांमुळेच सत्याच्या मार्गावर त्यांची प्रगती होत नाही. त्यामुळेच आध्यात्मिक साधकांना सांगितले जाते, ‘कुठलंही पद मिळवण्यासाठी तुम्ही सेवा करू नका. हे कार्य तुम्ही कशासाठी सुरू केलं आहे, तो मूळ हेतू नेहमी लक्षात असू द्या.’ ही जाणीव
सुरुवातीपासून साधकांना करून दिली जाते. आपण योग्य पद्धतीने साधना करत आहोत की नाही, करत असलेली सेवा ही सेवकाची सेवा करत आहे की नाही, याची खूणगाठ स्वतःशी प्रामाणिक राहून बांधायला हवी.
गौतम एक राजकुमार असल्याने त्यांनी आजवर महालांचे सुख उपभोगले होते; पण जे लोक या सुखापासून वंचित असतात त्यांच्यासाठी संपत्ती, पद, प्रतिष्ठा आदी बाबींचे आकर्षण आणि महत्त्व नक्कीच असते.
गौतम आश्रम सोडून ज्ञानाच्या शोधार्थ निघालेले पाहून त्यांच्या गुरूंना अतीव आनंद झाला. आपला शिष्य ज्ञानमार्गावर प्रगती करू इच्छित असल्याचे पाहून ते समाधानी झाले. त्यांनी गौतमांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ गुरू उद्धक रामपूत यांच्याकडे त्यांना ज्ञानप्राप्तीसाठी पाठवले.
गौतमांसारखे शिष्य निश्चितच प्रत्येक गुरूला प्रिय असतात. त्यामुळे त्यांच्याकडून अशा शिष्यांना यथाशक्ती मदत केली जाते. प्रामाणिकपणासह विनम्र असलेला शिष्य लवकर प्रगती करतो.
काही शिष्य प्रामाणिक असतात; पण त्यांच्यात अहंकार असल्याने विनम्रतेचा अभाव असतो. सेवा करत असताना, अशा शिष्यांचा अहंकार दुखावण्याचा धोका असतो. अशा व्यक्ती योग्य स्थानावर पोहोचल्यावरही धोका कायम राहतो.
असे शिष्य आपल्या अहंकारामुळे सत्याला झिडकारून आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य स्थानी पोहोचल्यानंतरही अशा साधकांना उच्च ज्ञानापासून वंचितच राहावे लागते.
काही शिष्य नम्र असले तरी अप्रामाणिक असतात. ते काही काळ इतरांची दिशाभूल करण्यात यशस्वी होतात. पण त्यांचे हे नाटक फार काळ टिकत नाही. त्यांची नम्र वागणूक पाहून, ते चांगले साधक असल्याचा इतरांचा गैरसमज प्रारंभी होतो. पण काही काळानंतर अशा साधकांचे वास्तव समोर येतेच. शिष्यांनी ही चूक टाळायलाच हवी.
साधनापथावर प्रामाणिकपणे आणि विनम्रतेने वाटचाल करत राहायला हवी. उद्धक रामपूत यांच्या आश्रमात गौतमांना आठवी ध्यानप्रणाली शिकायला मिळाली. त्यांनी मोठ्या मेहनतीने सर्व काही आत्मसात केले. तरीही ते संतुष्ट नव्हते. याविषयी त्यांनी गुरुजींना सांगितले.
त्यावर गुरुजी म्हणाले, ‘आता यापुढचा शोध तुला स्वतःच करावा लागेल, तुझी इच्छा असेल, तर इतर शिष्यांना शिक्षण देण्याचं काम तू येथे करू शकतोस.’ परंतु सिद्धार्थ गौतमांना मोक्षाशिवाय इतर काहीही नको होते.
म्हणून ते या आश्रमातूनही बाहेर पडून सत्याच्या शोधार्थ निघाले. त्यांच्या या प्रवासात कौंडण्य आणि त्याचे चार साथीदारही गौतमांबरोबर निघाले. सिद्धार्थांना कधी ज्ञानप्राप्ती होते आणि त्यांच्याकडून आपण कधी दीक्षा घेतो, याचेच वेध ज्योतिषी कौंडण्यला लागले होते.
हे सर्व साधक एकत्रितपणे तप-साधना करू लागले, भिक्षा मागू लागले. तत्कालीन परंपरेनुसार त्यांनी उपवास करण्यास सुरुवात केली. देहाला कष्ट देण्याने अवघी पापे नष्ट होतात, अशी त्या काळी समजूत होती.
त्यामुळे या तत्कालीन परंपरेनुसार गौतम उपवास करू लागले. ते दिवसातून एकदाच भोजन घेत. काही दिवसांनंतर ते दोन दिवसाआड एकदा भोजन करू लागले. त्यानंतर तीन दिवसांतून एकदा भोजन करू लागले. काही दिवसांनी त्यांनी भिक्षा मागणेच बंद केले. जंगलातील कंदमुळे, जंगली फळे-पाने खाऊन ते भूक भागवू लागले. अशा प्रकारे ते हळूहळू देहपीडा वाढवू लागले.
दगडांवर झोपणे, कुठल्याही ऋतूत सदैव थंड पाण्याने स्नान करणे, स्मशानात राहणे, अगदी चक्कर येईपर्यंत दीर्घ काळ श्वास रोखणे आदी प्रकारची अनेक तपं ते करत होते. परिणामी, अशक्तपणाने त्यांची तब्येत बिघडली. त्यांचे पोट खपाटीला गेले.
एके दिवशी पाणी पिण्यासाठी गौतम नदीपात्रात उतरले होते. पण नदीप्रवाहाची ओढ सहन करण्याइतकीही ताकद त्यांच्यात उरली नव्हती. त्या प्रवाहात ते वाहत गेले. महत्प्रयासाने ते नदीपात्राबाहेर आले आणि बेशुद्ध पडले. एका लाकूडतोड्याचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्याने गौतमांना आपल्या झोपडीत आणले. त्यांची सेवा-शुश्रूषा केली, खाऊ-पिऊ घातले.
यामुळे गौतमांना बरे वाटू लागले. तेव्हा ते विचार करू लागले, ‘मी चुकीच्या मार्गावर तर चाललो नव्हतो ना? या शरीराला पीडा दिल्यानं खरोखर सत्य मिळतं का? जोपर्यंत भूक नव्हती, तोपर्यंत हे मन अस्थिर नव्हतं. पण जेव्हा शरीराची ताकद परत आली, तेव्हा हेच मन अस्थिर होऊन, इकडेतिकडे भटकू लागलंय. या शरीराला शक्तिहीन करून आपल्याला खरंच ज्ञानप्राप्ती होणार आहे का?
शरीराला उपाशी ठेवून या इच्छा-आकांक्षा, तृष्णेतून मुक्ती मिळणार आहे का? शरीराला भूक लागली असताना काही काळ या तृष्णा-वासनांपासून मुक्ती मिळाल्यासारखी वाटते. पण भूक भागल्यानंतर वासना, इच्छा, महत्त्वाकांक्षा पुन्हा निर्माण होतात. आपलं शरीर सुदृढ असेल, तर सुयोग्य विचार करण्याची क्षमता आपल्यात येते. भुकेल्या शरीरात विवेक जागृत होऊच शकत नाही.
त्यापेक्षा भुकेलं न राहता अथवा अधिक आहार घेऊन सुस्तही न बनता मध्यममार्गाचा अवलंब का करू नये?’ असा विचार करून गौतमांनी मध्यम मार्ग अनुसरायचे ठरवले. यानंतर गौतमांनी जीवनभर या मध्यममार्गाचेच अनुसरण केले आणि इतरांनाही हाच मार्ग दाखवला.
वस्तुतः मुक्तीसाठी मनावर विजय मिळवणे महत्त्वाचे आहे. या प्रपंचात राहून तुम्ही मनावर विजय मिळवलात, तर तो विजय संसारत्याग करून मनावर मिळवलेल्या विजयाइतकाच महत्त्वाचा आहे. कारण, त्यामुळे आपल्याकडे पाहून इतरांनाही प्रेरणा मिळू शकते.
संसारात राहून या मध्यममार्गाद्वारे साधनापथावर प्रगती करणारा साधक हाच तेज संसारीचा खरा अर्थ आहे. आता गौतमांना ही जाणीव झाली, की आतापर्यंत ते जो मार्ग अवलंबत होते, तो त्यांच्यासाठी योग्य नाही. त्यापेक्षा मध्यम मार्ग उत्तम असल्याने तोच निवडला पाहिजे.
काही काळानंतर भिक्षा मागत फिरत असताना गौतमांना त्यांचे पाचही साथीदार भेटले. सिद्धार्थ गौतमांचा फुललेला चेहरा पाहून, त्यांच्या साथीदारांना संशय आला. त्यांना वाटले, गौतमांनी साधनापथ सोडून दिल्याने ते आळशी, पथभ्रष्ट झाले आहेत. मनसोक्त खाऊ-पिऊ लागले आहेत. या गैरसमजातून त्यांनी गौतमांवर टीका केली आणि त्यांना सोडून गेले.
त्यानंतर आपली पुढची वाटचाल गौतमांनी एकट्यानेच निश्चित केली. सलग सहा वर्षे त्यांची साधना सुरू होती. अखेर एके दिवशी एका पिंपळाच्या वृक्षाखाली ‘ बसले असताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.
मग या वृक्षालाच बोधिवृक्ष हे नाव देण्यात आले. बोधीचा अर्थ बोध प्राप्त होणे असा आहे. या वृक्षाखाली बसतानाच गौतमांनी संकल्प केला होता, की जोपर्यंत अंतिम सत्य प्राप्त होत नाही, तोपर्यंत शरीराची कुठलीही हालचाल न करता डोळे बंद करून मी इथे बसून राहीन. असे उच्च विचार कुणालाही उगाच येत नाहीत. ते असा संकल्प तेव्हाच करू शकतात, जेव्हा त्यांनी काही विशेष कर्म केलेले असते.
सकाळ होईपर्यंत गौतमांना आत्मबोध (आत्मसाक्षात्कार) प्राप्त झाला. ते अरहंत म्हणजेच मुक्त झाले. काही जणांचे असे म्हणणे आहे, की ज्ञानप्राप्तीआधी चार आठवडे ते या वृक्षाखाली बसून होते. मात्र, ज्ञानप्राप्तीनंतर गौतम या आश्चर्यभावातच आठवडाभर मौन होते. त्या कालावधीत ‘मी कोण आहे?’
याविषयीचा बोध आणि समज त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली, ‘घर बनवणाऱ्याला मी जाणलंय. त्यामुळे आता तो पुन्हा माझं घर बनवू शकत नाही.’ याचा अर्थ ‘माणसाच्या आत ‘नकली मी’ (अहंकार) कसा तयार होतो, हे मी ओळखले आहे. आता बेहोश अवस्थेत ‘नकली मी’ तयार होऊ शकणार नाही,’ असे गौतमांना म्हणायचे होते.
You may like this: गौतमची कथा | Story of Gautama in Marathi
Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi
Conclusion
In conclusion, Gautama Buddha’s pilgrimage was not just a physical journey, but a profound spiritual quest that shaped the foundation of Buddhism.
His travels to various sacred sites were pivotal in spreading his teachings and establishing a community of followers. Each site holds deep spiritual significance, reflecting the stages of his life and enlightenment.
Gautama’s pilgrimage symbolizes the path of self-discovery and enlightenment that Buddhists strive to emulate. It is a reminder of the transformative power of spiritual practice and the importance of seeking truth and compassion in our lives.
As we reflect on Gautama’s journey, we are inspired to embark on our own inner pilgrimage, seeking wisdom, peace, and enlightenment.
One Comment